प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १९ वें.
यूरोपांतील लहान राष्ट्रांपासून मोठ्या राष्ट्रांचा व प्रांतिक भाषांचा विकास

कॅ टा ल न- जेरोना, बार्सिलोन, तारागोना व लेरिडा (जुनें नांव कॅटालोनिया) कॅस्टेलान, दलाप्लाना, व्हॅलेन्शिया व आलिकांट (जुनें व्हॅलेन्शियांचें राज्य), बालिआरिक बेटें (भूमध्य समुद्र) ठिकाणीं कॅटालन भाषा चालते. दक्षिण फ्रान्सच्या रोमान्स भाषेच्या पोटांत कॅटालन भाषा येते. ही स्पेनच्या रोमान्स भाषांपैकीं नव्हे. अरबांची सत्ता झाल्यावर जे हिस्पानी लोक लँग्विडॉकमध्यें गेले होतें व जं ९ व्या शतकांत परत येऊन आपल्या मूळच्या मुलखांत राहिले. त्यांनी आपणांबरोबर आणलेली ती ही कॅटालन भाषा होय. पिरिनीज पलीकडील दोन फ्रेंच प्रांतांत (रूसिलॉन व सर्डान्ये या प्रांतांत) हीच भाषा चालते. यावरून वरील अनुमान दृढ होतें. ९ ते १२ शतकांत कॅटॉलोनियांत ही भाषा पसरली. १२२९ त जेम एल कांक्विस्टा डार यानें ही भाषा मेजोर्का येथें आणली व याच राजाच्या द्वारां ती व्हॅलेन्शि आला गेली. मर्शियांत देखील सन १२६६ सालीं कॅटालन लोकांनीं वस्ती केली परंतु कॅस्टिलियन लोकांच्याच सत्तेखाली हा प्रांत वस्तुतः मोडत असल्यानें तेथें कॅस्टिलिअन भाषेनें इतर भाषा आत्मसात करून आपलें वर्चस्व स्थापिले. कॅटालन भाषेच्या मुलखाची दक्षिण सीमा सेगुरा नदी व पश्चिम सीमा स्पेनची सरहद्द आहे. ११३७ सालीं अँरॅगॉन व बार्सिलोना यांचा ऐक्याचा तह झाला त्याअन्वयें अँरॅगॉनच्या राज्यकारभारांत कॅटालन भाषा शिरली. अँरॅगॉनची सत्ता सिसिली, नेपल्स, कॉर्सिका, सार्डिनिआ या ठिकाणीं स्थापन झाली तशी कॅटालन भाषाहि तेथें गेली परंतु राज्यकारभारा खेरीज व जेत्यांच्या व्यवहाराखेरीज इतरत्र तिचा प्रचार न झाल्यानें आतां ती सार्डिनियांतील आल्घेरोखेरींज कोणत्याहि ठिकाणीं अस्तित्वांत नाहीं.