प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १९ वें.
यूरोपांतील लहान राष्ट्रांपासून मोठ्या राष्ट्रांचा व प्रांतिक भाषांचा विकास

इटालीमधील लोक व भाषा.- सिराक्यूज येथील अंटायोकस नांवाच्या ग्रंथकाराच्या मतें इटाली हें नांव प्रथम, आज ज्या प्रदेशाला कालाब्रिया म्हणतात (ब्रुटियम द्वीपकल्पाचा दक्षिण भाग) त्या प्रदेशाला लावीत. नंतर इटालिया म्हणजे ओएनोट्रिया, इटालियन लोक म्हणजे ओएनोट्रियन लोक असा अर्थ असे; परंतु अंटायोकस व थुसिडिडीझ या इतिहासकारांच्या वेळींच इटालियामध्यें मेटापाँटमपर्यंतचा टारेंटाईन आखाताचा तटप्रदेश व लौस आणि पॉसिडोनिआ हीं आखातें अंतर्भूत झालीं म्हणजे पुढें लुकानिआ व बुटिअम प्रांत या नांवाखालीं आलेल्या मुलखाला इटालिया हें नांव पडलें.

इटाली म्हणजे आल्पस् पावेतोंचा उत्तर मुलुख घेऊन सर्व द्वीपकल्प याप्रमाणें इटालीची व्याप्ति घेतली म्हणजे या प्रदेशांत राहणा-या लोकांचे दोन वर्ग पाडावे लागतात. इंडोयूरोपीय भाषा बोलणारे व तदितर. हे तदितर कोण कोण होते हें आज निश्चित नाहीं. मात्र एट्रुस्कन लोक या इतरांत होते याजबद्दल संदेह नाहीं.

एट्रुस्कन लोकांची बोली व कुमी, निआपोलिस, टारेंटम या वसाहतींमधील ग्रीक बोल्या याखेरीज करून ख्रिस्तपूर्व ६०० ते २०० पावेतों इटालींत ज्या भाषा दक्षिणेकडून उत्तरेकडे जातां जातां आढळतात त्या येणेंप्रमाणें:-
 
१ सिसेल, २ साउथ ओस्कन व ओस्कन, ३ मेसापिअन, ४ नॉर्थ ओस्कन, ५ वोल्सिअन, ६ ईस्ट इटालिक किंवा साबेलिक, ७ लॅटिनिअम, ८ सॅबिन, ९ इगुव्हिन अ. अंब्रिअन, १० गॅलिक, ११ लिगुरिअन व १२ व्हेनिटिक.
 
या भाषांपैकीं ब-याच भाषांचें परस्पर नाते आहे. उदाहरणार्थ- वेनेटिक, ईस्ट इटालिक व मेसापिअन यांचा परस्पर संबंध आहे व या सर्व अँड्रियाटिक भाषासंघात येतात.

उपर्युक्त भाषा व लोक यांचा संबंध संशोधकांनीं सामान्यतः असा लावला आहे (१) लॅटिन ही भाषा रोम व लाटियम येथील प्राचीन फ्लेबिअन लोकांची होती. हे लोक सर्व द्वीपकल्पभर एका काळीं पसरलेले असावेत. उत्तर इटालींत एस्ट्रुस्कन आणि गॅलिक स्वा-या सुरू होण्यापूर्वीं ज्या भाषा होत्या, त्यांजशीं लॅटिन ही सदृश होती. (२) साबिक लोक हे उत्तरेकडील असून यांनीं दक्षिण इटलींत स्वा-या करून मुलुख घेतला. यांची जी भाषा ती ओस्कन भाषा होय. (३) व्हॉल्सिअन व अंब्रियन या भाषा साबिन लोकांमध्येंच चालणा-या भाषा होत्या.

इटाली हे नांव प्रथम द्वीपकल्पाच्या अगदीं दक्षिणेकडील भागाला लावीत. व पुढें तें लाटियम व कांपानिया यांनां लावलें गेलें. नांवाच्या या व यापेक्षां अधिक व्याप्तीची कहाणी विस्तारानें सांगणें अशक्य आहे. परंतु हें खरें की रोमन लोकांची सत्ता जसजशी विस्तृत होत गेली तसतशी त्या सत्तेखालीं आलेल्या मुलखाला एक नांव देण्याची जरूर अधिकाधिक भासूं लागली. लोकसत्तेच्या अखेरीपावेतों इटाली हें नांव सरकारी कागदोपत्रीं सिसल्पिन गॉल व अँपिनाइनच्या उत्तरेकडील मुलुख खेरीज करून इतर भागाला म्हणजे मध्य व दक्षिण भागाला लावण्यांत येत होतें. परंतु सामान्य लोकांच्या बोलण्यांत इटाली म्हणजे आल्पसच्या पायथ्यापावेतोंचा मुलुख असाच अर्थ रूढा होता. सिसरो व सीझर यांच्या वेळीं हाच अर्थ रूढ होता. सिसरो व सीझर यांच्या वेळी हाच अर्थ रूढ असल्याचें कित्येक उता-यावरून दाखवितां येतें.

आगस्टस यानें इटालीचे जे राजकीय विभाग पाडले ते महत्त्वाचे आहेत. त्यानें इटालीचे ११ विभाग पाडले. कॉन्स्टंटाइनच्या वेळेपावेतों हेच विभाग मानीत. या विभागणींत पूर्वींच्या काळच्या मर्यादांनांच महत्त्व दिलेलें होतें. हे विभाग येणें प्रमाणें:-
 
१ लाटियम - व्होल्सी, हर्निसी, अरून्सी यांचा मुलुख लाटियममध्यें येतो. कंपानिया व पिसेंटिनि यांतच येतात. म्हणजे टायबरच्या मुखापासून सिलावसच्या मुखापर्यंतचा जो मुलुख तो लाटियम.

२ अपुलिया व कालाब्रिआ (ग्रीक लोक याला मेसापिआ अ. इलापिजिआ म्हणत), हिर्पिनी लोकांचा मुलुख (साम्राइटलोकांपैकीं.)
३ लुकानिआ व ब्रुटिअम.
४ हिर्पिनीखेरीज बाकीचा सॅम्नाइट लोकांचा मुलुख साबिन व त्यांच्या नात्याचे फ्रेंटानीं, मारूसिनी, मार्सी पेलिग्नि, व्हेस्टिनी, इंक्विकुली यांचा मुलुख.
५ पिसेनम
६ अंब्रिआ
७ एट्रुरिआ
८ गॅलिआ सिस्पादाना (सिसल्पाइन गॉलचा दक्षिण भाग)
९  लिगुरिआ
१० व्हेनेशिआ, इस्ट्रिया, सेनोमानी.
११ गॅलिया ट्रान्सपादाना.

आगस्टसचे प्रांत आणि मागें दिलेल्या भाषा या दोहोंच्या नांवाच्या याद्या पाहिल्या म्हणजे कांहीं सामान्य नांवे आढळून येतात. उदाहरणार्थ वेनेशिया आणि वेनेटिक भाषा, ग्यालिआ आणि ग्यालिक भाषा, लाटिनिअन आणि लाटियम, लिगूरिआ व लिगूरिअन भाषा वगैरे. यावरून असें असें दिसतें कीं ज्यांचीं नांवे त्यांच्या प्रदेशाला  व भाषेला मिळाली अशा लोकांनीं अगर जातीनीं विशिष्ट प्रदेश व्यापले होते.
 
विशिष्ट जातीनें जो देश व्यापला जाई त्या जातीचें नांव प्रदेशास चिकटे. अमेरिकेंत डाकोटा इलिनाय वगैरे नांवे विशिष्ट प्रदेशांस मिळालीं याचें कारण हेंच होय. हिंदुस्थानांत अंग, कलिंग, पौन्ड्र वगैरे नांवें विशिष्ट प्रदेशांस याच कारणानें मिळालीं. असल्या नांवांच्या पाठीमागे जातिविषयक इतिहास लपलेला आहे.

या निरनिराळ्या जाती अगर लहान राष्ट्रे यांच्या भाषा एकमेकांशीं सदृश होत्या त्यांस एट्रुस्कन भाषा तेवढी अपवाद होती. आणि त्यामुळें एका भाषेचा पगडा बसणे सोपें गेले; व ती क्रिया झाल्यानंतर सर्वांस सारखेपणा आला. इटलीला रोमन प्रांत या नावांनें जें एकत्व उत्पन्न झालें तें पुढें त्याच्या राष्ट्रीकरणास कारण झालें.