प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग

प्रकरण २ रें.
विश्वोत्पत्तीपासून असुरराष्ट्रसंस्थापनकालापर्यन्त.

सहजोत्पत्ति (Spontaneous generation):- नाईल नदीच्या गाळापासून उंदीराची स्वाभाविक उत्पत्ति किंवा गाईच्या शेणापासून विंचवांची किंवा मृत शरीरापासून कृमींची उत्पत्ति यासंबंधाच्या जुन्या कल्पना सर्व चुकीच्या असल्याचें पाश्चुर व त्याच शास्त्रीय क्षेत्रांत संशोधनकार्य करणारे तदुत्तरकालीन विद्वान् यांनी आपल्या सुप्रसिद्ध प्रयोगांनीं दाखविलेंच आहे. परंतु या प्रयोगांचा, अगदीं मूळारंभी निर्जीव सृष्टीतून सजीव सृष्टि कशी उत्पन्न झाली, या प्रश्नांशीं कांहीं संबंध नाहीं. डॉ. एच्.सी.बॅस्टियन् याने स्वत:केलेल्या अनेक प्रयोगांचे वर्णन प्रसिद्ध केलें असून त्यांत तो असें म्हणतो कीं, निर्जीव पदार्थापासून अत्यंत साध्या प्रकारचे सचेतन जीव उत्पन्न करतां आले. हे प्रयोग अगदीं बिनचूक-निर्दोष होते किंवा नाहीं याबदल खात्री नसली तरी इतर तदनुंषगिक पुराव्यावरुन हेकेल व नागेली यांच्यासारखे मोठाले विद्वान् जे सांगतात तें आपण मान्य करणें जरुर आहे. या विद्वानांचे म्हणणे असें कीं, आद्यजीवोत्पत्ति (Archebiosis) ही क्रिया पुष्कळ वेळां पुनःपुनः होत राहिली असली पाहिजे.

(Protein Plasura gramiles):- परंतु या आद्यजीवोत्पत्तीची पूर्व तयारी म्हणून एकपायरी अशी असली पाहिजेकीं, त्यावेळीं नायट्रोजनस कार्बनाचे संयुक्तः पदार्थ बरेचसे उत्पन्न झाले असावे. त्यांच्यापासून प्रथम प्रोटीन नामक द्रव्य उत्पन्न झालें. नंतर या प्रोटीनचे अणू त्यांच्यातील अनिश्चित स्वरुपाच्या रासायनिक आकर्षणामुळें विवक्षित प्रकांरे एकत्र होऊन त्यापासून एका प्रकारच्या जीवनरसाच्या सूक्ष्म कणांची उत्पत्ति झाली असावी; आणि या कणांपासून अगदीं साध्या स्वरुपाचे आद्य जीव निर्माण झाले असतील. हीच मोनेरा जातीची सजीव सृष्टि होय.