प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग

प्रकरण २ रें.
विश्वोत्पत्तीपासून असुरराष्ट्रसंस्थापनकालापर्यन्त.

संवेदनशीलता:- आतां या संवेदनशीलतेसंबंधाचा विचार करुं. ही सेंद्रियांत व निरिंद्रियांत आहे. व दोहोंमधीलहि तिचें अस्तित्व सदृश उपायांनीं कमीजास्त करतां येतें. सचेतन जीवांना कोणतेंहि उत्तेजक (Stimulus) दिल्यास त्याच्यामध्यें एक प्रकारचें चलन उत्पन्न होतें आणि हें चलन विद्युद्यंत्रांच्या साहाय्यानें दाखवितां येतें. प्रत्येक शरीरभागाची चलनशीलता इंद्रियविषयक व्यापारावर अवलंबून असते. शरीरभागा- (Tissue) मध्यें संवादिनी क्रिया करण्याचें (Responsive action) जें सामर्थ्य असतें तें ज्ञानशक्तिहारक द्रव्यांच्या परिणामामुळें तात्पुरतें आणि विषारी द्रव्यामुळें कायमचें नष्ट करतां येतें. येणेंप्रमाणें एखादा शरीरभाग असंवादी बनला म्हणजे तो मृत झाला असें म्हणतात. निरिंद्रिय सृष्टीमधील जस्ताच्या तारेवर सोडियम कार्बोनेट (Sodium Carbonate) याचा उत्तेजक परिणाम होत असतो; पोटॅशिअम ब्रोमाईड (Potassium Bromide) याचा ज्ञानशक्तिहारक असा परिणाम होतो. आणि ऑक्सॅलिक अ‍ॅसिडचा बर्‍याच वेळानंतर विषासारखा परिणाम होतो.

यावरुन असें दिसून येईल कीं वनस्पती व प्राणी यांच्या शरीरभागावर होतो तशाच प्रकारचा विद्युन्मय संवादी परिणाम उत्तेजक द्रव्यांच्या साहाय्यानें, शिथिलतात्मक परिणाम ज्ञानशक्तिहारक द्रव्यांनीं आणि पूर्ण नाशकारक परिणाम दुस-या कांही विषसम द्रव्यांनी सर्व प्रकारच्या धातूंवर घडून येत असतो. यावरुन सचेतन- सृष्टि व जड सृष्टि यांच्यामध्यें संवेदनाशीलतेच्या बाबतींत पूर्ण साम्य आहे असें दिसून येईल.

सर जगदीशचंद्र बोस हे म्हणतात:- ''धातु, वनस्पतीं आणि प्राणी यांच्यावर ज्या सर्व प्रकारच्या संवादिनी क्रिया होत असतात त्यांमध्यें कोठेंहि फरक दिसून येत नाहीं. म्हणून संवादिनी क्रिया होतात त्या अदृश्य शक्तीच्या साहाय्यामुळें होतात असें मानण्याची मुळींच आवश्यकता नाही किंवा दुस-या शब्दांत सांगावयाचे म्हणजे सजीव सृष्टि असो किंवा निर्जीव असो, सर्वांतील मूलद्रव्य एकच प्रकारचें आहें.''

दुसरा लोएब (Loeb) नांवाचा शास्त्रज्ञ म्हणतो- ''आपण सर्व मनुष्यप्राणी हेहि रासायनिक द्रव्यांचीं बनलेलीं यंत्रें आहोंत. आपण हालचाल करतों याचें कारण असें कीं, आपल्या शरीरांतल्या मध्यवर्ती मज्जातंतुरचनेमध्यें चालू असलेल्या क्रिया आपणास हालचाल करण्यास भागच पाडतात. इतकेंच काय पण मनुष्यप्राणी आत्मयज्ञ करण्यास तयार होतो तो सुद्धां कित्येक रासायनिक फेरबदल शरीरांत घडून आल्यामुळें होतो असें सिद्ध करुन दाखवितां येईल असें वाटतें. कित्येक उत्तेजकांमुळें अन्तरोत्सर्ग इतक्या मोठया प्रमाणावर होऊं लागतो कीं, आपण त्यांचे गुलाम बनून जातों. या सर्वावरुन असें दिसून येतें कीं, ज्याला आपण अदृश्य चैतन्यशक्ति म्हणून म्हणतों ती, वीज, उष्णता किंवा प्रकाश यांच्यासारखीच एक शक्ति आहे.''