प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग

प्रकरण २ लें.
विश्वोत्पत्तीपासून असुरराष्ट्रसंस्थापनकालापर्यन्त.

विकासवाद.- विकासवाद उर्फ एव्होल्युशन म्हणून जो सिद्धांत पुढें मांडण्यांत येतो त्यांतील मुख्य कल्पना येणेंप्रमाणें आहे. अत्यंत प्राचीन काळीं द्रवरुप जडद्रव्य आकाशांत परिभ्रमण करीत होतें द्रव्यावर गतीचा परिणाम होऊन तारकासमुच्चयरुपी  विश्व उत्पन्न झालें. त्या तारकांपैकी प्रत्येक तारका अत्यंत उष्ण म्हणजे चैतन्याच्या संभवास अगर जीवनास अशक्य अशा स्थितींत होती आणि ती अंशेकरुन द्रवरुप आणि अंशेंकरुन जडरुप स्थितींत होती. पृथ्वी अशाच प्रकारची खस्थ ज्योति आहे. तींत कालांतराने उष्णता कमी झाली आणि चैतन्य उत्नन्न झालें. तें चैतन्य प्रथम अत्यंत सूक्ष्म जीवस्वरुपी होतें. पुढे त्याचाच विकास होऊन म्हणजे दोन सूक्ष्मांपासून जरासे मोठे पण सूक्ष्म जीव उत्पन्न झाले. त्याच क्रियेनें आणखी मोठाले जीव (वनस्पतिरुपी अगर प्राणिरुपी) उत्पन्न झाले.