प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग

प्रकरण २ रें.
विश्वोत्पत्तीपासून असुरराष्ट्रसंस्थापनकालापर्यन्त.

विविध शरीरलक्षणें व भाषा यांची संगति.- वंशनिर्णयार्थ आपणांस असें पाहिलें पाहिजें की, विशिष्ट भाषांचा आणि विशिष्ट शरीरलक्षणांचा सबंध जुळवितां येतो काय ? हा संबंध जुळविण्यासाठी मनुष्याचें शरीरलक्षणांवरुन वर्गीकरण अवश्य होतें; व शरीरलक्षणांनी वर्गीकरण करतांना विशिष्ट लक्षणांची चिराचिरता पहावी लागते. ती पाहून शरीरलक्षणशास्त्राची रचना करावी आणि भाषा आणि शरीरलक्षणें यांचे ऐक्य कोठें कोठें दिसतें ते पहावें. शरीरलक्षणांचा इतिहास लिहीतांना अर्थात् प्रारंभ मनुष्याच्या मानवकल्प पूर्वजापासून केला पाहिजें. शरीरलक्षणांच्या साहाय्यानें कांही इतिहास मिळविंता येईल आणि कांही भाषासाहित्याच्या साहाय्यानें मिळेल, आणि कांही ठिकाणीं या दोहोंची संगतिहि दिसून येईल.

मानवेतिहासार्थ प्रयत्न करणारे जे अनेक ग्रंथकार आहेत त्यांमध्यें बरेच मतभेद आहेत. आम्ही येथें प्राचीन मानवेतिहासविषयक कीनचीं {kosh Ethnology by A. H. Keane.}*{/kosh} मतें देतों. कीनचें भारतीय रक्ताच्या घटनेसंबंधानें मत मागें (विभाग १पृष्ठ ८१ पहा) दिलेच आहे. भौतिक शोधांवरुन शास्त्रज्ञांनी बनविलेल्या प्राणिवर्गाच्या आणि त्यांतल्यात्यांत सस्तन प्राण्यांच्या सोपानपरंपरेंत मनुष्यप्राण्याचें स्थान कोणतें आहे व विशिष्ट रीतीनें मर्कटादि मानवकल्प प्राण्यांशीं मनुष्याचें नातें काय आहे हें ठरविणें हें भौतिक मानवशास्त्राचे अभ्यासक्षेत्र गणलें जातें. मानवशास्त्रांत मनुष्याचें प्राचीनत्व, मूलवंश, निरनिराळे मानववंश ओळखण्याचीं चिन्हें, त्याचें मिश्रण, भाषेची उत्पत्ति, भिन्न भाषांचा विकास, भाषांवरुन मानववंश ओळखणें, बाहय परिस्थितीचा मानववंशावर व त्यांच्या विकासावर होणारा परिणाम, कुटुंब, गोत्र, जमात, राष्ट्र इत्यादिकांच्या घटनेचा इतिहास इत्यादि विषय येतात.