प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग
प्रकरण २ रें.
विश्वोत्पत्तीपासून असुरराष्ट्रसंस्थापनकालापर्यन्त.
सजीवांतील विशेष गुणधर्म निर्जीवांतहि आढळतात:- सजीव वस्तूमध्यें जे विशिष्ट भेदभावदर्शक गुणधर्म दिसून येतात ते येणेंप्रमाणे (१) बाहय कारणांशिवाय अन्तर्गत कारणांनी अत्पन्न होणारी गति, (२) अन्तर्भागांतून होणारी वाढ, (३) क्षोभशीलता किंवा संवेदनाशीलता, (४) श्वासोच्छवासक्रिया, आणि (५) अपत्योत्पादन.
अगदी साधे सचेतन जीव हे एकपेशीमय असतात, अशा पेशी उर्फ गोलकामध्यें (१) मूलघटक (nucleus) (२) जीवनरस आणि (३) गोलकवेष्टन असे तीन निरनिराळे भाग असतात. परंतु ज्या एकपेशीमय जीवामध्यें इतके तीन निरनिराळे भाग असतात तो जीवकोटींतील अगदीं आद्यस्वरुपी जीव होय असं म्हणतां येत नाही. विकासतत्वानुसार पाहिलें तर, असा एकपेशीमय जीवहि. त्याहून अधिक साध्या स्वरुपाच्या जीवापासून उत्पन्न झालेला असला पाहिजें, असे म्हणावें लागतें. आणि अशा प्रकारचे अवयवरहित व विशिष्ट रचनारहित जीव जिवंत स्थितींत हल्लींहि आढळतात, असें कित्येक जीवशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. उदाहरणार्थ, मोनेरा (Monera) किंवा क्रोमॅसिया (Chromacen) हे जीव म्हणजे ओल्या खडकावर पसरलेली श्लेष्ममय पदार्था- (gelly) प्रमाणे दिसणारी आवरणें (coatings) होतं; आणि उच्च प्रतीच्या सूक्ष्मदर्शकयंत्रांतून पाहिल्यास हे जीव जीवनरसांचे बनलेले लहान लहान निळ्या-हिरव्या रंगाचे सूक्ष्म गोलपिंड असतात असें आढळून येतें. मोनेरा आणि ज्यांच्यामध्यें योगवाही क्रिया (Catalysis) दिसून येते अशा निरिंद्रिय वस्तू यांच्यामध्यें जो एकच फरक दिसून येतो तो फक्त कर्बग्रहण (Carbon assimilation) संबंधाचा होय. परंतु मोनेरा व उच्च दर्जाचा सेंद्रिय जीव यांच्यामध्यें प्रत्येक बाबतींत, मोनेरा व निरिंद्रिय स्फटिक यांच्यामधील फरकापेक्षां अधिक मोठा फरक असतो. गोलकांतील मूलाधारभूत द्रव्य म्हणजे जो जीवनरस त्यांच्यामध्ये C कार्बन, H हायड्रोजन, O आक्सिजन, N नायट्रोजन, P फॉस्फरस, S सल्फर इत्यादि, इतकी मूलद्रव्ये असतात; म्हणजे निरिंद्रिय सृष्टीमध्ये नाहीं असें एकहि अधिक मूलद्रव्य या जीवनरसामध्यें नसतें.