प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण १० वें.
चीनचा वैज्ञानिक इतिहास
अर्धामुर्धा ऐथिहासिक काळ.— (ख्रि. पू. २६९८ - ते २३५७) या काळांतील गोष्टींचा कालानुक्रम बराच निश्चित समजतो. कारण या काळांत चिनी लोकांनीं एक प्रकारची युगात्मक कालगणनापद्धति सुरू केली व ती तेव्हांपासून आतांपर्यंत चालू आहे. चिनी लोक साठ वर्षांचें एक युग मानतात. ख्रि. पू. २६३७ हें त्यांचें पहिल्या युगाचें पहिलें वर्ष होतें व इ. स. १८३५ साल हें त्यांच्या ७५ व्या युगांतलें बत्तिसावें साल होतें. युगांतील साठ वर्षांपैकीं प्रत्येकास निरनिराळें नांव असून कोणतेंहि साल सांगतांना अमक्या युगाचें अमकें वर्ष असें सांगण्याची चिनी लोकांची पद्धति आहे.
या काळांतील ग्रंथांत ख्रि. पू. वीस शतकें इतक्या प्राचीन काळांतहि सूर्यचंद्राचीं ग्रहणें बरोबर नोंद करून ठेवलेलीं आढळतात. सौर वर्ष ३६५ दिवसांहून नक्की किती मोठें असतें हें प्राचीन चिनी लोकांस माहीत होतेंसें दिसतें. परंतु त्यांचे महिने चांद्र असून ते एक आड एक २९ व ३० दिवसांचे असत. त्यामुळें बारा महिन्यांत सौर वर्षाला ११ दिवस कमी येत. चांद्र व सौर गणनेचा मेळ घालण्याकरितां मधून मधून ‘अधिक महिने’ धरीत असत. उदाहरणार्थ १९ सौर वर्षांचे २३५ चांद्र, मास धरीत असत. सात दिवसांचा एक असे महिन्याचे चार आठवडे ही साप्ताहिक गणनाहि प्राचीन काळापासून चीनांत चालू आहे.
प्राचीन काळापासून पेकिंगचें चिनी सरकार ज्योतिर्मंडळाकडून सू-याच्या उदयास्ताचे काल, ॠतूंचे प्रारंभकाल, इत्यादि सांवत्सरिक ज्योतिर्गणिताविषयींच्या माहितीचें पत्रक प्रांतोप्रांतीच्या सरकारी अधिका-यांच्या उपयोगाकरितां प्रसिद्ध करीत असतें. शिवाय बारा पानांचे एक पंचांग करून त्यांत एक एका पानावर एक एका महिन्यासंबंधाची वार, नक्षत्र, ग्रह, स्नान-प्रवास-गृहप्रवेश-विवाह-श्मश्रु इत्यादि कृत्यांकरितां शुभाशुभ मुहूर्त, वैगेरे माहिती दिलेली असते. प्रत्येक महिन्याच्या आरंभीं त्या महिन्यांत काय गोष्टी घडतील व काय गोष्टी कराव्या याबद्दल सूचना दिलेल्या असतात. शिवाय भविष्यें वर्तविण्यास उपयोगी पडणारें कोष्टकहि या पंचांगास जोडलेलें असतें.
वर सांगितलेल्या कालगणनाविषयक सुधारणांपैकीं ब-याचशा ख्रि. पू. २६९८ च्या सुमारास होऊन गेलेल्या व्हांग-टे नांवाच्या बादशहानें केल्या. शिवाय याच बादशहाच्या कारकीर्दीत तांब्याच्या, लोखंडाच्या वगैरे खाणी सांपडून तरवारी, चिलखतें, धनुष्यबाण वगैरे युद्धोपयोगी हत्यारें करण्याचे कारखाने सुरू झाले; नवीन प्रकारचीं वाद्यें करण्याची युक्ति निघाली, व स्वरांविषयींचे नियम ठरविले जाऊन संगीतशास्त्राचा पाया घालण्यांत आला; व पाण्यावरु तरून जाण्याकरितां नावा तयार होऊं लागल्या. याच बादशाहाच्या राणीनें रेशमाचे किडे पाळून त्यांच्यापासून रेशीम कसें तयार करावें हें लोकांस शिकविलें. शिवाय जागोजाग गांवें व शहरें बसवून दळणवळणाकरितां सडका बांधण्याचा उपक्रम याद बादशहानें केला. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांनां शिक्षण देण्याकरितां सार्वजनिक शाळा स्थापण्याच्या का-यास या बादशहानें आरंभ केला. या काळांतील इतर बादशहांनीं नवी गोष्ट कोणतीहि न करतां वरील गोष्टींतच अधिकाधिक सुधारणा केली.