प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण १५ वें. : इतिकर्तव्यता.

उपप्रकरण ५ वें.
चातुर्वर्ण्यसंस्थापन.

आजची समाजस्थिति.- वरील प्रकारचें यंत्र निर्माण करण्याची आवश्यकता काय आहे हें ठरविण्यासाठीं आजच्या परिस्थितीकडे थोडेंसें लक्ष दिलें पाहिजे.

प्रत्येक मनुष्य कोणत्या वर्णाचा आहे हें ठरवावयाचें तें कोणीं ठरवावयाचें ? आज संस्कारास अधिकारी कोण आहे हें कांहीं अंशीं पूर्वीं ठरलेलें आहे आणि कांहीं अंशीं भिक्षुक ठरवितात या कामीं पैसे देणार्‍या यजमानास खूष करण्याचा बोजा संस्कारकर्त्यावर पडतो. यजमानाला तर खूष केलें पाहिजे आणि धर्माप्रमाणें म्हणजे संस्कारकर्त्याच्या समजुतीप्रमाणें जो धर्म आहे त्याप्रमाणेंहि त्याला वागलें पाहिजे. भिक्षुकांमध्यें कांहीं बाबतींत एकमत आहे आणि त्यामुळें त्यांजवर यजमान फारसा पेंच लावूं शकत नाहीं. तरीपण आपल्या आश्रयदात्यांस खूष करण्यासाठीं आणि त्याबरोबर वेदोक्त कर्म कोणाच्या घरीं चालवावें यासंबंधानें भिक्षुकवर्गामध्यें प्रचलित असलेल्या कल्पनांचा अतिक्रम न होऊं देण्यासाठीं भिक्षुकाला पुष्कळदां दुटप्पी वर्तन करणें भाग पडतें. वेदोक्त आणि पुराणोक्त क्रियांमधील फरक गृहस्थ ब्राह्मणांमध्यें देखील आज शेंकडा पन्नासांस कळत नसेल, आणि ब्राह्मणेतर ज्ञातीमध्यें तर बहुतेकांनां कळत नाहीं. यामुळें पुष्कळदां यजमानाची समजूत करण्यासाठीं त्यास मी वेदोक्त करतों म्हणून सांगावयाचें आणि करावयाचें मात्र पुराणोक्त असें भिक्षुकांस करावेंच लागतें. येथें भिक्षुकास लबाड म्हणून दोष देऊन उपयोगी नाहीं. हा दोष भिक्षुकांचा नाहीं, तर समाजांतील नियंत्रणाभावाचा आहे. आपल्या समाजाच्या धर्मनिर्णयार्थ व संस्कारनिर्णयार्थ घटनेमध्यें जे दोष आहेत त्यांतील मुख्य येणेंप्रमाणें:-

१. एका गांवांतील निर्णयाच्या दुसर्‍या गांवांतील निर्णयाशीं असलेल्या असंबंध.
२. वर्णनिर्णय करण्याची जबाबदारी परावलंबी लोकांवर असणें.
३. यासंबंधीं झालेल्या निवाड्यांची अप्रसिद्धि.
४. पूर्वींचे निवाडे व पुढील कार्यक्रम यांमध्यें असलेला असंबंध.
५. शेवटचा निर्णय कोणाकडून घ्यावा यासंबंधानें अनिश्चिय.
६. निरनिराळ्या मतांचीं निरनिराळीं पीठें असल्यामुळें आचार्यपीठांच्या अधिकार्‍यांमध्यें उत्पन्न होणारें द्वैत.
७. राजे व आचार्य यांच्यामध्यें एकमेकांचे निकाल एकमेकांनीं मान्य करावे याविषयींच्या ठरवांचा अभाव.