प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण १५ वें. : इतिकर्तव्यता.
उपप्रकरण ५ वें.
चातुर्वर्ण्यसंस्थापन.
चातुवर्णर्ण्याचें संरक्षण व संस्थापन.- गुणकर्ममूलक चातुर्वर्ण्य आणि संस्कारभेदमूलक चातुर्वर्ण्य या दोहोंमधील असंगति टाळ्यासाठीं समाजांत खालील गोष्टी अवश्य आहेत.
एक तर मनुष्याला पुन्हां म्हणजे मोठ्या वयांत संस्कार कर्मानुरूप करण्याची सोय असणें. ही धर्मशास्त्रांत आहेच. मनुष्य भ्रष्ट झाला असतां, किंवा दुसर्या कांहीं (व्रात्यस्तोमादि) प्रसंगीं प्रौढ वयांत संस्कार करण्याची धर्मशास्त्राची अनुज्ञा आहे.
चातुर्वर्ण्याच्या संरक्षणासाठीं वापरलेली दुसरी एक पद्धति म्हटली म्हणजे दंडाचा उपयोग करून लोकांस स्ववर्णाचें कर्म करावयास लावणें. या पद्धतीचा उपयोगहि धर्मशास्त्रकारांनीं आणि नीतिवेत्त्यांनीं उपदेशिला आहे.
पण या दोन्ही पद्धतींचा उपयोग करणें अशा वेळेसच शक्य आहे कीं, जेव्हां राजा म्हणजे राजाची सभा (कोर्ट) वर्णरक्षण हें कार्य आपलें आहे असें समजेल आणि संस्कार करणारे भिक्षुक या प्रकारच्या राजसभेच्या नियमनानें बद्ध असतील. ही गोष्ट हिंदु राज्यांत शक्य होती; कां कीं, धर्माधिकारी म्हणजे राजसभेचा मुख्य हा भिक्षुकांतीलच विद्वान् असे. तरीपण दंडाची पद्धति पुस्तकांत असली तरी पूर्वकालीन राजांनीं ती फारशी वापरली असेल असें वाटत नाहीं.
आपली कर्तृत्वशक्ति आपल्या वडिलोपार्जित वर्णकर्मास योग्य असो अगर नसो, आपण आपलें कर्म करीत रहावें, अशी वृत्ति सर्व जनतेंत असणें अशक्य आहे. आणि आपआपल्या वर्णाचीं कर्में करण्यास लोकांस भाग पाडणें राजासहि कठिण आहे. ब्रह्मकर्म ब्राह्मणाच्या मुलानें केलें पाहिजे असा जरी कायदा राजानें केला तरी ब्राह्मणपुत्रास तें कर्म येतच नसेल तर त्याच्याविरुद्ध तो कायदा अमलांत तरी कसा आणावयाचा? शिवाय कोणीं कोणतें कर्म करावें हें जनतेच्या बदलणार्या गरजांवरून व संख्येवरून ठरतें. गरजांत बदल झाला नाहीं असें धरलें तरी आजच्या विशेष कर्में करणार्या जातींत जननाचें व मृत्यूचें प्रमाण इतर जनतेच्या जनन-मृत्यूच्या प्रमाणानेंच राहील हें कसें शक्य आहे? अर्थात् जन्मतः जे संस्कार मुलाला होतील त्यावर त्या मनुष्याचें भावी कर्म ठरविणें हें युक्तीस व व्यवहारास सोडून आहे. राजदंडानें देखील याचा निर्णय होणें शक्य नाहीं. ही अडचण पूर्वींपासून भासत आली आहे. प्रत्यक्ष मनुस्मृतीच्या कालीं ब्राह्मण लोक तिसापेक्षां अधिक निषिद्ध धंदे करीत होते. वस्तुस्थिति आणि कर्मानुरूप वर्ण असावा हें तत्त्व यांची तडजोड करण्याचा प्रसंग आला असतां ही तडजोड दोन प्रकारे होणे शक्य होती. राजांनीं ब्राह्मणांचीं जानवीं तोडून त्यांनां ब्राह्मण वर्णांतून घालवून देण्याची व्यवस्था करणें किंवा आपद्धर्म म्हणून वर्णकर्माबाहेरील कांहीं कर्में कशींबशीं धर्मशास्त्राखालीं आणणें. पहिली व्यवस्था व्यवहार्य नव्हती; कारण, राज्यें अनेक, त्या सर्वांवर ताबा कोण चालविणार? पोथी लिहीत बसणार्या ग्रंथकारास दंडानें भिन्न कर्तव्यमार्गावर आणणें कसें शक्य होणार? दुसर्या प्रकारची म्हणजे “आपद्धर्म” म्हणून वस्तुस्थिति व तत्त्व यांची तोंडमिळवणी करण्याची पद्धति मनूनें उपदेशिली. कां कीं तीच शक्य व व्यवहार्य होती.
संस्कारानुरूप कर्मनियमन शक्य नव्हतें व नाहीं. कर्मानुरूप संस्कार करणें मात्र शक्य आहे. तथापि ग्रंथकार असा उपदेश करितांना दिसतात कीं, ज्यानें त्यानें आपल्या वर्णाचें कर्म करावें. या प्रकारच्या उपदेशाचा अर्थ काय? अर्थ हाच कीं, स्वकर्मचा अभिमान हा समाजांत जागृत रहावा, वर्णविषयक अभिमान उत्पन्न व्हावा. हा अभिमान समाजास उपयोगी आहे. ब्राह्मणपुत्रास आपण ब्राह्मण आहों हा अभिमान श्रेष्ठ आचरण करण्यास प्रवृत्त करील; क्षत्रियास क्षत्रियत्वाचा अभिमान धैर्यशौर्य देईल; वैश्यास वैश्यवर्णाभिमान दारिद्र्याची लाज उत्पन्न करील; आणि हें सर्व हितावह आहे.
चातुर्वर्ण्यसंस्थापनेसाठीं प्रस्तुत समाजामध्यें जे फेरफार करावे लागतील असें दिसतें त्यांचें सामान्य स्वरूप येणेंप्रमाणें:-
(१) बाह्य व हिंदू मिळून जो समाज होतो त्या सर्व समाजास एकस्वरूपता देणें, आणि चातुर्वर्ण्याच्या नियमांत त्या सर्व समाजास आणणें.
(२) प्रत्येक व्यक्तीचा वर्ण क्रियेप्रमाणें ठरावा हें आत्यंतिक ध्येय साधण्यासाठीं व्यक्तींचा वर्ण ठरविण्याचा प्रयत्न करणें. हें कधीं कधीं होतें असें दृष्टीस पडतें. कांहीं ठिकाणीं राजास क्षत्रियस्थान द्यावयाचें व त्याचा त्याप्रमाणें संस्कार पुन्हां करावयाचा असा प्रकार आहे.
(३) (अ) व्यक्तींचें वर्णानुसार वर्गीकरण करावयाचें झाल्यास त्याला जातिकुलादींच्या बंधनांपासून मुक्त करणें. (आ) किंवा त्याच्या जातीसच विशिष्ट वर्णामध्यें घालणें. म्हणजे रामा न्हावी याचा वर्ण ठरवावयाचा झाल्यास एक तर रामा न्हावी कोणत्या कुलांत अगर जातींत उत्पन्न झाला त्याचा विचार न करतां तो कोणतें कर्म करतो आहे एवढेंच पाहून त्याचा वर्ण ठरविणें. किंवा त्या व्यक्तीच्या कर्माचा विचार न करतां तो कोणत्या जातीचा आहे एवढेंच पाहून त्याची पदवी ठरविणें व त्या जातीस तिचें कर्मवैशिष्ट्य पाहून निश्चित स्थान देणें.
आज लोकांनां चातुर्वर्ण्याचें तात्त्विक दृष्टया मात्र रक्षण करावयाचें आहे. त्याचे आत्यंतिक परिणाम स्वीकारण्याची कोणाचीच तयारी नाहीं. जे ब्राह्मण लोक आज शेंकडों वर्षें ब्राह्मणाचीं कर्में न करतां क्षत्रियवैश्यांचीं कर्में करीत आहेत, ते ब्राह्मण ही पदवी सोडावयास तयार आहेत काय? महाराष्ट्रीय ब्राह्मणांत शेंकडा ऐशीपासून नव्वद लोक क्षत्रियवैश्यांचीं व प्रसंगीं शूद्रांचींहि कर्में करीत आहेत. जेव्हां लोकांचे हितसंबंध तत्त्वाच्या उपेक्षेवरच अवलंबून आहेत तेव्हां तें तत्त्व अमलांत कोणीच आणूं चहाणार नाहीं. त्या तत्त्वाचा आग्रह धरून बसणार्या मनुष्यास अनंत शत्रू उत्पन्न होऊन सुधारणा पुढें जाणार नाहीं. आज व्यक्तीच्या कर्मानुरूप संस्कार करावेत हें तत्त्व पुढें आणलें तर त्यास ब्राह्मणच विरुद्ध होणार. शिवाय आज हिंदु मनुष्यास जीं जातिकुलादि बंधनें आहेत तीं तोडून तो केवळ वर्णबंधन लावून घ्यावयास तयार होईल किंवा नाहीं हाहि प्रश्न आहे. समजा, एखाद्या कायस्थ प्रभूस किंवा सोनारास त्याचे विशिष्ट गुण पाहून समाजाच्या कोणी तरी काल्पनिक मुख्यानें ब्राह्मणवर्णांत घातलें तर त्यास देखील आपल्या ज्ञातींतील इतर लोकांस सोडून जाणें बरें वाटेल किंवा नाहीं हा मोठा प्रश्नच आहे.
पुढेंमागें वर्णविषयक अभिमान वाढून व्यक्तिच्या गुणावरून त्याचें वर्णनियमन करणें शक्य होईल अशी आपण कल्पना केली तरी आज ती गोष्ट शक्य नाहीं. आज शक्य एवढेंच आहे कीं, व्यक्तीचा वर्ण न ठरवितां व्यक्ति ज्या समूहांत आहे त्या समूहाचें सामान्य स्वरूप पाहून त्या समूहाचा वर्ण ठरवावा; म्हणजे कायस्थ प्रभु, कोष्टी व चांभार या निरनिराळ्या ज्ञातींस कोणत्या वर्णांत घालावें याविषयीं विचार ठरवावा. बहुतेक प्रयत्न याच दृष्टीनें होत आहेत. कोणतीहि व्यक्ति आपल्या जातींतून सुटून जाण्याचा प्रयत्न न करितां ती ज्या समूहांत असेल त्या समूहाचें चातुर्वर्ण्यांत स्थान उच्च असावें म्हणून खटपट करीत आहे, आणि आपणास जीं व्यवस्थापत्रें दृष्टीस पडतात त्यांत सबंध जातीचाच विचार केलेला आढळतो.
चातुर्वर्ण्यसंस्थापनेंत एक मोठी अडचण म्हटली म्हणजे अनेक कर्में अशीं आहेत कीं, त्यांचें वर्गीकरण कोणत्या वर्णकर्मामध्यें करावें याविषयीं निश्चित विचारपरंपरा नाहीं. उदाहरणार्थ, लेखनकर्म घ्या. हें ब्राह्मणाचें कर्म आहे कीं क्षत्रियाचें कर्म आहे ? हें ब्राह्मणाचें कर्म असेल तर कायस्थ प्रभूस ब्राह्मणवर्णांत घातलें पाहिजे. तसेंच शूद्राचें कर्म सेवा असें आपण समजतों. सेवा म्हणजे काय? ब्राह्मणहि सेवाच करीत आहे किंवा नाहीं? लोकांचे संस्कार करणें ही सेवाच नव्हे काय? क्षत्रियकर्म म्हणजे संरक्षण ही देखील सेवाच नव्हे काय? व्यापार म्हणजे लोकांच्या गरजा पुरविणें ही देखील सेवाच नव्हे काय? सेवा याचा अर्थ व्यक्तीची सेवा असा केला तर आणखी एक अडचण उत्पन्न होते. स्वयंपाक करणें हें सेवाधर्मांत घालतां येईल आणि खाटकाचा धंदा करणें हें व्यापारांत गणलें जाईल. ही दृष्टी वापरली असतां ब्राह्मण स्वयंपाकी व खाटीक
यांच्या दर्जाचा निर्णय कसा ठरवावयाचा?
वरील अडचणी लक्षांत घेतल्या असतां आपणांस चातुर्वर्ण्यसंस्थापनेविषयीं जे नियम बांधावयाचे ते बरेचसे समाजप्रवृत्ति पाहूनच बांधले पाहिजेत हें दिसून येईल. अर्थात् आज सर्व प्रश्न सुटणें शक्य नाहीं. परंतु सर्व प्रश्न सोडविण्याची आज आवश्यकताहि नाहीं. चातुर्वर्ण्यसंस्थापनेसाठीं समाज एखादें कोर्टसारखें यंत्र आज निर्माण करील तर तेवढेंहि पुरें आहे. याप्रमाणें प्रत्यक्ष कार्य करितांना अनेक तर्हेची उपयुक्त विचारमालिका उत्पन्न होईल.