प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण १५ वें. : इतिकर्तव्यता.

उपप्रकरण ५ वें.
चातुर्वर्ण्यसंस्थापन.

चातुर्वर्ण्यांतर्गत कल्पना.- चातुर्वर्ण्य म्हणजे काय हें ठरविण्यासाठीं चातुर्वर्ण्यान्तर्गत कल्पनांचें पृथक्करण करूं. त्यांत अंतर्भूत होणार्‍या कल्पना येणेंप्रमाणें आहेत:-

(१) समाजांत चार वर्ण आहेत, अधिक नाहींत.
(२) ते चारहि वर्ण मिळून समाज पूर्ण होतो.
(३) प्रत्येक वर्णाचें पृथक्त्व गुणभिन्नतामुलक आणि कर्तव्यभिन्नतामूलक आहे.
(४) एकाच शरीराचे निरनिराळे अवयव असतात त्याप्रमाणें प्रत्येक वर्ण हा चातुर्वर्ण्यचा अवयव आहे म्हणजे निरनिराळे वर्ण आणि सर्व समाज यांच्यामध्यें अवयव आणि अवयवी हा संबंध आहे.

चातुर्वर्ण्यसंरक्षणाचा उपदेश लोकांस होत असतो याचें कारण तद्विषयक भावना लोकांत जागृत ठेवावयाची असते हें होय. कोणत्याहि संस्थेच्या संरक्षणार्थ तिच्याविषयीं सद्भावना लोकांत जागृत असावी लागते. चातुर्वर्ण्याच्या संरक्षणार्थ अवश्य असलेली भावना म्हणजे वर्णविषयक भावना होय. कोणतीहि भावना जागृत करावयाची हें कार्य असलें म्हणजे त्या भावनेशीं विरोध करणार्‍या ज्या भावना असतील त्या भावनांचें गौणत्व उत्पन्न करणें प्राप्त होतें. जेव्हां राष्ट्रविषयक भावना जागृत करावयाची असेल तेव्हां व्यक्तीच्या किंवा एखाद्या जातीच्या खासगी हिताच्या भावना राष्ट्रहितभावनेपेक्षां दुर्बल होतील असा प्रयत्‍न करावा लागतो. मनुष्यांमनुष्यांत अनेक कारणामुळें ऐक्य अगर द्वैत उत्पन्न होतें. मनुष्यांमनुष्यांत जातिमूलक, मतमूलक, कर्ममूलक, द्वैतमूलक, द्रव्यमूलक भेद असतात. आणि त्यामुळें त्यांचे निरनिराळे वर्ग बनतात. चातुर्वर्ण्यसंरक्षणाचें तत्त्व वारंवार सांगण्यांत येतें त्याचा हेतु हाच कीं, इतर भावनांपेक्षां वर्णविषयक भावना बलवान् व्हावी, जातिविषयक, कुलविषयक इत्यादि भावनांचें नियमन वर्णविषयक भावनांनीं व्हावें. जातिविषयक भावना आणि कुलविषयक भावना या वर्णविषयक भावनेच्या प्रसंगीं साधक असतात आणि प्रसंगीं विरोधीं असतात. जेव्हां त्या विरोधी होतील तेव्हां त्यांचें नियंत्रण झालें पाहिजे.

अध्ययनाध्यापनादि क्रिया, संरक्षणादि क्रिया, द्रव्योत्पादक व्यवहार व इतर लोकांची सेवा या सर्व क्रिया ज्या समाजांत नाहींत असा समाज असणें अशक्य आहे. अर्थात् चातुर्वर्ण्याचें अस्तित्व स्वाभाविक आहे. जी गोष्ट स्वाभाविकच आहे तिचें संरक्षण तें काय करावयाचें? चातुर्वर्ण्य जर गुणकर्ममूलकच असेल तर चातुर्वर्ण्यसंरक्षणाची जरूरच नाहीं. कोणीहि व्यक्ति घेतली तरी ती या वर्णांच्या क्रियांपैकी कोणती तरी क्रिया करीतच असणार आणि प्रत्येक वर्णाच्या क्रिया करणार्‍या व्यक्ती समाजांत असतातच; मग संरक्षणसंबंधानें एवढा आक्रोश कां? उत्तर एवढेंच कीं, आपल्या देशांतील वर्णभिन्नत्व केवळ क्रियाभिन्नत्वमूलकच नाहीं.