प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण १५ वें. : इतिकर्तव्यता.
उपप्रकरण ५ वें.
चातुर्वर्ण्यसंस्थापन.
चातुर्वर्ण्यसंस्थापन म्हणजे काय?- चातुर्वर्ण्य म्हणजे काय, त्याचें संरक्षण कसें कसें करावयाचें, याविषयीं समाजांतील विद्वान् वर्गांत वागत असलेल्या कल्पना बरोबर असोत अगर नसोत, चातुर्वर्ण्य राहिलें पाहिजे हें समाजतत्त्व कांहीं सुटलेलें नाहीं. चातुर्वर्ण्य मृतकल्प झालें आहे, पण जें अजून आहे तें टिकविलें पाहिजे ही भावना कायम आहे. चातुर्वर्ण्य मृतकल्प झालें आहे ही भावना आहेच. पण तिजबरोबर हीहि भावना आहे कीं, जर तें मृतकल्प झालें आहे तर त्याची संस्थापना पुन्हां झाली पाहिजे. चातुर्वर्ण्यसंस्थापना कशी काय होईल, यासंबंधानें मात्र फारसा विचार झालेला नाहीं. चातुर्वर्ण्य म्हणजे काय याचीच कल्पना जर स्पष्ट नाहीं तर चातुर्वर्ण्यसंस्थापनेसंबंधाची कल्पना कितपत स्पष्ट असणार?
कांहीं वर्षापूर्वीं धर्मशास्त्राच्या ज्ञानाबद्दल सर्व हिंदुस्थानभर प्रसिद्ध अशा एका काशीक्षेत्रांतील महामहोपाध्यांस चातुर्वर्ण्यसंस्थापन म्हणजे काय आणि ती कशी करावयाची असा डॉ० केतकर यांनीं प्रश्न केला असतां, हें काम भगवंताचें आहे, चातुर्वर्ण्यसंस्थापना म्हणजे धर्मसंस्थापनाच होय; धर्मसंस्थापना म्हणजे दुसरें कांहीं नांहीं आणि ती करण्यास जो समर्थ असेल तो ती कशी करावी हें ठरवील, अर्थात् ती संस्थापना करण्यास “संभवामि युगे युगे” या वचनाप्रमाणें अवतारी पुरुषच पाहिजे, अशा मोठ्या प्रश्नाशीं इतरांस कांहीं एक कर्तव्य नाहीं, अशा अर्थाचें उत्तर मिळालें. हें उत्तर ऐकलें त्या वेळेस जितकें उडवाउडवीचें वाटलें तितकें तें आज वाटत नाहीं. चातुर्वर्ण्यसंस्थापनेस ज्या खटपटी लागणार त्या पार पाडण्यासाठीं मोठा निग्रही व कर्तृत्वाचा आणि अधिकाराचा पुरुष पाहिजे, किंवा विशिष्ट ध्येयाप्रमाणें कार्य करणार्या व सामान्यपणें बलवान् अशा मंडळीची अनेक वर्षें टिकेल अशी परंपरा पाहिजे असें वाटतें. ती परंपरा उत्पन्न होईल अशी भावना असलेल्या लेखकाचें सध्यांचें कर्तव्य एवढेंच आहे कीं, विषयाची फोड करून कार्यक्षेत्र लोकांपुढें मांडावयाचें.