प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण १५ वें. : इतिकर्तव्यता.
उपप्रकरण ५ वें.
चातुर्वर्ण्यसंस्थापन.
सामाजिक विचारांत घटनाविषयक विचार अत्यंत प्रमुख होत. हिंदूंच्या घटनाविषयक विचारांचे प्रकार येणेंप्रमाणें:- (१) समाजामध्यें जे अनेक अवयव आहेत त्यांचा संबंध अधिक निकट करणें (२) समाजामध्यें केंद्रवर्ती सत्ता उत्पन्न करणें (३) समाजास विशिष्ट मार्गानें जावयास आणि आपलें संवर्धन करावयास दिशा उत्पन्न करणें (४) समाजाच्या प्रयत्नांचा कांहीं संस्कार इतर समाजांवर झाला असल्यास तो संस्कार दृढ करणें (५) समाजाचा अन्य समाजांशीं संबंध निश्चित करणें इत्यादि. जातिभेद मोडा म्हणून जरी ओरड चालली आहे तरी समाजाचे अवयव जोडून त्यांत केंद्र उत्पन्न करण्याचा प्रयत्न झालेला नाहीं. जुनी केंद्र जो ब्राह्मणवर्ग त्याच्या महत्त्वनाशासाठीं मात्र प्रयत्न सुरु आहे. समाजास दिशा दाखविण्याचे प्रयत्न जे झाले त्यांत आर्थिक सुधारणा करा, औद्यागिक सुधारणा करा, जातिभेद मोडा, या प्रकारच्या ठरींव वाक्यांपलीपडे मजल क्वचितच गेली. समाजघटनाविषयक जुन्या नियमावलीचा अभ्यास करणें व त्या नियमावलीच्या अनुराधानें कार्याचें भावी स्वरूप ठरविणें याविषयीं विचार फारसा झालेला नाहीं. चवथ्या आणि पांचव्या प्रकारचें विचार तर फारच थोडे व्यक्त झाले आहेत. सध्यांच्या सामाजिक चळवळींतील प्रमुख प्रश्न खालीलप्रमाणें आहेत.
(१) परदेशांतील हिंदुत्व किंवा हिंदुत्वांश व त्या संबंधानें आपल्या समाजाची वृत्ति.
(२) बाह्यांसंबंधानें समाजाची वृत्ति.
(३) ब्राह्मणांचें समाजांतील स्थान व कार्य आणि ब्राह्मणांविरुद्ध चळवळ.
(४) चातुर्वर्ण्य उर्फ समाजघटनेचें जुनें धर्मशास्त्र आणि त्याची आजची स्थिति व भवितव्य.
या प्रश्नांपैकीं पहिल्या तीन प्रश्नांसंबंधानें बरेंच विवेचन वरती आलेलें आहे. येथें आपणांस चौथ्या प्रश्नाचाच किंचित् विस्तारानें विचार करावयाचा आहे.
समाजनियमनासंबंधानें जीं तत्त्वें लोकांमध्यें वागत असतात त्या तत्त्वासंबंधानें समाजामध्यें निरनिराळ्या प्रकारें विचार झाला पाहिजे. ते प्रकार असे.
(१) त्या तत्त्वांनुरूप समाजाचें नियमन होत आहे काय?
(२) त्या तत्त्वांनुरूप समाजनियमन होत नसेल तर तें व्हांवें म्हणून काय प्रयत्न केला पाहिजे?
(३) तीं तत्त्वें हितावह आहेत काय?
(४) तीं तत्त्वें हितावह नसल्यास त्यांचा नाश कसा करावा आणि त्यांच्या ऐवजीं कोणतीं तत्त्वें अमलांत आणावीं.?
चातुर्वर्ण्यसंरक्षण हें तत्त्व आज हजारों वर्षें समाजनियमन करीत आहे, निदान या तत्त्वानुरूप समाजनियमनाचा प्रयत्न होत आहे. सध्यां चातुर्वर्ण्याचें तत्त्व समाजांत कितपत पाळलें जात आहे आणि तें अमलांत आणतांना काय अडचणी उत्पन्न होतात, आणि तें अमलांत आणण्यासाठीं काय खटपटी कराव्या लागतील याचा विचार होणें अत्यंत अवश्य आहे. आपण जो विचार केला पाहिजे तो हा कीं, आपण एक तर चातुर्वर्ण्याचें तत्त्व पूर्णपणें अमलांत आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे किंवा तें अमलांत आणण्याचा प्रयत्न आज जो हजारों वर्षें झाला त्याचे आचारावर कायद्यावर आणि समाजस्थितीवर झालेले परिणाम काढून टाकण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
आपल्या समाजिक प्रयत्नांची दिशा आणि समाजनियमनाची विचारपद्धति यांचें ऐक्य असलें पाहिजे. विचार एका दिशेनें आणि प्रयत्नांची गति दुसर्या दिशेनें असें नसावें. जर चातुर्वर्ण्यसंरक्षणासंबंधाची खटपट अनवश्यक व अहितकारक असेल तर ती तशी आहे हें दाखविलें पाहिजे. चातुर्वर्ण्याच्या तत्त्वांचें समाजनियमनाच्या दृष्टीनें महत्त्व काय आहे हें आपण पाहूं.