प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ८ वें.
पश्चिमेकडे भ्रमण.

कनिष्ठाचारप्रवृत्तीचें मूळ.- आतां जिप्सींच्या परदेशगमनाविषयीं थोडासा विचार निराळ्या तर्‍हेनें करूं. भारतीय परदेशीं गेले असतां त्यांची सांपत्तिक स्थिति कशी काय होते हें पाहून एतद्विषयक कांहीं समाजशास्त्रीय तत्त्व सिद्ध होतें कीं काय हें पाहिलें पाहिजे.

जेव्हां एखादी जात जेथें अत्यंत भिन्न अशी समाजरचना आहे अशा परकीय देशांत जाते तेव्हां तिला तेथील निरनिराळ्या धंद्यांत पडण्यास अनेक अडचणी उत्पन्न होतात. नवीन ठिकाणची विद्या आणि भाषा यांचें ग्रहण झालें नाहीं तर ते परदेशीं गेलेले लोक अत्यंत निकृष्ट अशा स्थितींत जातात. जेव्हां संस्कृत विद्येचा आपल्यांच देशांत र्‍हास होऊं लागला तेव्हां अनेक वैदिक शास्त्री आणि श्रौती, भिक्षेकरी, स्वैंपाकी किंवा फराळाचे दुकानदार बनलेले आपण आपल्या डोळ्यांसमोरच पाहिले आहेत. लोकांनीं येथून इराणाकडे आणि एशियामायनरकडे गमन केलें तें सामुच्चयिक केलें त्यामुळें तेथील लोकांत मिसळून जाण्याची आवश्यकता किंवा संधि देखील त्यांनां कमी मिळाली असावी आणि त्यांचा सोंवळेपणा बराच कालापर्यंत टिकला असावा.

इतर जनतेमध्यें अनेक धंद्यांत पडण्यासाठीं अवश्य असणार्‍या शिक्षणाचा अभाव, लोकांचें दैव सांगण्याचें काम करितांना होणार्‍या प्राप्‍तीची सोय, सोंवळेपणाची भावना या सर्व कारणांनी या भारतीयांच्या समाजाचें स्वरूप कांहीं निश्चित प्रकारचें बनले असावें. आजचे धंदे पाहिले म्हणजे तेच धंदे त्यांचे  पूर्वापार होते असें म्हणतां येत नाहीं. कां कीं, परकीय मनुष्यास पोट भरण्यास क्षेत्र कांहीं नियमित प्रकारचेंच असतें. आज जुन्या तर्‍हेचा सुशिक्षित मनुष्य जर परक्या देशांत गेला तर त्यास जीवनास उपयुक्त अशी कोणतीहि कला येत नसावयाची आणि त्यास मिळालेल्या वाङ्‌मयविषयक शिक्षणाचा उपयोग त्यास इतरत्र करितां येणार नाहीं. शिवाय सुशिक्षित मनुष्य अंगमेहनतीला देखील कमी तयार असणार. इत्यादि गोष्टींमुळेंच कांहीं थोड्याबहुत इंग्रजी शिक्षणानें सुशिक्षित झालेल्या यूरोपांत व अमेरिकेंत गेलेल्या हिंदूस हस्तसामुद्रिक किंवा फलज्योतिष इत्यादि विद्यांवर पोट भरावें लागतें ही गोष्ट वैयक्तिक परिभ्रमणांत जर आज दिसून येत आहे तर प्राचीन सामुच्चयिक परिभ्रमणांत कां दिसून येणार नाहीं ? अशा लोकांनां या धंद्यांपलीकडे जर कांहीं कामें करवयाचीं झालीं तर पशुपालनसारखीं, कीं त्यांत अत्यंत थोड्या कुशलतेची जरूर आहे अशींच कामें मिळणार. यांचें कलाकौशल्य जर लोकांच्या नेहमींच्या उपयोगाचें नसेल तर त्यांस भटकत हिंडावें लागणार. जिप्सी चोहोंकडे भटकतात यांचें कारण आर्थिक आहे. या जातींच्या अंगांत किंवा रक्तांत कांहीं निराळेपणा आहे हें नव्हे. जेथें नवीन धंदा शिकण्यास शाळा नसत. आणि कोणासहि धंदा शिकावयाचा झाल्यास यूरोपांतील श्रेणीं (Guilds) मुळें अनेक अडचणी उपस्थित होत असत, तेथें नवीन धंदे शिकणें देखील जड जात असे. आज श्रेणी जरी मृत झाल्या आहेत तरी श्रेणींनीं उत्पन्न केलेली भावना मृत झाली नाहीं. अजून देखील यूरोपांत कलाकौशल्याचे धंदे शिकण्यास आपल्या विद्यार्थ्यांस काय अडचणी उत्पन्न होतात आणि पुष्कळ ठिकाणीं विद्यार्थ्यांस साहाय्य करण्यास सरकारी प्रयत्‍न देखील कसा फुकट जातो हें आपण पाहतोंच. इंग्लंपेक्षां पूर्व यूरोपांत गिल्ड पद्धति फारच कडक असे. एका धंद्यांतील मनुष्याचा दुसर्‍या धंद्यांत प्रवेश होणें फ्रान्समधील राज्यक्रांतीच्या पूर्वीं किती कठिण असे आणि एक धंद्याचा मनुष्य दुसर्‍या जरा खालच्या धंद्यांतील मनुष्याकडे आपण जणूं काय स्वर्गांत बसलों आहों आणि दुसरा नरकवासी आहे इतक्या तुच्छतेनें कसा पहात असे हेंहि आपणांस  परिचित आहे. अशा सामाजिक पद्धतीच्या कालीं स्वसंरक्षाणाची जबाबदारी असलेल्या या जिप्सींनां अनेक हलकीं कामें करावीं लागलीं, घाणेरड्या संवयी जडल्या आणि त्यांच्या सोंवळेपणाचें पर्यवसान मृतपशुमांसादनांत झालें यांत नवल तें कोणतें ? या गोष्टी सांगण्याचा हेतु हा कीं, जर जाट लोकांसारखे शूर लोक घाणेरडीं कामें करतांना दृष्टीस पडले तर त्यावरून हिंदुस्थानांतील एखादी घाणेरडी जात त्यांत संमिश्र झाली असेल असें खात्रीपूर्वक म्हणतां येणार नाहीं हें लक्षांत यावें;  आणि आपल्या विविध कालच्या आणि विविध प्रकारच्या परदेशगमनापासून काय काय परिणाम होत गेले याची यथार्थ कल्पना व्हावी. आज परदेशीं गेलेल्या लोकांची पुढेंमागें स्थिती जिप्सींच्या सारखीच होईल कीं काय असा विचार आपल्या मनांत उभा राहतो आणि यासाठीं अर्वाचीन परदेशगनाचें सविस्तर ज्ञान आपण करून घेतलें पाहिजे. अर्वाचीन परदेशगमनाचा इतिहास जिप्सींच्या इतिहासाप्रमाणेंच अनेक दुःखदायक गोष्टींनीं भरला आहे.