प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ८ वें.
पश्चिमेकडे भ्रमण.

जिप्सी.- पश्चिमेकडे सोकोत्रापर्यंत झालेलें चाच्यांचें भ्रमण आणि कांहीं बौद्ध संप्रदायाचे पश्चिमेकडील अवशेष यांबद्दल मागें सांगितलेंच आहे. आतां प्रत्यक्ष यूरोपाकडे वळलें पाहिजे. भारतीयांचा परदेशांशीं संबंध पहातांना यूरोपांत जिप्सी नांवानें प्रसिद्ध असलेल्या भ्रमण करणार्‍या जातींस विसरतां कामा नये. जेथें जेथें या जाती संघरूपानें दृष्टीस पडतात तेथें तेथें त्यांचे पोषाख वगैरे पाहून कोणाहि भारतपरिचितास भारतीयांची आठवण झाल्याशिवाय रहात नाहीं. जर्मनींत गेलेल्या एका महाराष्ट्रीय तरुणास हा कोणीतरी आपल्यांतला आहे असें समजून त्याच्याशीं जिप्सी भाषेंतच बोलण्याचा एका जिप्सीनें प्रयत्‍नहि केला होता. या जिप्सींविषयीं आपणांमध्यें फारशी माहिती नाहीं. या विषयावरील वाङ्‌मय इंग्रजींत फारसें नसून जर्मन भाषेंत आहे असें मित्र {kosh Memoirs of London Anthroplogical Society Vol. III (१870).}*{/kosh} यांच्या एका लेखावरून आणि नामदार रमणभाई नीलकंठ यांनीं पुण्यास भरलेल्या पहिल्या प्राच्य परिषदेंत वाचलेल्या मार्मिक निबंधावरून व्यक्त होतें. असो.

जिप्सींची माहिती हिंदुत्वाच्या अवशेषांत न देतां हिंदूंच्या अपसृष्टीच्या इतिहासांत यावयाची कां कीं, जिप्सी हे  हिंदु रक्ताचे असून पुढें परकीय झाले. तथापि प्राचीन बहिर्देशगमनाबरोबर यांचीहि माहिती दिल्यास ती अधिक मनोरंजक होईल. सुशिक्षित नेत्यांशिवाय जे बहिर्देशगमन होतें त्याचा परिणाम काय होतो हें जिप्सींच्या उदाहरणावरून स्पष्ट होणार आहे. परदेशीं गेलेल्या अर्वाचीन भारतीयांची स्थितीहि आज आहे त्यापेक्षां अधिक शोच्य झाली असती. परंतु पुष्कळशा पौरस्त्य लोकांपेक्षां ब्रिटिश राज्यकर्तें बाहेर गेलेल्या भारतीयांची बरीच काळजी घेतात यामुळें सदरील लोकांची स्थिति कांहींशी बरी आहे. याविषयीं सविस्तर माहिती पुढें येईलच.

जिप्सी हे लोक भारतीय खरे तथापि ते येथून केव्हां गेले, जे गेले ते कोणत्या प्रदेशांतील आणि कोणत्या जातीचे होते, इत्यादि प्रश्न अजून पूर्णपणें सुटावयाचेच आहेत असें आम्हीं समजतों.

हे लोक भारतीय असतां त्यांस जिप्सी हें नांव पडण्याचें कारण एवढेंच कीं, हे इजिप्‍तमधून आपल्या देशांत आले असावे असा इंग्रज लोकांचा प्रथम समज असे. त्यांच्या भाषा अभ्यासिल्या जाऊन जेव्हां त्यांचें सादृश्य भारतीय भाषांशीं दिसून आलें तेव्हां हे लोक हिंदुस्थानांतून गेले असावे असा समज झाला. आजकालच्या अनेक इंग्रजी कादंबर्‍यांतून अनेक निरनिराळे लोक जिप्सींच्या टोळ्यांत जाऊन सामील झाले, आणि जिप्सींनीं अमुक मुलास चोरून नेलें, त्याचें पुढें अमुक झालें, अशा गोष्टी येतात.

लोकसंख्या.- जिप्सी सर्व यूरोपखंडांत आणि पश्चिम आशिया, सैबेरिया, इजिप्‍त उत्तर आफ्रिका, अमेरिका व आस्ट्रेलियांतहि आढळतात. यांची नक्की लोकसंख्या कळत नाहीं. यूरोपमधील यांची गणती केलेले आंकडेहि परस्परविरोधी व अविश्वसनीय असे आढळून येतात. यांची यूरोपमध्यें सर्वांत मोठी संख्या हंगेरीमध्यें ट्रान्सलेथोनिया या प्रांतांत आढळते. हा आंकडा जरी बराच जुन्या काळचा (१८९३) आहे तरी तो बहुतेक बरोबर असून विश्वसनीय असावा असें वाटतें. त्या वेळीं यांचीं संख्या २,७४, ९४० असून त्यांपैकीं बहुतेक स्थाईक झाले होते व केवळ ९००० भटकत फिरणारे होते. यानंतर यांची मोठी संख्या रुमानियामध्यें दोनपासून अडीच लाखांपर्यंत आढळते. याखेरीज इतर प्रांतांत यांची संख्या अनुक्रमें, युरोपांतील टर्की १,१७,००० (१९०३), पैकीं बल्गेरिया ५१,००० व पूर्व रुमेलिया २२,०००; सर्व्हिया ४१,०००; बोस्निआ आणि हर्जेगोविना १८,०००; ग्रीस १०,०००; ऑस्ट्रिया १६,०००; जर्मनी २,०००; फ्रान्स २,०००; इटली ३२,०००; स्पेन ४०,००० रशिया ५८,०००; पोलंड १५,०००; स्वीडन आणि नॉर्वे १५०००; डेन्मार्क आणि हॉलंड ५०००; इराण १५,०००; ट्रान्सकॉकेशिया ३०००; आशियांतील टर्की अजमासें एक दीड लाख; ग्रेट ब्रिटन सुमारें १२०००; याप्रमाणें आहे. एकंदर जिप्सींची संख्या दहा लाखांच्या आंतच असावी.

नांवें.- यूरोपीय जिप्सी लोकांची हकीकत सामान्यतः पुढें दिल्याप्रमाणें आहे. यांनां निरनिराळ्या देशांत निरनिराळ्या नांवांनीं ओळखतात, पण मुख्यतः या नांवांच्या दोन शाखा पडतात. पहिल्या शाखेंत बाल्कन द्वीपकल्पांतील बहुतेक लोक येतात व त्यांनां अत्झिंगन, या सामान्य नांवानें ओळखतात. या नांवाचेच अपभ्रंश तुर्कस्थान आणि ग्रीसमध्यें त्शिंगन, बल्गेरिया सर्व्हियामध्यें त्सिंगन, जर्मनीमध्यें झिगनर, इटलींत झिंगरी     असे होतात; व इंग्रजी टिंकर किंवा टिंक्लर हा शब्दहि या शब्दापासूनच निघाला असावा असा कित्येकांचा तर्क आहे. यांच्याच नांवांची दुसरी शाखा इजिप्‍त या शब्दापासून निघालेली आहे. परंतु जिप्सी लोक या संज्ञा कमीपणाच्या मानतात. इंग्लिश ‘जिप्सी’, जर्मनींतील १६ व्या शतकांतील कांहीं लेखांत ‘इजिप्तेर’, स्पॅनिस ‘गितानो’, अर्वाचीन ग्रीक ‘गिफ्तॉस’, या त्या संज्ञा होत. फ्रान्समध्यें यांनां बोहेमिअन म्हणतात व यांखेरीज बालाशि, सारासेनी, अगरेनी, न्युबियानी, इत्यादि अनेक नांवें त्यांनां मिळालीं आहेत.

जिप्सी लोक प्रथम यूरोपमध्यें केंव्हा गेले याबद्दल अनेकांनीं अनेक मतें प्रतिपादन केलीं आहेत. बटैलार्ड (Bataillard) यानें यांचा संबंध हिरोडोटसनें उल्लेखिलेल्या सिगिन्नाइ (Sigynnoi) यांच्याशीं जोडून सहाव्या शतकापूर्वींच बायझन्टाइन लेखकांनीं उल्लेख केलेले कोमोद्रोमॉइ (Komodromoi)  ते हेच असावेत असें म्हटलें आहे. रिएन्झी (Rienzi १832) व ट्रम्प (Trumpp १872) यांनीं हिंदुस्थानच्या ईशान्य भागांतील चंगर लोकांशीं यांचा संबंध जोडला आहे तर द गोएजे (de Goeje) यानें फारसी ‘चंग’ (एक वाद्य) किंवा ‘झंग’ (काळा) या शब्दांशीं यांचा संबंध जोडण्याचा प्रयत्‍न केला आहे. मिक्लॉसिक् (Miklosich) यानें यांचा संबंध पूर्वीं आशियामायनरमध्यें फ्रिजियांत राहणार्‍या अथिंगनॉइ (Athinganoi) नांवाच्या एका विशिष्ट पंथाच्या लोकांशीं जोडला आहे. हे लोक फार शुद्ध आचरणाचे नियम पाळीत व इतरांचा स्पर्श होऊं देत नसत म्हणूनच त्यांस अथिंगनॉइ (मला शिवूं नको) हें नांव पडलें. या ग्रंथकारानें बायझंटाइन इतिहासांतून कांहीं उतारे काढून हे लोक जादूगार, सर्पमांत्रिक, भविष्यकथन करणारे असत असें दाखविलें आहे. पण तेवढ्यावरून ते जिप्सीच होते असें खात्रीनें म्हणता येत नाहीं.