प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ८ वें.
पश्चिमेकडे भ्रमण.
जिप्सी व गुजराथी.- वंजारी, डोम, जाट आणि हिंदुस्थानांतून इराणांत पाठविलेले भाट यांच्याशीं जो यूरोपीय संशोधकांनीं जिप्सींचा संबंध जोडला आहे त्या संबंधाच्या पुराव्यापेक्षां अधिक महत्त्वाचा पुरावा या विषयावर विचार करणार्या रा. रमणभाई नांवाच्या एका नागर ब्राह्मण गृहस्थानें पुढें आणला आहे.
रमणभाई यांचा सिद्धांत असा आहे कीं, गुजराथी आणि राजस्थानी या दोन भाषांचें द्वैत स्थापन होण्यापूर्वीं जी प्रकृतिरूप भाषा होती तीच जिप्सी यांची मूलभाषा होय. हें मत सिद्ध करण्यासाठीं त्यांनीं जो पुरावा पुढें मांडला आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. भारतीयांचा आणि जिप्सींचा संबंध दाखवून तद्विषयक इतकें सूक्ष्म विवेचन करणार दुसरा निबंध आमच्या पाहण्यांत नाहीं. ग्रिअर्सनचें असें मत आहे कीं, जिप्सी हे पंजाबांतील जाटांचें वंशज असावेत. रमणभाई यानीं ‘शूं’ हा शब्द विरुद्ध प्रमाण म्हणून पुढें आणला आहे. ‘काय’ या अर्थीं हिंदुस्थानी अगर मराठी शब्द ‘क’ या व्यंजनानेंच प्रारंभ होणारे आहेत. ‘शूं’ या शब्दाचें जिप्सी भाषेंतील अस्तित्व आपलें कल्पनाक्षेत्र बरेंच संकुचित करतें. नियमित कालांत, आणि नियमित वर्गापासून जिप्सींचा प्रादुर्भाव झाला असावा याचें तें सूचक आहे. रमणभाई आणि ग्रिअर्सन यांची एकवाक्यता होणें अशक्य आहे असें नाहीं. जिप्सींनीं आपल्या परिभ्रमणांत यूरोपांतील अनेक ठिकाणच्या लोकांचा आपल्यामध्यें समावेश केला आहे, ही गोष्ट यूरोपांत सुप्रसिद्ध आहे. जें यूरोपांत झालें तेंच कांहीं अंशी हिंदुस्थानांतहि झालें आहे, अशी सध्यांच्या संशोधकांची समजूत आहेच. जाट आणि डोम या दोहोंचें मिश्रण जिप्सींत झालेलें दिसतें, आणि कदाचित नट, भाट, वंजारी इत्यादि जातींतील व्यक्तींचाहि त्यांत समावेश झाला असावा ही कल्पना संशोधकांनीं पूर्वींच व्यक्त केली आहे. पूर्वींच्या संशोदकांचा समज हाच कीं, जिप्सींचें बहिर्देशगमन दहाव्या शतकांत झालें आसावें आणि रमणभाई यांनीं केलेल्या भाषाविषयक अभ्यासावरून त्याच कालाकडे बोट दाखवितां येईल. जिप्सींच्या परिभ्रमणाचा रस्ता बलुचिस्तानला नेणार्या बोलनघाटांतून किंवा त्याहून उत्तरेस असलेल्या खैबरघाटांतून असला तरी ज्या प्रदेशांत गुजराथी आणि राजस्थानी यांची प्रकृतिरूप भाषा बोलली जात असे त्या स्थलाहून त्यांच्या परिभ्रमणाला सुरुवात होऊन पुढें मार्ग क्रमण करितांना जाटांचें मिश्रण त्यांच्यांत झालें नसेल कशावरून ? तसें झालें होतें असें धरलें तर रमणभाई आणि ग्रिअर्सन या दोघांची एकवाक्यता होते.