प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ८ वें.
पश्चिमेकडे भ्रमण.

गुलामगिरी व तींतून सुटका.- यूरोपांतील रोमानिया, मोलदेविया आणि वालाचिया या भागांत जिप्सींची संख्या अधिक आणि त्यामुळें त्यांचा इतिहासहि तेथें अधिक विस्तृत आहे. रोमानियाचीं दप्‍तरें तपासून पाहिल्यास जिप्सींची माहिती पुढें मागें अधिक सांपडण्याचा संभव आहे. तेथें जिप्सींची समाजघटना येणेंप्रमाणें दिसते. प्रथम त्यांचे दोन वर्ग दिसून येतात. एका वर्गास रोबी अथवा भूमिबद्ध दासवर्ग म्हणतां येईल. दुसरा वर्ग म्हटला म्हणजे भटक्यांचा होय. शिवाय या लोकांचे धंद्यांच्या दृष्टीनें चार वर्ग पाडतां येतात. ते येणेंप्रमाणेः (१) लिंगुरारी म्हणजे सुतार किंवा खुर्च्या तयार करणारे, (२) कालदारी म्हणजे धातूचें काम करणारे लोहार, तांबट इत्यादि, (३) उरसारी म्हणजे अस्वल घेऊन फिरणारे आणि (४) औरारी म्हणजे सोन्याची माती धुणारे.

जिप्सींच्या समुच्चयास शत्र म्हणत. या शत्रावर एक अधिकारी असे त्यास रोमानियामध्यें ‘जूड’ आणि आस्त्रियामध्यें ‘आगा’ असें म्हणत असत. अनेक शत्रें आणि त्यांवरील जूड हे “बुलुबाशा” नांवाच्या अधिकार्‍यांच्या हाताखालीं असत. पुष्कळदां हे बुलुबाशा बाहेरचे म्हणजे जिप्सी नसलेले लोक असत, त्यामुळें यांस फार त्रास होई.

रोबी म्हणून भूमिबद्ध दासांचा वर्ग असे. त्यांची गुलामांप्रमाणें विक्री होई.

१८५६ सालीं मोलदेविया संस्थानांत त्यांची दास्यापासून मुक्तता झाली. १७८१-२ सालांत हंगेरीमधील गुलामगिरी बंद झाली तेव्हां त्यांच्याबरोबर यांची गुलामगिरी बंद झाली. १८ व्या आणि १९ व्या शतकांत त्यांस शिक्षण देऊन एका ठिकाणीं वसाहत करून राहण्यासाठीं उत्तेजन देण्यांत आलें. पण त्या कार्यांत फारसें यश आलें नाहीं.

पोलंडमध्यें या प्रयत्‍नास थोडेंबहुत यश आलें. १८६६ सालापासून जिप्सी हे रोमानियाचे नागरिक बनले आणि आतां तेथील सरकारी आंकड्यांतून रोमानियन आणि जिप्सी असा भेद करीत नाहींत. ते आपली भाषा विसरत चालले आहेत आणि आतां स्थानिक जनतेंत त्यांचा परस्पर विवाहानें समावेश होत आहे. बल्गारियामध्यें १८७८ सालच्या बर्लिन येथील तहान्वयें जिप्सी हे नागरिक बनून त्यांस समान हक्क मिळाले तथापि त्या तहाचा अर्थ निराळा करून त्यांचे ते हक्क ६ जानेवारी १९०६ रोजीं काढून घेण्यांत आले. पुढें जिप्सींनीं आपली कांग्रेस भरवून समान हक्क मागण्यास सुरवात केली आहे.

आतां जिप्सींचा कोणकोणत्या भारतीय जातींशीं संबंध जोडण्यासाठीं खटपट करण्यांत आली आहे याचा विचार करूं. हा विचार करितांना भाषादृष्टीनें झालेला विचार तात्पुरता वगळूं.