प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ८ वें.
पश्चिमेकडे भ्रमण.

छळ.- त्यांचें परकीय बाह्यस्वरूप, त्यांची लोकांस न समजणारी चोरांच्या गुप्‍त भाषेसारखी भाषा आणि त्यांची हातचलाखी, यांमुळें त्यांची गणना उनाड आणि रामोशी लोकांत करण्यांत आली; आणि त्यांस मोठ्या निष्ठुरतेनें वागविण्यांत आलें. पुष्कळ ठिकाणीं त्यांचे कायदेशीर खून करण्यांत आले. कधीं कधीं हे तुर्कांचे गुप्‍त हेर असावेत असें समजण्यांत येत असे. त्यांच्या कधीं कधीं कायदेशीर कत्तली होत. त्यांपैकीं एका कत्तलीचें वर्णन विझेनब्रुक नांवाचा ग्रंथकार करितो. तो म्हणतो, पांच माणसांनां चाकावर उताणें घालून छिन्नविच्छिन्न करण्यांत आलें. नऊ माणसांनां फांशीं दिलें आणि तीन पुरुष व आठ बायका यांचीं डोकीं उडविलीं. ही गोष्ट १४।१५ नोव्हेंबर १७२६ रोजीं घडली. ग्रेटब्रिटनमध्यें १५०५ सालीं स्कॉटलंडच्या चवथ्या जेम्सनें देशांतील सर्व इजिप्शिअन (जिप्सी) लोकांनां फांशी देण्यास किंवा शिक्षा करण्यास परवानगी दिली. १६३६ सालीं हॅडिंग्टन येथें इजिप्शिअन पुरुषांनां फांशीं द्यावें आणि बायकांनां बुडवून ठार मारावें असा हुकूम सोडण्यांत आला आणि गरोदर स्त्रियांस चाबकांनीं मारावें आणि त्यांचे गाल भाजावेत असें फरमाविण्यांत आलें. गाल व पाठ यांवर डाग देणें ही सामान्य शिक्षा असे. १६९२ सालीं हंगेरीमध्यें जिप्सींनां खूप बडवून आम्ही माणसें खातों असा अपराध त्यांच्याकडून कबूल करून घेतला आणि तसा तो अपराध कबूल करून घेतल्यानंतर त्यांस फांशीं देण्यांत आलें. पुढें चौकशीअंतीं समजलें कीं, जीं माणसें जिप्सींनीं खाल्लीं म्हणून जिप्सींनां फाशीं दिलें तीं माणसें जिवंतच होतीं.

यूरोपांतील कायद्यांमध्यें जिप्सींची स्थिति वारंवार बदलत आहे. जिप्सींच्याविरुद्ध कायदे आजहि बंद झाले नाहींत. १९०० सालीं देखील जर्मनीमधून जिप्सींची हकालपट्टी करण्याचा हुकूम सुटून त्यांस हद्दपार करण्यांत आलें. इंग्लंडांत अनेक जर्मन जिप्सी या हुकुमामुळें आलें.  १९०४ सालीं जिप्सींनीं फेरीवाल्यांचे परवाने द्यावेत किंवा नाहींत याचा पुन्हां विचार करणें प्रशियाच्या प्रतिनिधिसभेस अवश्य वाटलें आणि १९०६ सालीं प्रशियाच्या प्रधानानें जिप्सींचा उपसर्ग बंद करण्यासाठीं विशेष नियम केले.