प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ८ वें.
पश्चिमेकडे भ्रमण.

लुरी - स्लाव्ह व इतर अनेक यूरोपीय जिप्सींचें विशिष्ट लक्षण म्हणजे त्यांची उघड दिसून येणारी गायनकलेंतील कुशलता होय. ह्या लक्षणामुळें इराणच्या ‘लुरी’ लोकांशीं देखील त्यांचा निकटसंबंध असावा असें दिसून येतें. हे लुरीलोक स्पष्टपणें जिप्सी आहेत, कारण ते भटकत फिरतात, चोरी करितात, दैव सांगतात व भाटलोकांचा धंदा करितात; आणि मागें सांगितलेंच आहे कीं ते स्वतःस मुसुलमान म्हणवून पुनर्जन्मावर विश्वास ठेवतात. फर्दुसीच्या शहा-नामा या नांवाच्या ग्रंथांत असें आढळतें कीं, इ. स. ४२० च्या सुमारास हिंदुस्थानचा महाराजा शंकल यानें इराणांतील ससनीयन घराण्याचा राज्यकर्ता बहराम गौर याकडे पुरुष व स्त्रिया मिळून दहा हजार भाट पाठविले होते. भाट लोकांनां लुरी म्हणत होते. त्यांनां जमिन, धान्य व गुरें यांच्या देणग्या दिल्या होत्या. तथापि प्रथमपासूनच इकडे तिकडे भटकत फिरवण्याची त्यांनां संवय होती. हल्लीं जिवंत असलेल्या त्यांच्या वंशजांच्या शासनसंस्थेविषयीं आणि आचारसंबंधीं खालील माहिती उपलब्ध आहे.* -

“यूरोपीय जिप्सी लोकांशीं यांचें फार स्पष्ट सादृश्य आहे. ते एक विशिष्ट भाषा बोलतात. प्रत्येक टोळीवर एक राजा असतो. पोरें चोरून नेणें व भामटेगिरी करणें ह्या कृत्यांकरितां त्यांची फार प्रसिद्धी आहे. त्यांचे मुख्य करमणुकीचे प्रकार म्हणजे दारू पिणें, नाचणें व गाणें हे आहेत. त्यांच्याबरोबर नेहमीं सहासात अस्वलें व माकडें असतात व त्यांनां ते सर्वप्रकारचे विचित्र खेळ करावयास शिकवितात. प्रत्येक समूहांत दोनतीन मनुष्यें स्वतःस भविष्यवादी म्हणवितात व त्यामुळें प्रत्येक समाजांत त्यांचा ताबडतोब शिरकाव होतो.”

ह्या हकिकतीवरून व विशेषतः अस्वलें व माकडें यांचा उल्लेख केला आहे त्यावरून तुर्कस्थान व रुमानिया येथील नुरी नांवाचे लोक व सीरियामधील अस्वलें घेऊन फिरणारे रिसिनरी लोक या लुरींच्याच जमातीपैकीं असावेत असा सिद्धांत काढतां येतो. ह्यांची एक टोळी इंग्लंडमध्यें गेली आहे. इजिप्‍तमध्यें सीरियामधील रिसिनरी लोक आढळतात. त्यांच्यापैकीं बरेचजण स्वदेशाबाहेर गेलेल्या जाट व डोमलोकांना जाऊन मिळाले असावेत असा संभव आहे. हे लोक इजिप्‍तमधूनच युरोपांत गेले त्यामुळें इजिप्‍तवरून त्यांस जिप्सी हें नांव पडलें.

नाट किंवा नटलोक हे हिंदुस्थानांतील भटकत फिरणारे लोक आहेत. त्यांचें यूरोपीय जिप्सींशीं सादृश्य आहे. इराणांतील लुरी लोकांची व त्यांची उत्पत्ति एक असावी असाहि तर्क प्रकट झाला आहे. जिप्सी लोकांची इतर लक्षणें त्यांच्यांत आहेत. लसुणाशिवाय प्रत्येक वस्तू ते खातात.