प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १४ वें.
राजकीय घडामोडी व भौगोलिक ज्ञानविकास.

स्तिमित युगाच्या अखेरीचा काळ - सरतेशेवटीं रोमन साम्राज्याच्या नाशानंतरचा यूरोपांतील अराजकतेचा काल एकदांचा संपला. 'क्रूसेड' युद्धांनीं पाश्चात्त्य राष्ट्रांच्या विचारशक्तीस योग्य वळण लावून दिलें. प्रवाश्यांच्या त्रोटक माहितीवरून ज्ञात झालेल्या प्रदेशांकडे लोकांचें लक्ष वेधलें जाऊन त्यांच्याबद्दल जास्त माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला जाऊं लागला. अज्ञात जगाची ओळख करून घेण्याच्या जिज्ञासेंत संप्रदायप्रसाराची हौस व द्रव्यार्जनाची इच्छा यांची भर पडून कित्येक लोकांनीं खुष्कीच्या मार्गानें पूर्वेकडील दूरदूरच्या प्रदेशांत प्रवास केले. यांपैकींच एक स्पेनमधील बेंजामिन आफ ट्यूडेला नामक गृहस्थ इ .स. ११६० मध्यें खुष्कीनें कॉन्स्टांटिनोपलला जाऊन तेथून हिंदुस्थानांत व पूर्वेकडील कांहीं बेटांत प्रवास करून इजिप्तच्या मार्गानें तेरा वर्षानंतर पुन्हां यूरोपला परत आला.