प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १४ वें.
राजकीय घडामोडी व भौगोलिक ज्ञानविकास.

स्वा-या व भौगोलिक शोध यांचा अन्योन्याश्रय- आतांपर्यंत झालेल्या विवेचनावरून, पश्चिमेच्या दिगंतापर्यंत रोमनसाम्राज्य वाढलें असून ग्रीक मध्यआशियांत व गंगातटाकापर्यंत येऊन पोंचले होते, आणि बुद्धसंप्रदायप्रविष्ट व मगधसंमुखभारतवर्षीयांनीं आपले हात पश्चिमेकडे ट्रान्सकॉकेशियापर्यंत तर पूर्वेकडे जपानपर्यंत पसरविले होते असे दिसून आलें आहे. म्हणजे, जगाचे ग्रेटब्रिटनपासून जपानपर्यंत बरेंच दळणवळण चालू असावें, व जगांतील राष्ट्रांनां एकमेकांस अत्यंत दूरचे नसले तरी आपल्या बरेच दूरचे प्रदेश माहीत असावेत. या जगद्विभागांच्या एकमेकांशीं व्यवहारास कारक झालेल्या भावना म्हणजे विजयोन्मुख समाजांची किंवा राष्ट्रांची महत्वाकांक्षा आणि संप्रदायप्रसारभावना या होत. भौगोलिक शोधांस महत्त्व आलें ते या दोन कारणांमुळेंच होय. अलेक्झांडर हा ज्याप्रमाणें जिकण्यास उत्सुक होता त्याप्रमाणेंच जिंकण्याच्या प्रयत्नाचें अंग म्हणून भौगोलिक शोध करण्यासहि तत्पर होता. भौगोलिक शोध व जिंकण्याकरितां स्वा-या यांचा अन्योन्याश्रय नेहेमी दिसून येतो. रोमन कायद्यांत जो शास्त्रार्थ सांगितला आहे, तो शोध व सत्ता यांचें एकत्व प्रस्थापित करतो. एखाद्यानें जर नवीनच बेट शोधून काढलें तर तें त्याच्या मालकीचें होई. हा रोमन कायद्याचा नियम लोकांस शोध करण्यास व आपली संपत्ति वाढविण्यास कारण झाला. या अन्योन्याश्रयामुळें राजकीय इतिहासाबरोबर शोधांचा म्हणजे भौगोलिक इतिहासहि या विभागांत देणें योग्य होईल.

भौगोलिक शोधांस कारण प्रदेशजिगीषा हे होय असें विधान अरब व यूरोपीय राष्ट्रें यांविषयीं ब-याच अंशीं करतां येईल. तथापि व्यापारविषयक बुद्धि नवीन शोधांस कारण झाली नव्हती, किंवा केवळ शास्त्रीय जिज्ञासा कार्य करीत नव्हती असें म्हणतां येणार नाही.

भौगोलिक शोधांचा इतिहास द्यावयाचा, म्हणजे प्रथमतः कोणीहि कांहीहि कारणामुळें भूभागाचें प्रामाणिक म्हणजे प्रत्यक्षावलोकनानें वर्णन करण्याचा जेथें कोठें प्रयत्न केला असेल तीं स्थळें आज उपलब्ध असलेल्या प्राचीन अवशेषांत हुडकावयाचीं. असलीं स्थळें आपल्या प्राचीन वाङ्मयांत नाहींतच असें म्हटलें तरी चालेल. तथापि प्राचीनकाळच्या दुस-या कांहीं राष्ट्रांकडून भूगोलवर्णनाचा थोडाबहुत प्रयत्न केला गेला होता.