प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण १४ वें.
राजकीय घडामोडी व भौगोलिक ज्ञानविकास.
प्राचीन मिसरी लोकांचें भूगोलज्ञान.- ख्रिस्तपूर्व चौदाव्या शतकाच्या पलीकडील काळांत, मिसर देशच्या शूर राजांनीं तरवारीच्या जोरावर आपला अंमल नाइल नदीच्या मुखाच्या आसमंतांतील त्रिकोणाकृति भूप्रदेशापासून दक्षिणेस तिच्या उगमापर्यंत व पूर्वेकडे असुरियापर्यंत बसवीत नेला होता. इजिप्त मधील प्राचीन चित्रलिपीच्या शिलालेखांत व असुरियांतील कीलाकृति लिपीच्या शिलालेखांत सैन्यांच्या हालचारी, विजय इत्यादि गोष्टींसंबंधीं अनेक विश्वसनीय उल्लेख आले आहेत.