प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण १४ वें.
राजकीय घडामोडी व भौगोलिक ज्ञानविकास.
भौगोलिक शोधांची वाढ.- प्राचीन काळीं आगगाड्या, आगबोटी, वगैरे साधनांनीं सर्व जगाचे हल्लींप्रमाणें एकत्रीकरण झालें नसल्यामुळें, भौगोलिक शोधांचा इतिहास द्यावयाचा म्हणजे निरनिराळ्या संस्कृतींच्या केंद्रांकडून या बाबतींत झालेल्या प्रयत्नांचा वेगवेगळा विचार केला पाहिजे. यांपैकीं चिनी व यूरोपीय केंद्राशिवाय इतर केंद्रांच्या प्रयत्नांची आपणांस आज कांहीच माहिती उपलब्ध नाहीं म्हटलें तरी चालेल. चिनी प्रवाश्यांनी आपल्या प्रवासाची जी वर्णनें लिहून ठेविलीं आहेत त्यांवरून मिळणारी कांहीं माहिती प्रथमारंभीं दिलीच आहे. तथापि भौगोलिक शोधांच्या वाढीचा अथपासून इतिपावेतों सुसंगतवार असा इतिहास भूमध्यसमुद्रगत यूरोपीय केंद्रासंबंधींच काय तो लिहितां येतो. या भूमध्यसमुद्रगत केंद्राच्या ज्ञानाची परंपरा प्राचीन मिसरी लोकांपासून सुरू होऊन फिनीशिया, ग्रीस व रोमन ही तीन राष्ट्रें मिसरी लोक व आजचीं यूरोपिय राष्ट्रें यांना जोडणा-या साखळींतील मधले मुख्य मुख्य दुवे आहेत.