प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण १४ वें.
राजकीय घडामोडी व भौगोलिक ज्ञानविकास.
ग्रीकांचे भूगोलज्ञान.- हन्नो व हिमिल्को यांच्या मागून लवकरच आशियामायनरच्या किना-यावरील व इजीअन समुद्रांतल्या बेटांतील ग्रीक वसाहतवाल्यांची आरमारी शक्ति फिनीशियन सत्तेशीं जोरानें स्पर्धा करूं लागली; आणि या दृष्टीने हर्क्युलीसच्या स्तंभापलीकडे केलेल्या पहिल्या ग्रीक जलपर्यटनाच्या उल्लेखास विशेष महत्त्व आहे. मॅसीलिआ (मार्सेल) च्या फोसीअन वसाहतींतील एका पिथिअस नांवाच्या खलाशानें तेथील महत्तम दिवस किती मोठा होतो तें पाहून त्या बंदराचे अक्षांश काढले पुढें ख्रि. पू. ३३० च्या सुमारास ज्या वेळीं तो उत्तर दिशेकडे सोने, कथील व अंबर वगैरे हीं कोठून येतात तें शोधण्यास निघाला, त्या वेळीं त्यानें आपल्या मुक्कामांचा स्थलनिश्चय वरील पद्धतीनेंच केला होता. पिथिअसनें स्वतः लिहिलेली हकीकत आज उपलब्ध नाहीं; परंतु त्यानें बिस्केच्या उपसागराच्या किना-या किना-यानें जाऊन व इंग्लिश खाडी ओलांडून ब्रिटनच्या किना-याचा अगदी उत्तरेकडील बिंदु गाठला होता असें कळते. याच्या पुढें थ्यूलि नामक देश असल्याचा तो उल्लेख करतो, व त्याचा महत्तम दिवसाचा अंदाज बरोबर असला तर हा प्रदेश शेटलंड किंवा कदाचित् आइस्लंड असावा. याच्या पलीकडे जहाजांतून जातां येण्यासारखा समुद्र असल्याचा जो त्यानें संदिग्ध उल्लेख केला आहे त्यावरून पिथिअस हाच उत्तरेकडील ध्रुवप्रदेशांतून प्रवास करून येणारा पहिला ग्रीक इसम असवा असें अनुमान निघतें. या किंवा यानंतरच्या दुस-या पर्यटनांत पिथिअस हा बाल्टिक समुद्रांत प्रवेश करून भूमध्यसमुद्रांत परत आला. पिथिअस मागून या जलमार्गांनीं व्यापारी दळणवळण वाढल्याचें दिसत नाहीं, किंवा पिथिअसच्या पर्यटनाची हकीकत त्याच्या समकालीन लोकांनीं खरी मानल्याचेंहि आढळून येत नाहीं. परंतु आधुनिक इतिहास संशोधन पंडितांनीं पिथिअसच्या हकीकतीचा चिकित्सक बुद्धीनें अभ्यास करून ती आहे असा आपला निर्णय दिला असून पिथिअसच्या हकिगतीस बळकटी आणली आहे.