प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १४ वें.
राजकीय घडामोडी व भौगोलिक ज्ञानविकास.

इत्सिंगच्या ग्रंथांतील भूगोलज्ञान.- इत्सिंगाच्या दुस-या नन हे खि क्वइ निडफा चुएन ग्रंथांत पहिल्यांतील भूगोलाच्या कांहीं नांवांसबंधानें जास्त माहिती मिळते ती अशी:- नालन्दहून ५०० टप्पे म्हणजे ५०० योजनें पूर्वेस गेल्यावर सर्व देशास पूर्वदेश म्हणतात. याच्या टोंकास ट्यूफॉनच्या (म्ह. तुफान उर्फ तिबेट याच्या,) दक्षिणेस असलेल्या काळ्या पर्वतांच्या रांगा आहेत. दक्षिणेस समुद्राची मर्यादा आहे, आणि श्री क्षेत्र देश आहे. आग्नेयीस लंगकार आहे. पूर्वेला द्वारपति आहे. पूर्वेस अगदीं टोंकास लिनी [चंपा] देश आहे. येथील लोक फार धार्मिक असून तिन्ही पवित्र वस्तूंत (त्रिरत्नांस) फार मानतात.

दक्षिण समुद्रांतील देशासंबंधानें इत्सिंग असें म्हणतो:- पश्चिमेकडून सुरूवात केल्यास पहिल्यानें पोलुस्से [सुमात्रा] देश लागतो. नंतर मलय आहे. यालाच शिलीफोयॉ देश म्हणतात. पुढें महासिन देश [सिंहपुरा ?] त्यानंतर कलिंग देश, त्यानंतर तानतान देश, त्यानंतर पानपान देश, नंतर पोली, त्यानंतर किउलुन, त्यानंतर फोशा इपलो [श्रीभोज व बली ?] त्यानंतर अशेन आणि मोकि आमन व दुसरी बेटें येणेप्रमाणें देश लागतात.

इत्सिंग म्हणतो कीं, हे सगळे देश बुद्धाच्या संप्रदाय नियमांस फार मान देतात. ते बहुतेक हीन यानाप्रमाणें चालतात, परंतु मलयामध्यें महायानाप्रमाणें चालणारेहि थोडे लोक आहेत. यांपैकीं कांहीं बेटांचा व्यास १०० ली, कांहीचा कांहीं शेंकडे ली आणि कांहींचा १०० योजनें आहे.

चंपा [कोचीनचीन] चें दक्षिण टोंक शकिंग [सायगॉन?] हे आहे. या देशाचे लोक सम्मतिया [?] आणि सर्वास्तिवादी शाखांचे आहेत. याच्या नैॠत्येस एक महिन्याच्या [मार्गावर] फुनान [कांबोज] आहे. येथील लोक प्रथम रानटी व नग्न रहाणारे होते. ते देवतांच्या साठीं बलिदान वगैरे करीत असत. पण पुढें ते बौद्ध झाले. परंतु एका दुष्ट राजानें तेथील भिक्षूंना हांकून दिलें असल्यामुळें आतां तेथें नास्तिकांशिवाय कोणीच नाहीं. हा जंबुद्वीपाचा अगदीं दक्षिणेकडील भाग होय.

ज्या दहा बेटांविषयीं इत्सिंग नेहमीं उल्लेख करतो तीं वर सांगितलेलींच बहुतेक असावींत. तो महाबोधी आणि लिनी (कोचीन चीन) यांमध्यें वीस देश आहेत आणि दक्षिण समुद्रामध्यें सिलोनशिवाय दहा देश आहेत असें म्हणतो. पश्चिमेकडे महासागरापलीकडे पॉलिस्से [इराण] आणि तशि [अरबस्थान] हे देश असल्याचा त्यानें उल्लेख केला आहे. शिली फोशाय [श्रीभोज] याची जागा तिस-या आणि चोविसाव्या पुस्तकांत ठरविलेली दिसते. इत्सिंग म्हणतो कीं त्या ठिकाणीं आठव्या महिन्यांत आणि वसंत ॠतूच्या मध्यावरहि सावली नसते. हे जर चिनी महिने असतील तर श्रीभोज विषुववृत्ताच्या जवळ जवळ सुमात्राच्या पूर्व किना-यावर बंकाच्या समोर येतें. पण चीनमधील महिने अनिश्चित असल्यामुळें श्रीभोज मलाया द्वीपकल्पांत किंवा जावामधील सुरबयाइतकें दक्षिणेस होतें असें ठरविण्यास कांहीं हरकत नाहीं.

एकंदरीत इत्सिंगच्या ग्रंथांमधील टीपांचा व उल्लेखांचा विचार करून आपल्याला तांग घराण्याच्या आरंभीच्या दिवसांत हिंदुस्थान आणि चीन यांमधील मार्ग-जावा, सुमात्रा, मलाक्काची सामुद्रधुनी, ब्रह्मदेश, आराकान आणि तेथून ताम्रलिप्ती असा होता. किंवा यापेक्षा जास्त धोक्याचा मार्ग म्हणजे क्वेदाह पासून सिलोनचा कंडोर बेटें हे व्यापाराचें केंद्र होतें असें दिसतें, आणि येथील मूळ रहिवाश्यांचीच भाषा दक्षिण समुद्राकडे वापरली जात असे. निदान इत्सिंग तरी श्रीभोजास या भाषेचा दुभाषी असलेला आढळतो.

या यात्रेकरूंपैकीं प्रत्येकाच्या वर्णनावरून आपणांस एखाददुसरी गोष्ट  तरी निश्चित कळूं शकते. उदाहरणार्थ, सियुकीच्या हकीकतींत आपणांला सुमात्राच्या आग्नेयीस श्रीक्षेत्र नांवाचा देश, त्याच्या आग्नेयीस कामलोक व त्याच्या पूर्वेस द्वारपति असल्याचें दिलें आहे. कॅप्टन सेंट जॉननें या देशाची जागा म्हणजे ब्रह्मदेशांतील टंगू आणि सँडोवे उत्तर अक्षांश १८ कला २०, पूर्व रेखांश ९४ कला २० याच्या आसपास असावी असे ठरविलें आहे. ब्रह्मदेश व सयाम यामधील हें द्वारच आहे असें म्हणण्यास हरकत नाही. ह्युएनत्संग म्हणतो कीं, लिनीच्या नैॠत्येस यवनांचा (किंवा येनमोनाचा) देश आहे. याबद्दल इत्सिंग कांहीं लिहीत नाहीं. पण कदाचित् तो कांबोज देश असावा.

आतां हिंदुस्थानच्या पश्चिमेकडच्या राष्ट्रांच्या भूगोलज्ञानविषयक प्रयत्नांकडे वळूं.