प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १४ वें.
राजकीय घडामोडी व भौगोलिक ज्ञानविकास.

अलेक्झांडरच्या मोहिमीनें भौगोलिक शोधांत घातलेली भर.- ग्रीको-इराणी युद्धामुळें आशियामायनर देशांतील दूरदूरचे भाग ग्रीक भूगोलशास्त्रज्ञांनां अलेक्झांडरच्याहि अगोदर बरेचसे ज्ञात झाले होते. परंतु ख्रि .पू. ३२९-३२५ मध्ये अलेक्झांडरच्या स्वा-यामुळें अलेक्झांडरनें जी आशियाखंडांत प्रचंड मोहीम केली तिच्यामुळें यूरोपीयांस आशियाखण्डाच्या अफाट प्रदेशासंबंधी बरीच माहिती उपलब्ध झाली. अलेक्झांडरचें सैन्य कास्पियन समुद्रापलीकडील अफाट भूप्रदेश ओलांडून, हिंदुस्थानच्या वायव्य सरहद्दीवरील डोंगराळ मार्गानें हिंदुस्थानांत प्रवेश करून सिंधु व गंगा या नद्यांमधील प्रदेशांत जाऊन तें परत आलें, व त्यामुळें हा काळ भौगोलिक शोधांच्या दृष्टीनें बराच महत्वाचा झाला.

येथून पुढें जग म्हणजे भूमध्यसमुद्राच्या सभोंवतीं सर्व बाजूंस पसरलेला विस्तीर्ण प्रदेश होय असें लोक मानूं लागले व या त्यांच्या कल्पनेंत बरेंचसें तथ्यहि होतें. अले झांडरचा खुष्कीचा प्रवास सिंधु नदीच्या मुखापासून तैग्रिस नदीपर्यंत समुद्रांतून एक संबोधनपूर्ण महत्वाचें जलपर्यटन होऊन संपला व अशा तीनें ग्रीक व भारतीय सं तींमध्यें परस्पर विनिमय होण्यास मार्ग मोकळा झाला.

अलेक्झांडरबरोबरच्या ग्रीक लोकांनीं हिंदुस्थानांतील गांवें, शहरें व त्याचप्रमाणें तेथें उत्पन्न होणारीं धान्यें व देशाचें स्वरूप यांचें वर्णन केलें आहे. यूरोप व हिंदुस्थान यांच्या दरम्यान जलमार्गानें व्यापार सुरू करण्याचें अलेक्झांडरच्या फार मनांत होतें, व त्याच्या निआर्कस नामक सेनापतीनें लिहिलेल्या हकीकतींत ह्या प्रसिद्ध जलपर्यटनाचा उल्लेख केलेलाहि आहे. अलेक्झांडरच्या नावांच्या काफिल्याचा वाटाड्या जो आनिक्रिटस त्यानें या जलपर्यटनाची सविस्तर हकीकत लिहून ठेविली होती पण ती आतां नष्ट झाली आहे. ख्रि .पू. ३२६ च्या आक्टोबर महिन्याच्या प्रारंभीं निआर्कसचें आरमार सिंधुनदांतून बाहेर पडलें. त्यानें आपल्या आरमाराच्या प्रत्येक दिवशींच्या मुक्कामाच्या जागा सुव्यवस्थितपणें उल्लेखिलेल्या आहेत. नंतर तो इराणी आखातामध्यें शिरून सुसा येथें अलेक्झांडर यास येऊन मिळाला. त्या ठिकाणीं अरबस्तानाला वळसा घालण्याकरितां दुसरें एक आरमार तयार करण्याचा त्यास अलेक्झांडरचा हुकूम झाला. पण अलेक्झांडरपुढें लवकरच बाबिलोनियांत ख्रि. पू. ३२३ च्या सुमारास वारल्यामुळें या आरमाराचें पर्यटन तहकूब झाले. [पृ.७१ पहा].

अलेक्झांडरच्या सिल्यूकस, अंटायोकस व टॉलेमी सेनानायकांनीं स्थापन केलेल्या राजवंशाकडून व्यापारी धाडसास प्रोत्साहन मिळत गेलें व त्यायोगानें भौगोलिक ज्ञानाचा सर्व बाजूंनीं विस्तारच झाला. सिल्यूकस निकेटार यानें ग्रीको बॅक्ट्रियन साम्राज्यांची स्थापना करून हिंदुस्थानशीं दळण वळण चालू ठेवलें. सिल्यूकसचा वकील मिगॅस्थिनीझ यानें पाटलिपुत्र म्हणजे हल्लींच्या पाटणा शहरापर्यंत प्रवास करून गंगानदीच्या सुप्रसिद्ध खो-यासंबंधीं खरी माहिती पुरविली.