प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण १४ वें.
राजकीय घडामोडी व भौगोलिक ज्ञानविकास.
अरब लोकांचा हातभार. - सातव्या शतकांत महंमदीयांनीं जे एकामागून एक प्रचंड विजय संपादन केले त्यांबरोबर अरब संस्कृतीची वाढ होऊन बगदाद व कार्डोव्हा हीं शहरें दळणवळणाची केंद्रे झालीं व त्या लोकांचें भूगोलाकडेहि लक्ष गेलें. प्राचीन ग्रीक भूगोलशास्त्रज्ञांच्या ग्रंथांची अरबी भाषेंत भाषांतरें झालीं आणि नवीन देश शोधण्याचे प्रयत्न पुनः अगदीं शास्त्रशुद्ध पायावर सुरू झाले. नवव्या शतकापासून तेराव्या शतकापर्यंत निरनिराळ्या बुद्धिमान अरब प्रवाश्यांनीं दूरदूरच्या देशांतल्या ज्या कांहीं गोष्टी त्यांनीं स्वतः पाहिल्या किंवा ऐकल्या होत्या त्या सर्व लिहून ठेवल्या. त्यापैकीं अतिप्राचीन अरबी प्रवासी सुलैमान नांवाचा एक व्यापारी असून नवव्या शतकाच्या मध्यांत त्यानें इराणी आखातांतून निघून हिंदुस्थान व चीन या देशांत सफरी केल्याबद्दल माहितीचे कागदपत्र उपलब्ध आहेत. अबू झैद यानेंहि हिंदुस्थानसंबंधी माहिती लिहिली आहे. सुप्रसिद्ध मार्कोपोलोच्या जगद्विख्यात व नवयुगारंभक शोधांपूर्वींचे अतिशय महत्त्वाचे असे लेख याचेच आहेत. मसुदी नामक प्रसिद्ध प्रवाश्यानें स्वतःच्या अनुभविक माहितीवर स्पेन व चीन यांमधील सर्व देश, मैदानें, समुद्र, पर्वत वगैरेंचीं वर्णनें केलीं असून त्या वेळीं राज्य करीत असलेलीं राजघराणीं व लोक यासंबंधीं आपल्या 'सोन्याचे प्रदेश' या ग्रंथांत माहिती दिली आहे. मसुदी हा इ .स. ९५६ मध्यें वारला. त्याच्या अवाढव्य निरीक्षणावरून त्याला 'पौरस्त्य प्लिनी' असें नांव देण्यांत येतें. इ. स. ९५० सालीं 'विविध देशांची माहिती' हें पुस्तक लिहिणारा प्रवासी 'इस्तस्त्री, व इस्तस्त्रीच्या ग्रंथाच्या आधारें ९७६ सालीं 'अनेक मार्ग व राज्यें यांच्या माहितीचा ग्रंथ हें पुस्तक लिहिणारा इब्न हौकल हे दोघे मसुदीशीं समकालीन होते. भूगोलशास्त्रावरील अरबी ग्रंथकारांपैकीं सुप्रसिद्ध इद्रिसी यानें १२ व्या शतकाच्या पूर्वार्धांत बरेंच देशाटन करून शेवटीं तो सिसिली. देशांत कायमची वस्ती करून राहिला. त्यानें त्या ठिकाणीं तेथील नॉर्मन राजा दुसरा रॉजर याच्याकरितां एक कड्यांचें खगोल यंत्र तयार करून त्याच्या वर्णनपर एक ग्रंथ लिहिला. समकालीन प्रवाश्यांनीं मिळविलेली सर्व माहिती त्यानें या ग्रंथांत संग्रहीत केली होती.