प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण १५ वें. : इतिकर्तव्यता.

उपप्रकरण २ रें.
राष्ट्रधर्म व राजकीय बल.

राष्ट्रीय सभेची घटना.- राष्ट्रीय सभेच्या घटनेंतील नियम १९०८ पासून पूर्णपणें अमलांत येऊ लागले आहेत. राष्ट्रीय सभेंत जमलेल्या प्रतिनिधींनीं बहुमतानें एखादा फेरफार मंजूर केल्याशिवाय या नियमांत बदल होऊं शकत नाहीं. या नियमानुसार प्रत्येक प्रांतानें निवडून दिलेल्या देशांतील उत्तम उत्तम पुढार्‍यांची एक कमिटी नेमण्यांत येते. हिच्यामधील सभासदांची नांवें राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष दरवर्षीं आपल्या उन्नत स्थानावरून जाहीर करितात. राष्ट्रीय सभेचे माजी अध्यक्ष, चिटणीस व इतर अधिराकारीवर्ग हे सर्व त्या कमिटींत खास (एक्स ऑफिशिओ) सभासद नेमण्यांत येतात व तिला ‘ऑल इंडिया कांग्रेसकमिटी’ असें म्हणतात. हिंदुस्थान सरकारचे जे प्रांतिक विभाग आहेत तेच राष्ट्रीय सभेच्या कामाकरितांहि प्रांतिक विभाग समजण्यांत येतात. प्रत्येक प्रांतांतील कमिटीस प्रॉव्हिन्शिअल कांग्रेसकमिटि असें नांव असून राष्ट्रीय सभेस पाठवावयाचे प्रतिनिधी निवडण्याकरितां  सभा भरविणें, राष्ट्रीय सभेमध्यें चर्चा करण्याकरितां विषय सुचविणें हीं व तदनुषंगिक दुसरीं कामें तिजवर सोंपविलीं आहेत. दरवर्षीं राष्ट्रीय सभा बरखास्त करण्यापूर्वीं पुढच्या वर्षींची राष्ट्रीय सभा कोणत्या ठिकाणीं भरावयाची हें जाहीर करण्यांत येत असतें. नाताळच्या सुट्टीची वेळ सर्व प्रकारच्या प्रतिनिधींस फार सोईची पडत असल्यामुळें आजपर्यंत राष्ट्रीयसभा नाताळच्या सुट्टीचा पहिला दिवस सोडून दुसर्‍या दिवसापासून भरविण्यांत आली आहे. ज्या शहरीं राष्ट्रीय सभा भरावयची असते तेथील लोक या दिवसाच्या सहा महिने अगोदरपासून तिची तयारी करूं लागतात. ते एक स्वागतमंडळ बनवून त्याच्या अध्यक्षाच्या जागीं एखाद्या प्रसिद्ध पुढार्‍याची योजना करितात. पैसे जमवून त्यांचा हिशोब ठेवणें, पत्रव्यवहार करणें, प्रतिनिधींनां उतरण्याकरितां जागेची सोय लावणें, त्यांच्या जेवण्याखाण्यासंबंधीं व्यवस्था करणें इत्यादि कांमांकरितां ह्या स्वागतमंडळाच्या सभासदांतून निरनिराळ्या पोटकमिट्या नेमण्यांत येतात. ह्या पोटकमिट्यांतील मेहनतीचीं कामें करण्याकरितां तरुण उत्साही स्वयंसेवकांचीं पथकें बनविण्यांत येतात. पूर्वीं बहुधा विद्यार्थिवर्गांतूनच हे स्वयंसेवक निवडून घेतले जात. परंतु विद्यार्थ्यांनीं कोणत्याहि राजकीय चळवळींत भाग घेऊं नये असा सरकारच्या विद्याखात्यानें हुकूम सोडल्यापासून ह्या स्वयंसेवकांची भरती धंदेवाईक लोकांमधून करण्यांत येऊं लागली आहे. ह्या स्वयंसेवकांस उत्तम प्रकारें शिस्तीनें वागण्याचें शिक्षण देण्यांत येऊन आपल्या मुख्याच्या हुकुमाप्रमाणें वागण्यास त्यांनां शिकविण्यांत येतें. राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनप्रसंगीं यांच्यावर फार जबर कामाचा बोजा पडतो. निरनिराळ्या भागांतून आलेल्या प्रतिनिधींचें स्टेशनवर स्वागत करणें, त्यांनां गांवामध्यें त्यांच्या उतरण्याकरितां नेमून दिलेल्या ठिकाणीं घेऊन जाणे, आलेल्या प्रतिनिधींचें निरोप व चिठ्ठ्याचपाट्या इकडून तिकडे नेणें व ते सांगतील तीं दुसरीं कामें करणें, अशीं-एकना दोन-अनेक कामें त्यांनां करावीं लागतात. अशा रीतीनें ते कांहीं एक मोबदला न घेतां मोठ्या उत्साहानें व दक्षतेनें एक फार महत्त्वाची कामगिरी बजावितात व त्यामुळें त्यांनां एक प्रकारें शिस्तीचें शिक्षण मिळून सार्वजनिक हिताची वृत्तीहि त्यांच्या अंगीं थोडीफार बाणते. राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष शेवटीं समारोप करितांना ह्या स्वयंसेवकांच्या कामगिरीचा बहुमानपूर्वक उल्लेख करण्यास कधींहि विसरत नाहींत. पोटकमिट्यांकडे सोंपविण्यांत येणार्‍या कामांमध्यें सर्वांत कठिण असें जर एखादें काम असेल तर तें काँग्रेसचा मंडप उभारणार्‍या पोटकमिटीचें असतें. राष्ट्रीय सभेमध्यें प्रतिनिधींची संख्या किमान पक्षीं पांचशें व ज्यास्तींत ज्यास्त हजार किंवा त्याहूनहि अधिक असून त्याशिवाय बरेचसे लोक प्रेक्षक म्हणून येत असतात. त्यामुळें कमींत कमी ५००० माणसें बसूं शकतील एवढा मोठा मंडप तयार करावा लागतो. कांहीं कांहीं राष्ट्रीय सभांमध्यें प्रतिनिधी व प्रेक्षक यांची संख्या दहा हजारांपर्यंतहि जाऊन पोंचतें. १८८९ सालीं सर विल्यम वेडरबर्न यांच्या अध्यक्षतेखालीं भरलेल्या राष्ट्रीय सभेमध्यें एवढी संख्या झाली होती. या सभेस ज्यांनीं पुढें १८९० सालीं पार्लमेंटमध्यें वाढविलेल्या कायदेकौन्सिलांचें पहिलें सुधारणाबिल आणलें तें चार्लस ब्रॅडला लंडहून वेडरबर्न साहेबांबरोबर येऊन हजर राहिले होते. १९१२ पावेतों राष्ट्रीयसभेस येणार्‍या प्रतिनिधीस वीस रुपये फी द्यावी लागत असे; परंतु आतां ती पंधरा रुपये करण्यांत आली असून त्यांच्या जेवण्याराहण्याबद्दलहि फारच माफक फी घेण्यांत येत असते. सुखवस्तू प्रतिनिधी स्वतःच्या खर्चानें स्वतंत्र बंगले भाड्यानें घेतात, परंतु परप्रांतांतून येणार्‍या प्रतिनिधींपैकीं अधिकांश लोक बहुधा राष्ट्रीय सभेनें पुरविलेल्या जागेंतच येऊन राहतात. लहान शहरामध्यें इतक्या माणसांस उतरण्याकरितां लागणार्‍या जागेची सोय करण्यास फारच प्रयास पडतात. याशिवाय खुर्च्या वगैरे दुसरें सामान पुरविण्याचें कामहि कमी जड नसतें, पण तें एक कर्तव्यच समजून लोक तें मोठ्या खुषीनें आपल्या अंगावर घेतात.