प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण १५ वें. : इतिकर्तव्यता.
उपप्रकरण २ रें.
राष्ट्रधर्म व राजकीय बल.
काँग्रेसमधील दुफळी व समेट.- वर सांगितलेल्या मूलभूत तत्त्वांस धरून राष्ट्रीय सभेनें लोकांकडून निंदाप्रचुर टीक व तक्रारी यांचा भडिमार होत असतांहि इ. स. १९०७ पावेतों आपलें उद्दिष्ट कार्य अव्याहत चालू ठेविलें होतें. परंतु १९०७ सालीं राष्ट्रीय सभा सुरत येथें भरली असतां तेथें जमलेल्या प्रतिनिधींमध्यें पक्षभेदाचें वारें शिरून दोन तट उत्पन्न झाले; व त्यांच्या मधील भांडणें इतकीं विकोपास गेलीं कीं, शेवटीं राष्ट्रीयसभेचें तें अधिवेशन बंद ठेवणें प्राप्त झालें. या वेळेपावेतों काँग्रेसमध्यें नेमस्त पक्षाच्या लोकांचें प्राबल्य असून सुरतच्या काँग्रेसमध्यें ज्याला पुढें जहाल हें नांव प्राप्त झालें त्या पक्षाचे लोक प्रामुख्यानें पुढें आले. सुरतेस काँग्रेसमध्यें बखेडा होऊन ती बंद ठेवावी लागली. जहाल उर्फ राष्ट्रीय आणि मवाळ उर्फ नेमस्त पक्ष या दोन्ही पक्षांच्या परिषदा सुरत येथें भरल्या. मवाळ पक्षाचे मुख्य मुख्य पुढारी लोक पुन्हां त्याच जागीं एकत्र झाले व पुढच्या राष्ट्रीयसभांचीं कामें निर्विघ्नपणें पार पाडतां येण्याकरितां कोणत्या उपायांचा व मार्गांचा अवलंब केला पाहिजे याचा विचार करून त्यांनीं राष्ट्रीयसभेकरितां एक लेखनिबद्ध घटना तयार केली. या घटनेच्या नियमांतील सर्वांत महत्त्वाचा भाग म्हणजे काँग्रेसचें धोरण हा होय. हें धोरण पूर्वींपासूच ठरलेलें होतें. फरक एवढाच कीं राष्ट्रीयसभेचे उद्देश जे पूर्वीं लेखनिविष्ट केलेले नव्हते ते आतां लेखामध्यें नमूद करण्यांत आले. हें धोरण पुढें दिल्याप्रणाणें आहे.
ब्रिटिश साम्राज्यांतर्गत स्वयंसत्ताक भागांमध्यें ज्या प्रकारची शासनपद्धति आहे त्याच प्रकारची शासनपद्धति हिंदुस्थानच्या लोकांकरितांहि प्राप्त करून घेणें व साम्राज्यांतील हक्क व जबाबदारी या दोहोंतहि इतर भागांबरोबर जोडीनें भागीदार होणें हे राष्ट्रीय सभेचे उद्दिष्ट हेतु आहेत; व ते प्रचलित शासनपद्धतीमध्यें सनदशीर मार्गानें आस्ते आस्ते सुधारणा घडवून आणून, राष्ट्रीय ऐक्य अधिकाधिक वृद्धिंगत करून, लोकांमध्यें सार्वजनिक कामाची आवड उत्पन्न करून व बौद्धिक, नैतिक, आर्थिक व औद्योगिक अशा सर्व बाजूंनीं व्यवस्थित रीतीनें देशाची उन्नती करून साध्य करून घ्यावयाचे आहेत.
हें जें येथें राष्ट्रीय सभेचें ध्येय म्हणून सांगितलें आहे तें आपणांस मान्य असल्याबद्दल व आपण तिच्या घटनेमध्यें जे नियम आहेत ते पाळण्यास तयार असल्याबद्दल प्रत्येक प्रांतांतील काँग्रेस कमिटी आपल्या भागांतून जाणार्या प्रतिनिधींकडून त्यांनां पाठविण्याच्या अगोदर लेखी कबूली घेते.
ही घटना तयार करून पूर्वींच्या पद्धतीप्रमाणें सर्वांस येण्यास मोकळीक असलेली सभा (म्हणजे “क्रिड”वाल्या आणि बिनक्रीडवाल्या लोकांची सभा) भरून तिजकडून पास झाली नाहीं आणि त्यामुळें ही क्रीडावाली काँग्रेस पूर्वींच्या काँग्रेसची धर्मयुक्त वारस नाहीं. हेंच विधान वारंवार जहाल पक्षाकडून पुढें मांडले गेलें. तथापि जहालांस स्वतंत्र काँग्रेस भरवून हा दोष काढून टाकतां आला नाहीं. “मवाळ” नांवानें ओळखल्या जाणार्या विशिष्ट पक्षानें आपली स्वतःची घटना बनविली, ती मान्य करणारांनांच फक्त परिषदेंत शिरकाव द्यावयाचा हें ठरविलें, आणि राष्ट्रीय सभा हें नांव मात्र घेतलें. जहालांस स्वतःची परिषद भरवितां न आल्यामुळें पुढें हीच विशिष्ट पक्षाची परिषद त्यांनां मान्य करावी लागली आणि तींतच आपला शिरकाव करून घ्यावा लागला.