प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण १५ वें. : इतिकर्तव्यता.
उपप्रकरण २ रें.
राष्ट्रधर्म व राजकीय बल.
क्रान्तिकारक चळवळ. - “हिंदुस्थानांतील क्रांतिपक्षीय चळवळीशीं संबंध असलेल्या सर्व गुप्त कटांची चौकशी आम्ही केलेली आहे. या चौकशीवरून आमच्या निदर्शनास असें आलें आहे कीं, मुंबई इलाख्यांत जे कट झाले ते निखालस ब्राह्मणांचे व त्यांतहि बहुतेक चित्पावनांचे कट होते. बंगालमधील कटवाले सुशिक्षित मध्यम वर्गांतील तरुण लोक होते. या बंगाली कटवाल्यांनीं जी चळवळ केली ती फार व्यापक व चिकाटीची आणि कुशलतेनें चालविलेली अशी होती. त्या चळवळीच्या योगानें त्यांच्या स्वतःच्या प्रांतांत खून व दरोडे यांची एक लांबलचक मालिका उत्पन्न झाली. बहार, ओरिसा, संयुक्तप्रांत, मध्यप्रांत व मद्रास या प्रांतांत बंगाली चळवळीचीं मुळें रुजलीं नाहींत. या ठिकाणीं मधून मधून एखादा गुन्हा झाला, किंवा दंगाधोपा झाला एवढेंच कायतें. पंजाबमध्यें अमेरिकेंत राहिलेले जे पंजाबी लोक परत आले ते रक्तपात करावयाचा व क्राति करावयाची अशा निश्चयानेंच आले होते, त्यामुळें तेथें अनेक खून व दरोडे झाले आणि १९१५ जी ‘गदर’ कटाची चळवळ निर्माण झाली. ब्रह्मदेशांतहि ‘गदर’ कटाची चळवळ चाललेली होती. परंतु तिला सरकारकडून लवकरच प्रतिरोध झाला व ती बंद पडली. एक मुसुलमानांचा कटहि झालेला होता. या कटांत थोडेसेच माथेफिरू होते परंतु त्यांचा उद्देश बाह्यांची मदत घेऊन ब्रिटिश सत्ता उलथून पाडण्याचा होता. वर सांगितलेल्या सर्व कटांचा उद्देश ब्रिटिशांची हिंदुस्थानांतून जबरदस्तीनें उचलबांगडी करणें हा एकच असल्याचें आमच्या नजरेस आलें आहे. हे कट केव्हां केव्हा त्यांचा परस्परसंबंध होता. केव्हां केव्हां त्यांनां जर्मनीकडून पैशाचा पुरवठा होऊन उत्तेजन मिळालेलें आहे. हिंदी लोकांच्या राजनिष्ठेच्या मदतीनें या सर्व कटांचा उद्देश हाणून पाडला गेला आहे. परंतु या कार्यांत सरकारला आपल्या असाधरण कायदे करण्याच्या शक्तीचा उपयोग करावा लागला आहे. सदरील कट फार चतुरतेनें रचलेले होते व सामान्य कायद्यांनां ते दाद देत नव्हते ही गोष्ट लक्षांत ठेवली म्हणजे कटांसाठीं असाधारण कायद्यांचा प्रयोग सरकारला करावा लागला या गोष्टीचें आश्चर्य वाटणार नाहीं.”
लोकांचें बल वाढतें तें केवळ एक तर्हेच्या प्रयत्नानें वाढत नाहीं. सर्व प्रकारच्या विद्यांस उत्तेजन दिल्यानें, प्रत्येक मनुष्याची कर्तृत्वशक्ति अधिकाधिक वाढल्यानें आणि देशांत मोठमोठे कारखाने, मोठमोठ्या पेढ्या निघाल्यानें शक्तीची जी वाढ होते ती मोठी होते. परंतु लोकसामर्थ्य वाढविण्याचे हे प्रयत्न आणि राजकीय प्रयत्न यांत भेद आहे. राजकीय अधिकार लोकांनां अधिकाधिक मिळावेत यासाठीं जो प्रयत्न होतो तो राजकीय प्रयत्न होय. या प्रयत्नाची दिशा कशी काय असावी हें सांगण्याचें येथें प्रयोजन नाहीं, तथापि आजपावेतों असे प्रयत्न कोणकोणते झाले त्यांची हकीकत दिली पाहिजे.
लोकमत एकत्र करून त्याचा सरकारवर परिणाम घडवावयचा आणि शासनपद्धति बदलावयास लावावयाची या हेतूनें पुष्कळ संस्था निघाल्या आहेत. विशिष्ट हितसंबंधांच्या सदरील हेतूच्या अनेक संस्था देशांत असून या सर्वांस व्यापून टाकणारी मध्यवर्ती संस्था म्हणजे राष्ट्रीय सभा उर्फ कांग्रेस होय.