प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण १५ वें. : इतिकर्तव्यता.

उपप्रकरण २ रें.
राष्ट्रधर्म व राजकीय बल.

राष्ट्रीय सभेची बैठक.- मुंबई, कलकत्ता किंवा मद्रास यांसारख्या प्रमुख शहरीं मोठी सभा भरली असतां तिचा तो भव्य देखावा मनास फारच आल्हादकारक असतो. एवढ्या मोठ्या सभेंतहि श्रोतृसमाजाचें वर्तन नेहमीं सभ्यपणाचें असतें. दररोज पांच तासप्रमाणें तीन दिवसपर्यंत या सभेचें काम चालत असतें. मंडप तयार करतांना वक्त्याचा आवाज प्रत्येक कोनाकोपर्‍यांत देखील ऐकूं  जावा अशी बहुधा काळजी घेण्यांत येते. मंडपांत जाण्यायेण्याकरितां शक्य तितके अधिक मार्ग ठेवण्याची व्यवस्था केलेली असते. अलीकडे गोषांतील स्त्रियाहि राष्ट्रीय सभेंतील चर्चेमध्यें विशेष लक्ष्य घालूं लागल्या असल्यामुळें त्यांच्याकरितां एक ग्यालरी मुद्दाम वेगळी राखून ठेवण्यांत येते. राष्ट्रीय सभेच्या कामाकरितां दरसाल कमींत कमी पंचवीसपासून तीस हजार रुपयांपावेतों खर्च लागतो. हा खर्च भागविण्याचीं साधनें म्हटलीं म्हणजे. (१) ज्या प्रांतांत राष्ट्रीय सभेची बैठक व्हावयाची असते तेथील ह्या संस्थेबद्दल सहानुभूति बाळगणार्‍या धनिक लोकांकडून मिळालेल्या देणग्या, (२) प्रतिनिधींपासून गोळा झालेल्या फीच्या पैशांतून लंडनमधील ब्रिटिश काँग्रेसकमिटिस अर्धी रकम देऊन राहिलेला भाग व (३) प्रेक्षकांची तिकिटें काढून गोळा झालेली रकम हीं आहेत. उपर्युक्त मार्गांनीं जमा केलेल्या निधींतून राष्ट्रीय सभेचा सर्व खर्च भागून शिल्लक राहण्याचा प्रंसग क्वचितच येतो. कांही कांहीं वेळां तर जमा झालेल्या रकमेपेक्षां खर्चच अधिक होऊन तूट मात्र आलेली आहे. काँग्रेस झाल्यानंतर स्वागतमंडळ आपल्या सवडीनुसार लवकरच तिच्या तीन दिवसांच्या कामाचा अहवाल प्रसिद्ध करतें. कांहीं वर्षेंपर्यंत काँग्रेसला लागूनच एक औद्योगिक प्रदर्शनहि भरविण्यांत येत होतें. याच प्रदर्शनापासून पुढें औद्योगिक परिषदेची उत्पत्ति झाली. ह्या सर्व प्रदर्शनांमध्यें १९०४ च्या राष्ट्रीय सभेबरोबर भरलेलें प्रदर्शन फारच यशस्वी झालें होतें.

स्वागतमंडळाकडील अतिशय महत्त्वाचें काम म्हणजे राष्ट्रीयसभेच्या अध्यक्षाच्या निवडणुकीसंबंधांत निरनिराळ्या प्रांतांतील कांग्रेसकमिट्यांचीं मतें मागविणें हें आहे. राष्ट्रीय सभेचा जो अध्यक्ष निवडावयाचा त्यासंबंधानें सामान्य नियम असा आहे कीं, तो केवळ राष्ट्रीय सभेमध्यें भाषणें करूनच नव्हे तर आपल्या प्रांतामध्यें त्या सभेचें कार्य व उद्देश यासंबंधीं लोकांमध्यें व्याख्यानें देऊन व शिक्षणप्रसार करून पूर्वीं कित्येक वर्षांपासून तिच्या कामांत उत्साहपूर्वक भाग घेत आला असावा. तथापि हा नियम नेहमींच पाळण्यांत येतो असें नाहीं. १९१६ सालच्या कांग्रेसमध्यें अध्यक्षस्थान सर सत्यप्रसन्न (आतां लॉर्ड) सिंह यांस दिले होतें. तथापि सिंह यांनीं पूर्वीं कांग्रेसमध्यें क्वचितच भाग घेतला होता. जेथें कांग्रेस भरावयाची असते तेथील स्वागतमंडळाकडे प्रत्येक प्रांतिक कांग्रेसकमिटीनें तिला ज्या माणसांतून अध्यक्ष निवडून यावा अशी इच्छा असेल त्यांचीं नांवें सप्टेंबर अखेरपावेतों किंवा दुसर्‍या एखाद्या ठरलेल्या मुदतीपावेतों पाठवावीं अशी सर्व प्रांतांच्या कमिट्यांनां सूचना देण्यांत येते. या सर्व कमिट्यांनीं सुचविलेलीं नांवें स्वागतमंडळाकडे आल्यावर त्यांतून ज्याला अधिकांश मतें मिळालीं असतील तो अध्यक्ष निवडून आला असें समजण्यांत येऊन त्याचें नांव जाहीर करण्यांत येतें. निवडून आलेल्या अध्यक्षास त्याची निवडणूक झाल्याचें स्वागतमंडळाकडून रीतसरपणें कळविण्यांत आलें म्हणजे तो आपलें भाषण तयार करण्याचें काम हातीं घेतो. ह्या भाषणांत त्या वर्षांत घडलेल्या राजकारणांतील मुख्य मुख्य गोष्टींचें समालोचन करून कांग्रेसनें आपल्या बैठकींत कोणकोणत्या महत्त्वाच्या विषयांवर ठराव पसार करावे याचें दिग्दर्शन करण्यांत येतें. कांग्रेसचा अध्यक्ष हा स्वागतमंडळाचा सन्मान्य पाहुणा असतो. उत्तमशा जागेंत त्याच्या राहण्याची व्यवस्था करण्यांत येते व त्याला सर्व प्रकारच्या सुखसोयी मिळवून देण्याकरितां प्रयत्‍न केले जातात. दोनचार स्वयंसेवक सदोदित त्याच्या तैनातींत राहत असतात. अध्यक्षाच्या तैनातींत रहावयास मिळणें हा एक ते मोठा मान समजतात. अध्याक्षाची स्वारी दाखल होतांच त्याचा बहुधा जयघोषपूर्वक सत्कार करण्यांत येतो व त्याची मिरवणूक काढून लोक आपला आनंद व्यक्त करितात. ज्यांनां शहरांतील आबालवृद्ध नरनारींच्या जयजयकारांत अशा रीतीनें रस्त्यांतून बिर्‍हाडीं घेऊन जाण्याचा मान मिळाला असे कित्येक अध्यक्ष होऊन गेले आहेत.

राष्ट्रीय सभा उघडण्याच्य दिवशीं तिचे अध्यक्ष, जनरल सेक्रेटरी, सेक्रेटकी, स्वागतमंडळाचे अध्यक्ष व त्या प्रसंगास हजर असलेले राष्ट्रीय सभेचे माजी अध्यक्ष या सर्वांस घेऊन आपल्या उच्चासनावर येऊन बसतात. ही मंडळी स्थानापन्न होतांच काँग्रेसच्या बैठकीस सुरुवात झाली असें जाहीर करण्याकरितां एक घंटा होते. बैठकीच्या सुरुवातीस स्वागतमंडळाच्या अध्यक्षाचें भाषण होतें. ह्या भाषणांत ते प्रथम तेथें जमलेल्या प्रतिनिधींचें स्वागत करितात व आपल्या शहरामध्यें विशेष ध्यानांत ठेवण्यासारख्या अशा कोणत्या गोष्टी आहेत हें सर्वांच्या निदर्शनास आणून लोकांपुढें असलेल्या प्रांतिर व दुसर्‍या कांहीं प्रश्नांचा उल्लेख करितात. हें काम झाल्यानंतर लागलीच अध्यक्षांच्या निवडणुकीची औपाचारिक सूचना पुढें आणून त्यांनां यथाशास्त्र त्यांच्या जागेवर अधिष्ठित करण्यांत येतें. सूचना पुढें मांडणारे गृहस्थ आपल्या भाषणांत अध्यक्ष कोण आहेत व त्यांनीं आपल्या देशाची कोणती सेवा केली आहे याची बहुधा श्रोतृवृंदास ओळख करून देतात. हें झाल्यावर अध्यक्ष टाळ्यांच्या गजरांत भाषण करावयास उभे राहतात. सामान्यतः अध्यक्षांचें भाषण अगोदर लिहून काढून छापलेलें असतें व तें सभेंत फक्त वाचून दाखविण्यांत येतें. तें वाचावयास बहुधा दीड तास लागतो. तथापि कित्येक अध्यक्ष श्रोत्यांचें जणूं काय सत्त्वच पहातात. बांकीपूरच्या कांग्रेसच्या वेळेस अध्यक्षाचें (रा. ब. मुधोळकरांचें) भाषण चारपांच तास झालें असावें. अध्यक्ष आपल्या भाषणांत राजकारणांतील तत्कालीन परिस्थितीचें पर्यालोचन करितात, राज्यकारभारासंबंधीं प्रश्नांवर त्या वर्षीं निरनिराळ्या संस्थांतून जें मत व्यक्त झालें असेल त्याचा प्रतिध्वनि करितात व पुढें कोणत्या सुधारणा करावयास पाहिजेत यासंबंधात कांहीं शिफारशी व सूचना करून ते आपलें भाषण संपवितात.