प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ५ वें.
रोमन संस्कृति.
लोकसत्ताकाच्या उत्तरार्धांतील लोकस्थिति - लोकसत्ताक स्थापन झाल्यावर प्रथम सर्व राजकीय सत्ता पॅट्रिशियन लोकांच्या म्हणजे उच्च रोमन कुळांतील लोकांच्या ताब्यांत होती. पुढें रोमन राज्याचा विस्तार वाढल्यावर प्लीबियन लोकांचा म्हणजे सामान्य लोकांचा मोठा वर्ग रोमन साम्राज्यांत तयार झाला, आणि या दोन वर्गांत स्पर्धा सुरू होऊन प्लीबियन लोकांनां हळू हळू बरेच हक्क मिळाले. प्लीबियन लोकांतर्फे ट्रिब्यून नांवाचे वरिष्ठ अधिकारी नेमण्यांत येऊन प्लीबियन लोकसभेच्या (कॉमीसिआ ट्रिब्यूटाच्या) मार्फत कायदे करण्याचा अधिकार हातीं आला. येणेंप्रमाणें सेनेटला प्रतिस्पर्धी अशी संख्या निर्माण होऊन कॉन्सल व ट्रिब्यून या वरिष्ठ अधिका-यांमध्यें झगडें होऊं लागले. लोकसत्ताकाच्या उत्तरार्धांत हा सामान्य लोकांचा पक्ष फार बळावला, व अखेर या दोन पक्षांच्या पुढा-यांमध्यें सत्ता हातीं येण्याकरितां आपसांत युद्धें सुरू झालीं. अखेर पक्षाभिमानाचें पर्यवसान व्यक्तिविषयक स्वार्थामध्यें झालें. सेनेटसारख्या पुरातन संस्थेलाहि पुढारी जुमानीतनासे झाले. अशा रीतीनें रोमन राज्यघटनेंत प्रथम नियंत्रित राजसत्तेनंतर लोकसत्ता व नंतर अनियंत्रित पुढा-यांचा जुलुमी अंमल असे फेरफार होत गेले, व अखेर सर्व बेबंदशाही माजली. या अंदाधुंदीच्या काळांतून अखेर ऑक्टेव्हिअन हा मागील पुढा-यांच्या अनुभवानें अत्यंत धूर्त बनलेला इसम पुढें आला आणि सर्व रोमन साम्राज्यावर बादशहा म्हणून राज्य करूं लागला.
वाङ्मय- लोकसत्ताकाच्या उत्तरार्धांत रोम येथें राजकीय बखेडे माजल्यामुळें उच्च वाङ्मय निर्माण करण्याचा व्यवसाय शिथिल झाला, परंतु वक्तृत्वकलेला मात्र फार ऊत आला. या काळांतला वक्तृत्वशास्त्र व कला या दोहोंमध्यें सर्वश्रेष्ठ ठरलेला वक्ता सिसिरो हा होय. त्यानें तत्कालीन अनेक वक्त्यांची माहिती देणारा एक ग्रंथहि लिहिलेला आहे. या काळांतला दुसरा लेखनव्यवसाय म्हणजे इतिहासग्रंथ लिहिण्याचा. अनेक सुप्रसिद्ध सेनापतींनीं आपल्या मोहिमांचे वृत्तान्त लिहून ठेविले आहेत. त्यांत सीझरच्या कॉमेंटरीज फार प्रसिद्ध आहेत. व्याकरण आणि भाषाशास्त्र या विषयांतहि कांहीं थोडे लेखक झाले. त्यांत व्हेरो हा प्रसिद्ध आहे. तो पॉपी, सीझर व पुढें ऑक्टेव्हिअन या तिघांच्या आश्रयास होता. त्यानें लॅटिन भाषेसंबंधानें २४ पुस्तकें लिहिलीं असून त्यांपैकीं सहा आज उपलब्ध आहेत. शिवाय त्यानें कृषि या विषयावर तीन पुस्तकें लिहिली होतीं. या काळांत नाट्यवाङ्मयहि फारसें जन्मास आलें नाहीं. नाटकाऐवजीं माइम (फार्स) नांवाचे लहान लहान नाट्यप्रबंध कांहीं काळ बरेच लोकप्रिय झाले होते. ही प्रबंधरचना रोमन लोकांनीं मूळ ग्रीकांपासूनच घेतली होती. पण ग्रीक नाट्यप्रबंध गंभीर व उच्च स्वरूपाचे असत, तर रोमन लोकांनीं लिहिलेले प्रबंध अश्लील व तमाशेवजा असत. या शेदोनशें वर्षांच्या काळांत चांगले कवीहि कोणी निर्माण झाले नाहींत. फक्त ल्युकीशिअस व काटलस ही दोनच नांवे उल्लेखिण्यासारखीं आहेत; ल्युक्रीशिअसचें मोठें काव्य 'दि नेचर ऑफ दि युनिव्हर्स' हें आहे. त्यांत ही सृष्टि निर्माण करणारा देव वगैरे कोणी नसून ती मूलभूत परमाणूंपासून निसर्गाच्या सामान्य नियमांअन्वयें बनत गेली असें प्रतिपादिले आहे. हें सृष्ट्युपुत्पत्तीचें नास्तिकपंथी तत्त्व ग्रीक तत्त्ववेत्ता एपिक्यूरस याचें असून या एकंदर काव्यांत कवीचा ओढा आधिभौतिकपंथी ग्रीक तत्त्ववेत्त्यांकडे असलेला दिसून येतो. दुसरा कवि काटलस यानें उच्चनीच प्रकारच्या अनेक कविता केल्या. लोकसत्ताक काळच्या अखेरचे आणि बादशाही सत्तेच्या आरंभींचे दोन प्रख्यात कवी व्हर्जिल व होरेस हे होत. व्हर्जिलचें सर्वांत प्रसिद्ध काव्य इनीइड हें आहे. पण त्यांतील बहुतेक वर्णनें होमर व इतर ग्रीक कवींच्या काव्यांतून घेतलेलीं आहेत. होरेसच्या ओड्स फार प्रसिद्ध आहेत.
क ला कौ श ल्य- या बाबतींत लोकसत्ताकाच्या पूर्वार्धापेक्षां उत्तरार्धांत फारसें अधिक कांहीं झालें नाहीं. ग्रीक कलांचेंच प्राबल्य रोममध्यें कायम होतें. कलाकौशल्याच्या जुन्या वस्तूंचा संग्रह मात्र रोममध्यें पुष्कळ अधिक वाढला. सीझरनें अनेक देश जिंकून त्यांत भर घातली होती. रोमचें वैभव व संपत्ति हीं जसजशीं वाढत चाललीं तसतशीं मोठमोठ्या इमारती, सडका, पूल, बोगदे, कालवे वगैरे बांधकामें करण्यांत आलीं, व रोममध्यें अनेक मोठाल्या भव्य सार्वजनिक इमारती बांधण्यांत आल्या.
प र मा र्थ सा ध न व नी ति म त्ता- पूर्वींच्या धार्मिक विधींवरची लोकांची श्रद्धा उडत चालली, पण त्याबरोबर तत्त्वज्ञानाची प्रगति फारशी न झाल्यामुळें आणि उलट संपत्ति व ऐश्वर्य वाढत गेल्यामुळें रोमन लोकांमध्यें ऐषआराम व चैन फार वाढत जाऊन त्यांची नीतिमत्ता अत्यंत खालावली. विवाहबंधनांतील शिथिलता आणि स्त्रीवर्गाचें राजरोस अनैतिकाचरण या गोष्टी रोमन समाजाच्या अधःपाताची साक्ष देतात. सीझर व ऑक्टोव्हिअन यांनीं ही दुःस्थिति जाणून विवाहसंबंधाच्या बाबतींत कडक कायदे अंमलांत आणण्याचा प्रयत्न केला. भविष्यें जाणण्याची इच्छा रोमन समाजांत कायम होती, पण भविष्यकथनाचे पूर्वींचे मार्ग (ऑरेकल्स) मागें पडून ग्रहांच्या साहाय्यानें भविष्यें वर्तविण्याची पद्धति अमलांत येऊं लागली. अशा रीतीनें रोमन साम्राज्यांत सामाजिक स्थिति सर्वत्र विस्खलित व अवनत अशी झाली असल्यामुळें यानंतर लवकरच उदयास आलेल्या ख्रिस्ती संप्रदायाच्या प्रसाराला रोमन साम्राज्यांत आयतीच चांगली भूमिका तयार झाली.