प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ५ वें.
रोमन संस्कृति.
रोमन व ग्रीक राष्ट्र - रोमच्या इतिहासाचा एक अत्यंत महत्त्वाचा विशेष असा आहे कीं, हा इतिहास देशाचा किंवा राष्ट्राचा नसून एका शहराचा आहे. इजिप्तमध्यें थीबि हें एके काळीं सत्ताधारी होतें व पुढें मेम्फिस हें झालें. मेसापोटेमियामध्यें बाबिलोन हें एकदां सत्तेचे केंद्रस्थान होतें व नंतर निनिव्हि हें बनलें. ग्रीसमध्यें अथेन्स व स्पार्टा यांच्यामध्यें वरिष्ठ सत्ता हातीं रहावी याकरितां बरींच वर्षे झगडा चालू होता. पण इजिप्त, मेसापोटेमिया किंवा ग्रीस हें एक एक देश मिळून राष्ट्र बनलेलें होतें. त्या देशांतील वर सांगितलेल्या शहरांनां त्या त्या संस्कृतीचें केंद्रस्थान इतक्या पुरतेंच महत्त्व होतें. पण रोमन राष्ट्राची स्थिति याहून अगदीं भिन्न आहे. रोमन संस्कृति म्हणजे मूळ रोम या एका शहराच्या लोकांची संस्कृति असा अर्थ आहे.
रोम हें शहर इटालीमध्यें आहे. परंतु रोमन व इटालियन या दोन शब्दांचा अर्थ समान नाहीं. इटालीमध्यें प्रथम जे लोक रहात होते ते रोमच्या सत्तेखालीं येण्यास बराच काळ लागला. त्यांनां अंकित बनविण्यास रोमन लोकांनां ब-याच लढाया कराव्या लागल्या. रोमन लोकांनीं इटाली देश जिंकला इतकेंच नव्हे तर यूरोप व आशियापैकीं भूमध्य समुद्राभोंवतालचे अनेक देश जिंकून अखेर मोठें रोमन साम्राज्य बनविलें. तथापि या अवाढव्य राज्यावर सत्ता चालवणारे अधिकार लोक टायबर नदीकांठच्या रोम या एका शहरांतलेच होते. फार तर काय, अवाढव्य रोमन साम्राज्यांत जेथें प्रजाजनांनां नागरिकत्वाचे हक्क देण्यांत येत असत तेथें त्यांनांहि रोमन नागरिक असेंच म्हणण्याचा पूर्वींपासून प्रघात असे.
मानववंशशास्त्राच्या दृष्टीनें पाहतां ग्रीक लोक आणि रोमन लोक यांच्यामध्यें कित्येक महत्त्वाचे फरक होते. ग्रीक लोक स्वभावानें इतर कोणत्याहि प्राचीन राष्ट्रांतील लोकांपेक्षां अधिक बुद्धिमान् व अधिक भावनाप्रधान होते. ग्रीक लोक तत्त्वज्ञान, व्याकरण, वास्तुकला, कोरीव काम वगैरे गोष्टींत इतके निष्णात होते कीं, त्यांच्यावर ताण दुस-या कोणत्याहि लोकांनीं केलेली नाहीं. तथापि ग्रीकांची सर्वगामी बुद्धि आणि भावनाप्रधान स्वभाव यामुळें असा एक दोष उत्पन्न झाला कीं, ग्रीक लोक अत्यंत अस्थिर बुद्धीचे बनले, व त्यांच्यामध्यें राजकीय शिस्त आणि सत्ताधा-यासंबंधानें आज्ञाधारकपणा हे गुण नाहीसे होऊन लवकरच ग्रीकराष्ट्राचा अधःपात झाला. उलट पक्षी रोमन लोकांमध्यें स्वतंत्र सांस्कृतिक प्रगति फारच थोडी झाली. रोमन लोकांचीं जीं चिरकालीन स्मारकें आहेत तीं करण्याची प्रेरणा त्यांनां ग्रीक लोकांशीं संबंध आल्यानंतर मिळालेली आहे. एका शहरांत राहणा-या या रोमन लोकांनीं कायदे करण्याच्या कामांत आणि राज्यकारभार चालविण्याच्या कलेंत मात्र, ग्रीकांनीं ललितकलांत जितका उच्च दर्जा मिळविला तितकाच, उच्च दर्जा प्राप्त करून घेतला. ग्रीक लोकांनीं वैयक्तिक स्वातंत्र्याचें फाजील स्तोम माजवून बेशिस्त वागणूक सुरू केली आणि अखेर ग्रीक राष्ट्राचा नाश करून घेतला. उलट व्यक्तिस्वातंत्र्याचें महत्त्व राष्ट्राभिमानापेक्षां व राष्ट्रविषयक कर्तव्यापेक्षां कमी समजणा-या रोमन लोकांनीं ग्रीससुद्धां सर्व सुधारलेल्या तत्कालीन पाश्चात्य जगावर आपला राजकीय अम्मल बसविला.
आधुनिक यूरोप ग्रीक आणि रोम या दोन प्राचीन राष्ट्रांचा सारखाच ॠणी आहे. आधुनिक यूरोपनें रोमन लोकांपासून उत्तमोत्तम कायदे आणि राज्यकारभार करण्याच्या कलेचें ज्ञान मिळविलें; आणि ग्रीकांपासून अनेक शास्त्रें आणि कला यांचें ज्ञान मिळविलें.
भाषाविषयक पुराव्यावरून रोमन लोक आर्यन् वंशांतले होते हें मत अलीकडे ग्राह्य झालें आहे. तथापि या भाषाविषयक पुराव्यावरूनच रोमन लोकांचा तत्कालीन इतर कोणत्याहि मानव जातीपेक्षां ग्रीक लोकांशींच फार निकट संबंध होता, असें स्पष्ट दिसतें. मूळ आर्यन् समाजापासून विभक्त झाल्यापासून ग्रीक व रोमन लोकांच्या पूर्वजांचा बहुत काळ फार निकट संबंध होता. मूळ आर्यन् लोकांची कोणती शाखा कोणत्या काळीं ग्रीस व इटाली या देशांत येऊन राहिली, त्यांनां त्या त्या देशांत कोण देश्य लोक भेटले व त्यांचे पुढें मिश्र समाज कसे बनत गेले या प्रश्नासंबंधानें भरपूर ऐतिहासिक माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाहीं.