प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ५ वें.
रोमन संस्कृति.
रोमन बादशाहीचीं अखेरचीं तीन शतकें (इ. स. १८०-४७६) - या काळांत रोमन बादशाहीची अवनति अधिक अधिक स्पष्टपणें होत जाऊन अखेर तिचा ४७६ मध्ये अंत झाला. या काळांतील ऐतिहासिक गोष्टींचें टांचण येणेंप्रमाणें:-
कॉ मो ड स ते दु स रा क्लॉ डि अ स - (इ. स. १८०-२७०)- कॉमोडसनें रानटी जातींबरोबर तह केला. पुढें त्याच्या विरुद्ध कट झाले म्हणून त्यानें अनेक कटवाल्यांनां क्रूरपणानें शिक्षा केल्या. तरीहि अखेर त्याचा खून झालाच (इ. स. १९३). पुढील बादशहा पर्टिनॅक्स याच्या कारकीर्दींत अनेक ठिकाणीं बंडें व लढाया झाल्या. सिरिया, इलिरिकम व ब्रिटन येथील रोमन सैन्यानें आपआपला स्वतंत्र बादशहा असल्याचें जाहीर केलें. १९८ मध्यें पार्थियन लोकांबरोबर युद्ध झालें. २०८ मध्यें सिव्हीरसनें कॉलिडोनिआवर स्वारी केली. २१० मध्यें ब्रिटनमध्यें सिव्हीरसची भिंत बांधून पुरी करण्यांत आली. २११ मध्यें कॅराकॅल्ला हा बादशहा झाला. त्यानें २१२ मध्यें स्वतःचा भाऊ जीटा याचा खून केला. २१७ मध्यें माक्रायनस हा बादशहा झाला. २१८ मध्यें रोमन सैन्यानें एलिगॅबालसला बादशहा केलें; व त्यानें माक्रायनसचा पराभव करून त्याला ठार मारलें. २२२ मध्यें सिव्हीरस अलेक्झांडर हा बादशहा झाला. त्यानें २३१ मध्यें इराणबरोबर युद्ध केलें. २३५ मध्यें मॅक्सिमिएनस थ्रॅक्स बादशहा झाला. त्यानें २३६ मध्यें जर्मनीवर स्वारी केली. २३७ मध्यें गॉर्डिएनस पहिला व दुसरा हे बादशहा असल्याचें आफ्रिकेंत जाहीर करण्यांत आलें; परंतु त्या दोघांचाहि पराभव होऊन ते मारले गेले. २५० मध्यें ख्रिस्ती लोकांचा छळ झाला. २५१ मध्यें गॅलस व हॉस्टिलिएनस हे बादशहा झाले. २५२ मध्यें रोमन साम्राज्यांतील बहुतेक भागांत एक रोगाची सांथ उद्भवली; ती पुढें १५ वर्षें चालू राहिली. २५३ मध्यें एमिलिएनस हा बादशहा झाला. २५४ मध्यें व्हालीरिएनस हा बदशहा झाला. या कारकीर्दीत अनेक रानटी टोळ्यांनीं निरनिराळ्या रोमन प्रांतांवर स्वा-या केल्या. २६० मध्यें गॅलिईनस हा बादशहा झाला. या कारकीर्दीत इराणी लोकांबरोबर युद्ध झालें; व गॉलमध्यें बंड झालें. २६८ मध्यें दुसरा क्लॉडिअस बादशहा झाला. त्यानें गॉथ लोकांचा पराभव करून त्यांची मोठी कत्तल केली.
ऑ री लि अ न ते थी ओ डो शि अ स (इ. स. २७०-३९५) - २७० मध्यें ऑरीलिअन बादशहा झाला. त्यानें गॉथ लोकांचा पराभव करून त्यांच्याबरोबर तह केला. अँलामेन्नाय यांनीं अंब्रिआवर स्वारी केली, परंतु त्यांचाहि ऑरीलिअननें तीन वेळां पराभव केला. २७३ मध्यें पॅल्मायरा आणि त्याची राणी झिनोबिआ हीं ऑरीलिअननें हस्तगत करून घेतलीं. या बादशहानें इजिप्तमध्यें झालेले बंड मोडलें. २७४ मध्यें गॉल, ब्रिटन व स्पेन या देशांचा बादशहा म्हणून मिरविणारा टेट्रिकस याचा ऑरीलिअननें शालोन येथें पराभव केला.
२७५ मध्यें टॅसिटस बादशहा झाला. २७६ मध्यें प्रोबस व फ्लोरिअन हे बादशहा झाले. यांनीं गॉल देशामधून जर्मन लोकांनां -हाइन नदीपलीकडे हांकून लाविलें. २८२ मध्यें केरस हा बादशहा झाला. त्यानें सार्मेशिअन लोकांचा पराभव केला. २८४ मध्यें डायोक्लीशिअन हा बादशहा झाला. त्यानें बिथिनिआंतील निकोमिडीआ हें शहर आपली राजधानी केलें. २८५ मध्यें मॅक्सिमिअन हा जोड बादशहा म्हणून पश्चिमेकडील रोमन साम्राज्याचा कारभार पाहूं लागला. २९६ मध्यें कॉन्स्टॅन्शिअसनें स्वतंत्र होऊं पाहणारा ब्रिटन देश पुन्हां जिंकून घेतला. इजिप्तमध्यें झालेलें बंड डायोक्लीशिअन बादशहानें मोडिलें. २९७ मध्यें गालीरिअसनें इराणी लोकांचा पराभव करून मेसापोटेमिया प्रांत रोमन साम्राज्यास जोडला. ३०३ मध्यें ख्रिस्ती लोकांचा छळ झाला. ३०५ मध्यें डायोक्लीशिअन व मॅक्सिमिअन यांनीं बादशाही पदाचा त्याग केला आणि कॉन्स्टॉन्शिअस व गालीरिअस हे जोड बादशहा झाले. ३०६ मध्यें कॉन्स्टॅन्शिअस याचा मुलगा कॉन्स्टंस्टाइन दि ग्रेट हा स्पेन, गॉल व ब्रिटन या देशांवर राज्य करूं लागला. आणि मॅक्सेन्शिअस हा रोम येथें बादशहा झाला.
३१० मध्यें मॅक्सिमिअनला कॉन्स्टंटाइननें ठार मारलें. ३१२ मध्यें मॅक्सेन्शिअसचा पराभव झाला व तो मरण पावला. ३१३ मध्यें लिसिनिअस व कॉन्स्टंटाइन यांनीं एडिक्स ऑफ मिलन नांवाचें फर्मान काढून धर्मसहिष्णुतेचा अंगीकार केला. ३१४ मध्यें लिसिनिअस आणि कॉन्स्टंटाइन यांच्यामध्यें युद्ध सुरू झालें. ३२३ मध्यें लिसिनिअसचा दोन लढायांत पराभव झाला व त्याला ३२४ मध्यें ठार मारून कॉन्स्टंटाइन हा एकटा राज्य करूं लागला. ३३० मध्यें त्यानें बिझॅन्शिअम उर्फ कान्स्टांटिनोपल हें साम्राज्याच्या राजधानीचें शहर केलें. ३३७ मध्यें दुसरा कॉन्स्टंटाइन, कॉन्स्टन्स व दुसरा कॉन्स्टॅन्शिअस या तिघांनी सर्व साम्राज्य आपसांत वांटून घेतलें. ३४० मध्यें दुसरा कॉन्स्टंटाइन मरण पावला. ३५० मध्यें कॉन्स्टन्स मरण पावला. ३५३ मध्यें दुसरा कॉन्स्टॅन्शिअस हा एकटा राज्य करूं लागला. ३६१ मध्यें जूलिअन 'दी आपॉस्टेट' हा बादशहा झाला. यानें ३६२ मध्यें फर्मान काढून ख्रिस्ती लोकांनां धर्मस्वातंत्र्य देऊन त्यांचा छळ बंद केला. ३६३ मध्यें इराणबरोबर युद्ध सुरू झालें. प्रथम जूलिअनला अनेक लढायांत जय मिळाला, परंतु अखेर त्याला माघार घ्यावी लागली व तो मारला गेला. तेव्हां जोव्हिअन हा बादशहा झाला. त्यानें इराणबरोबर तह करून तैग्रिस नदीपलीकडले पांच जिल्हे इराणला परत दिले. या बादशहानें ख्रिस्ती संप्रदायाला इतर संप्रदायांच्या बरोबरीनें हक्क दिले. ३६४ मध्यें पहिला व्हॅलेंटिनिएनस आणि व्हेलेन्झ हे जोड बादशहा झाले. ३६७ मध्यें ग्रेशिएनस हा पश्चिम रोमन साम्राज्याचा बादशहा झाला. ३७४ मध्यें क्वेडाय लोकांबरोबर युद्ध झालें. ३७५ मध्यें पहिला व्हॅलेंटिनिअन (निएनस) याच्या मरणानंतर दुसरा व्हॅलेंटिनिअन व ग्रेशिअन (एनस) हे दोघे मिळून राज्य करूं लागले. ३७६ मध्यें हूण व अलन्स लोकांनीं पूर्वेकडील गॉथ लोकांवर हल्ला केला, तेव्हां व्हेलेन्झनें गॉथ लोकांनां थ्रेसमध्यें राहण्यास परवानगी दिली. ३७८ मध्यें गॉथ लोक कॉन्स्टांटिनोपलवर हल्ला करण्याकरितां चालून आले. तेव्हां हेड्रिआनोपोलिस येथें त्यांच्याशीं लढाई होऊन तींत गॉथ लोकांनीं रोमन सैन्याचा पराभव केला; व त्यांची मोठी कत्तल केली. ३७८ सालींच व्हेलेन्झ मरण पावला. ३७९ मध्यें थीओडोशिअस दि ग्रेट हा पूर्व रोमन साम्राज्याचा बादशहा झाला. ३८० मध्यें त्यानें ख्रिस्ती संप्रदाय स्वीकारला. त्यानें गॉथ लोकांचा युद्धांत पराभव केला, आणि तह करून त्यांनां थ्रेस, फ्रिजिआ व लिबिआ या प्रांतांत राहण्यास परावानगी देऊन आपल्या सैन्यांत त्या लोकांची बरीच भरती केली. या कारकीर्दीत कित्येक बंडे झालीं. पण तीं सर्व मोडून अखेर ३९४ मध्यें थीओडोशिअस सर्व रोमन साम्राज्यावर राज्य करूं लागला. ३९५ मध्यें तो मरण पावला; आणि आर्केडिअस पूर्व रोमन साम्राज्याचा व होनोरिअस पश्चिम रोमन साम्राज्याचा बादशहा झाला.
अ खे री चें श त क (इ. स. ३९५-४७६) - थीओडोशिअसच्या मरणानंतर रोमन साम्राज्याचे कायमचे दोन विभाग झाले. पश्चिम रोमन साम्राज्याची राजधानी रोम येथें होनोरिअस गादीवर बसला. पण तो केवळ ११ वर्षांचा असल्यामुळें स्टिलिको हा राजप्रतिनिधि या नात्यानें कारभार पाहूं लागला. ३९५ मध्यें गॉथ लोकांचा सेनापति अँलारिक यानें थ्रेस प्रांतावर स्वारी केली. तेव्हां त्याच्या विरुद्ध स्टिलिकोनें चाल करून जाऊन ३९६ मध्यें त्याला हांकून लाविलें. ३९७ मध्यें आफ्रिकेंत बंड झालें व त्यामुळें रोमला धान्याचा तुटवडा पडला. ४०३ मध्यें अँलारिक यानें इटालीवर स्वारी केली. या वेळींहि स्टिलिकोनें गॉथ लोकांचा पराभव करून इटालीचें संरक्षण केलें. ४०५ मध्यें पुन्हां केल्ट, जर्मन, सार्मेशिअन व गॉल या रानटी लोकांच्या दोन लोख सैन्याची राडागैससच्या नेतृत्वाखालीं इटालीवर स्वारी झाली. पण याहि वेळीं स्टिलिकोनें शत्रूंचा पराभव करून त्यांच्या सेनापतीला कैद केलें व त्यांच्या सैन्याचा नाश केला. रानटी लोकांच्या या हल्ल्यांपासून इटालीचें संरक्षण करण्याकरितां गॉल व ब्रिटन या प्रांतांतील बहुतेक रोमन सैन्य परत बोलाविण्यांत आलें होतें. ही संधि साधून ४०६ मध्यें व्हँडल नांवाच्या रानटी लोकांनीं गॉलवर चाल केली. ४०७ मध्यें ब्रिटनमध्यें बंड झालें; व तेथें कॉन्स्टंटाइन नांवाच्या इसमास बादशहा म्हणून मान्य करण्यांत आलें. ४०८ मध्यें स्टिलिकोचा खून झाला. त्याच सालीं अँलारिकनें रोम शहराला वेढा घातला आणि रोमन लोकांपासून बरेंच द्रव्य उकळलें. ४०९ मध्यें अँलारिकनें रोमला पुन्हां वेढा दिला व अँट्टालसला बादशहा म्हणून जाहीर केलें. याच सालीं जिरोन्शिअसनें स्पेनमध्यें बंड उभारिलें व मॅक्सिमसला बादशहा केलें. याच सालीं व्हँडल लोकांनीं स्पेनवर स्वारी केली. ४१० मध्यें अँलारिकनें रोम शहर हस्तगत करून तेथें लुटालूट केली. नंतर त्याच सालीं अँलारिक मरण पावला व आटावुल्फ हा गॉथ लोकांचा पुढारी झाला. ४११ मध्यें कॉन्स्टंटाइन व जिरोन्शिअस या राज्य बळाकाऊं पाहणा-या इसमांमध्यें युद्ध झालें, पण पुढें लवकरच ते दोघेहि मरण पावले. ४१२ मध्यें गॉलमध्यें जोव्हिनसला बादशहा करण्यांत आलें. होनोरिअस व आटावुल्फ यांच्यामध्यें तह होऊन ४१३ मध्यें आटावुल्फनें जोव्हिनसला ठार मारलें. ४१५ मध्यें आटावुल्फ स्पेनमध्यें मरण पावला व वालिआ हा गॉथ लोकांचा पुढारी बनला. ४१८ मध्यें गॉथ लोकांनीं सर्व स्पेन देश जिंकून घेतला. त्याच सालीं वालिआ मरण पावून पहिला थीओडोरिक हा गॉथ लोकांचा पुढारी बनला. ४२३ मध्यें होनोरिअस मरण पावला. ४२५ मध्यें त्याचा पुतण्या तिसरा व्हॅलेंटिनिअन हा बादशहा झाला. याच्या कारकीर्दींत गॉथ लोकांबरोबर युद्ध चालूच होतें. ४३१ मध्यें व्हँडल लोकांनीं आफ्रिकेंतील बराच प्रांत जिंकून घेतला. ४३४ मध्यें अँटिला हा हूण लोकांचा राजा झाला. ४३९ मध्यें गॉथ लाकांबरोबर तह करण्यांत आला. ४५१ मध्यें अँटिलानें गॉलवर स्वारी केली, पण त्याचा ईलिअस व थीओडोरिक यानीं शालोन येथें पराभव केला. ४५२ मध्यें अँटिलानें इटालीवर स्वारी केली, व ४५३ मध्यें तो मरण पावला. ४५५ मध्यें व्हॅलेंटिनिअन बादशहाचा खून करून मॅक्सिमस बादशहा झाला. गादीवर बसल्यावर त्यानें व्हॅलेंटिनिअनच्या विधवा राणीचा खून केला. पण त्याच सालीं त्याचा स्वतःचाहि खून झाला. ४५७ मध्यें माजोरिअन बादशहा झाला. त्यानें ४५८ मध्यें व्हँडल व गॉल लोकांवर स्वारी करून त्यांचा पराभव केला, व दुस-या थीओडोरिकबरोबर तह केला. ४६१ मध्यें माजोरिअनला रिसिमरनें पदच्युत करून ठार मारिलें. नंतर सिव्हीरस बादशहा झाला. ४६२ मध्यें व्हँडला लोकांनीं इटालींत शिरून बरीच लुटालूट व जाळपोळ केली. ४६५ मध्यें सिव्हीरस मरण पावला, व रिसिमरनें सर्व सत्ता आपल्या हातीं घेतली. ४६७ मध्यें अँन्थिमिअसला बादशहा करण्यांत आलें. ४७२ मध्यें रिसिमरनें अँन्थिमिअसला ठार मारिलें, पण तो स्वतःहि त्याच सालीं मरण पावला. ४७३ मध्यें ग्लिसरिअस बादशहा झाला. त्याच सालीं आस्ट्रोगॉथ लोकांनीं रोमन साम्राज्यावर स्वारी करण्याची तयारी चालविली. ४७४ मध्यें ग्लिसरिअस पदच्युत झाला, व पुढील वर्षीं रॉम्युलस ऑगस्टयुलस बादशहा झाला. ४७६ मध्यें ओडोआसरनें इटालीवर स्वारी केली; व रॉम्युलस ऑगस्टयुलसला पदच्युत करून स्वतः इटालीचा राज्यकारभार हातीं घेतला.