प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ५ वें.
रोमन संस्कृति.

रोम व हिंदुस्थान.- रोमन संस्कृतीच्या इतिहासाची पूर्तता हिंदुस्थान व रोमन साम्राज्य यांच्या परस्परसंबंधाविषयीं चार ओळी लिहिल्याशिवाय होणार नाहीं. युए-चि राजांच्या कारकीर्दीत रोमचा हिंदुस्थानाशीं ब-याच मोठ्या प्रमाणांत व्यापार चालू असल्याचा पुरावा सांपडतो. पहिला कडफिसेस आरंभीं फक्त ब्राँझचीं व तांब्याचीच नाणीं पाडीत असे. परंतु हिंदुस्थानांतून निर्गत झालेलें रेशमी कापड, मसाल्याच्या जिनसा, रत्ने, रंग इत्यादि वस्तूंच्या मोबदल्यांत रोमचें सोनें हिंदुस्थानांत येऊं लागलें तेव्हां दुस-या कडफिसेसला सोन्याचें नाणें पाडण्याची उपयुक्तता दिसून येऊन रोमन नाणच्या धर्तीवर तेवढ्याच वजनाचें व तितकेंच सोनें असलेलें त्यानें आपलें नाणें पाडलें. या काळांत रोम व हिंदुस्थानचा पश्चिम किनारा यांच्या मध्येंहि फार मोठा दर्यावर्दी व्यापार चालत असे. प्लिनि नामक इतिहासकार रोमन स्त्रियांच्या चैनबाजीविरुद्ध तक्रार करतांना म्हणतो कीं, हिंदुस्थानांतून येणा-या मालामुळें दरसाल साडेपांच कोटी सीस्टरसीझ (म्ह. ४,८६,९७९ पौंड किंवा जवळ जवळ पाऊण कोट रुपये) रोममधून हिंदुस्थानांत जातात व हिंदुस्थानांतील जिनसा तेथील किंमतीच्या शंभरपट किंमतीस रोममध्यें विकल्या जातात. परंतु दक्षिणेंतील राजांनीं आपलें स्वतःचें सोन्याचें नाणें न पाडतां, आज ज्याप्रमाणें जगाच्या ब-याचशा भागांत ब्रिटिश साव्हरिन चालतो त्याप्रमाणें रोममधून आलेली सोन्याचीं नाणींच आपल्या राज्यांत चालू केलीं होतीं. मदुरा येथील नदीच्या वाळवंटांत रुप्याच्या व सोन्याच्या नाण्यांप्रमाणें रोमन लोकांचीं तांब्याचीं नाणींहि बरींचशीं सांपडतात व त्यावरून त्या शहरीं रोमन लोकांची वस्तीहि असावी असें दिसतें.

वर दाखविल्याप्रमाणें हिंदुस्थान व रोम यांमध्यें व्यापारी दळणवळण तर होतेंच, परंतु त्याशिवाय दोन्ही देशांतील समकालीन बादशहांचाहि वकीलातीच्या रूपानें प्रत्यक्ष संबंध आला होता असें दिसतें. इ. स. ९९ मध्यें ट्राजन रोमला परत आल्यावर थोड्या दिवसांनीं त्याच्याकडे जी हिंदी वकीलात आली होती ती बहुधा कुशन राजा कनिष्क याजकडूनच रवाना झालेली असावी. इ. स. ११६ त ट्राजननें युफ्रेटीझ व तैग्रिस नद्यांमधील मेसापोटेमिया प्रांत काबीज केला तेव्हां रोमन साम्राज्याची पूर्व सरहद्द युए-चि साम्राज्याच्या पश्चिम सरहद्दीपासून अवघ्या ६०० मैलांवर येऊन भिडली होती; व पुढें जरी हेड्रिअननें युफ्रेटीझच्या पश्चिमेकडील मुलूख सोडून दिला असला, तरी रोमन साम्राज्याच्या वैभवाचा डंका उत्तर व पश्चिम हिंदुस्थानांतील राजांच्या कानीं आल्याशिवाय राहिला असेलसें संभवत नाहीं. दक्षिण हिंदुस्थानांतील राजांकडूनहि रोमच्या दरबारीं वकील पाठविण्यांत येत असत असें दिसतें. युसेबिअस याच्या 'जॉर्जिअस सिंकेलस याची शकावली' या ग्रंथांत (इ. स.८००) असें म्हटलें आहे कीं, हिंदूंचा राजा 'पांडियन' यानें ऑगस्टसकडे मैत्री व सख्य संपादन करण्याकरितां वकील पाठविले. या प्रसंगाचा येथें उल्लेख करणें म्हणजे हिंदुस्थानच्या मध्ययुगापर्यंत येणें होय. आतां हिंदुस्थानाकडे वळून या कालापर्यंत येऊन पोंचलें पाहिजे.