प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ५ वें.
रोमन संस्कृति.

बादशाही काळाच्या पहिल्या दोन शतकांतील देशस्थिति - या काळांत अमीन उमरावांचें वैभव व ऐषआराम, कांहीं विशिष्ट ठिकाणींच लोकसंख्येचें केंद्रीभवन, रोमन लोकांचा निष्ठुरपणा व निर्दयता अशा निरनिराळ्या कारणांमुळें देशांत दारिद्र्य वाढलें. कांहीं बादशहांनीं गरीबगुरिबांस धान्य वांटून जो दयाळूपणा दाखविला, त्यामुळें देशाचा फायदा होण्याच्या ऐवजीं लोकांत आळशीपणा मात्र वाढला. परंतु यूरोपच्या राजधानींत दिसून येणारी ही दुःस्थिति साम्राज्याच्या दूरदूरच्या भागांत क्वचितच दिसून येत होती. याचें कारण येथील लोकांची रहाणी रोमच्या लोकांप्रमाणें ऐषआरामाची बनली नव्हती हें होय. रोमनें तत्कालीन जगाचा नैतिक अधःपात केला असें जें म्हणतात तें सर्वस्वीं नसलें तरी ब-याच अंशीं खरें आहे. रोमपेक्षां रोमन साम्राज्यांतील प्रांतांची स्थिति पुष्कळ चांगली होती, याचें कारण सर्व ठिकाणचे दुर्गुणी व व्यसनी लोक रोममध्यें येऊन रहात असल्यामुळें तेथें रोमन सदगुणांचा परिपोष होण्यास अवकाशच राहिला नव्हता.

आ यु ष्य क्र म व चा ली री ती - रोम शहराच्या लोकसंख्येंत झपाट्यानें वाढ झाल्यामुळें अशा प्रकारच्या दाट वस्तीच्या शहरांतील सर्व दोष तेथेहि दिसून येत होते. दुकानें घालून बसण्याची पद्धति अद्याप प्रचारांत आली नसल्यामुळें बहुतेक व्यापार फेरीवाल्यांमार्फतच चालत होता. त्यांतच आश्रितांचा व नोकरचाकरांचा घोळका बरोबर घेतल्याशिवाय उंबरठ्याबाहेर पाऊलहि न टाकणा-या अमीर-उमरावांच्या अनुयायांची भर पडत असे. व्यापाराकरितां व रोमचें वैभव पाहण्याच्या जिज्ञासेनें निरनिराळ्या देशचे लोक तेथें एकत्र जमत असल्यामुळें त्या शहरास मुंबईसारख्या बकाल वस्तीच्या शहराचें स्वरूप आलें होतें. सरकारी कामकाज व इतर उद्योगधंद्याचे व्यवसाय सकाळपासून दुपारपावेतों चालत असत. मध्यान्हीं सूर्य येतांच सर्व लोक आपलें कामकाज संपवून घरीं जाऊन कांहीं वेळ वामकुक्षी करीत. यानंतर पुढें अंधार पडेपावेतों लोकांचा सर्व वेळ विश्रांति घेण्यांत व करमणुकीच्या साधनांनीं स्वतःचें मनोरंजन करण्यांत जात असे. सुखवस्तू लोक व वेळ पोहणें, पळणें, घोड्यावरून फेरफटका करणें, भाल्याची फेंक करणें यांसारख्या व्यवसायांत घालवीत. गरीब लोकांस असल्या श्रमाच्या करमणुकींच्या साधनांची अर्थातच आवश्यकता नसे. हे खेळ सामान्यतः टायबर नदीकांठच्या सार्वजनिक मैदानांत होत असत; व तो झाल्यानंतर मुद्दाम तयार केलेल्या स्नानगृहांत जाऊन उटणीं व सुवासिक तेलें अंगास लावून उष्णोदकस्नान किंवा बाष्पस्नान करण्याची वहिवाट होती. रोमन लोकांस स्नानाची फार आवड होती व गरीब लोक देखील सार्वजनिक स्नानगृहांत जाऊन थोडेसे पैसे देऊन हें सुख अनुभवीत असत. या सार्वजनिक स्नानगृहांचा स्त्रियादेखील उपयोग करीत असें दिसतें.

रोमन लोक जेव्हां नाटकास किंवा सर्कशीस जात नसत तेव्हां ते घराबाहेर पडून रस्त्यांतील मौज पहात पहात चौकाकडे किंवा दुस-या एखाद्या सार्वजनिक ठिकाणीं जात. तेथें एखादा खबरबातम्या जमविणारा कोणी तरी वक्ता उभा राहून तो शहरांतील बादशहासंबंधींच्या किंवा साम्राज्यांतल्या इतर भागांतील बातम्या जमलेल्या लोकांस सांगून त्यांचें मनोरंजन करीत असे. यानंतर साहजिकच त्या ठिकाणीं जमलेल्या लोकांत प्रचलित राजकारणविषयक गोष्टींचा खल होऊन जो तो तत्संबंधीं आपल्या मतांचा उच्चार करीत असे. त्या काळीं वर्तमानपत्रें नसल्यामुळें बातम्या काढणा-या लोकांचा एक वर्गच अस्तित्वांत होता. तो बादशहाच्या व इतर मोठमोठ्या लोकांच्या हालचालींची खडानखडा माहिती ठेवीत असल्याचें दाखवीत असे. ह्या लोकांच्या द्वारें शहरांत ज्या बाजारगप्पा उठत त्यांस आळा घालण्याकरितां बादशहा जितका अधिकाधिक प्रयत्न करी तितका त्यांनां जास्तच ऊत येत असे. लोक आपल्याविषयीं काय बोलतात हें जाणण्यासाठीं बादशहाचे हेर सर्वत्र पसरलेले असल्यामुळें सार्वजनिक ठिकाणीं बादशहाच्या कृत्यांवर टीका करण्यास सामान्यतः लोक कचरत असत. तथापि वेळप्रसंगीं समयोचित कोटि करून स्वतःचा प्राणहि धोक्यांत घालणारे लोक आढळून येत नव्हते असें नाहीं.

ले ख न व्य व सा य व ग्रं था ल यें- होरेस म्हणतो कीं, या काळांत जवळ जवळ प्रत्येक इसमास आपल्या अंगीं लेखनकर्तृत्व आहे असें वाटत होतें. परंतु प्रत्येक इसमास आपले लेख प्रकाशित करण्याची ऐपत असणें शक्य नसल्यामुळें आपले लेख लोकांच्या नजरेस आणण्याच्या हेतूनें कित्येकजण, इतरांकडून टर उडविली जाण्याचीहि परवा न करतां आपले लेख सार्वजनिक ठिकाणीं किंवा इष्टमित्रांत वाचून दाखवित असत. सिनेकाचीं दुःखपर्यवसायी नाटकें उपलब्ध आहेत तीं अशा प्रकारें वाचून दाखविण्याकरितांच लिहिलेलीं असल्यामुळें त्यांची नाटकांचे नियम कडक रीतीनें लावून परीक्षा करणें युक्त होणार नाहीं.

रोम येथें ग्रंथप्रकाशनाचें काम त्या काळांत देखील जवळ जवळ हल्लींइतकेंच जोरांत चालू होतें. हर्क्युलेनिअम येथें जो खासगी ग्रंथसंग्रह सांपडला आहे, त्यावरून तत्कालीन पुस्तकांसंबंधीं बरीच कल्पना करतां येते. त्या वेळच्या खासगी ग्रंथालयांत देखील तीस तीस, बत्तीस बत्तीस हजार पुस्तकें असल्याचे उल्लेख सांपडतात. प्रत्येक पुस्तक पापायरसच्या किंवा चर्मपत्राच्या लांबलचक तुकड्याचें काडीभोंवतीं वळकटी केलेलें एक भेंडोळें असून तें झांकण असलेल्या नळकांड्यांत सुरक्षितपणें ठेविलेलें असे. खासगी लोकांच्या ग्रंथालयांत जर इतकीं पुस्तकें आढळून येतात, तर सार्वजनिक ग्रंथालयांत यापेक्षां कितीतरी अधिक पुस्तकें असलीं पाहिजेत. सीझरचा मित्र आसिनिअस पॉलिओ (मृत्यु ख्रि. पू. ६) यानें पहिलें साव्रजनिक ग्रंथालय स्थापिलें असें म्हणतात. तथापि सार्वजनिक ग्रंथालयास खरें महत्त्व ऑगस्टसच्या वेळेपासूनच आलेलें दिसतें. पब्लिअस व्हिक्टरच्या लिहिण्यावरून रोममध्यें त्या काळीं कमींत कमी २९ तरी सार्वजनिक ग्रंथालयें होतीं असें कळतें. तत्कालीन लोकप्रिय ग्रंथकारांत ओव्हिड, प्रोपर्शिअस व मार्शिअल हे औपरोधिक लेखक; होमर, व्हर्जिल, होरेस हे कवी; व सिसिरो, लिव्हि व प्लिनि हे गद्य लेखक देतां येतील. पुस्तकांत धंदा मुख्यत्वेंकरून रोममध्यें असलेल्या सुशिक्षित ग्रीक गुलामांनींच चालविलेला होता; व रोम शहरांत गुलामांचा भरणा बराच असल्यामुळें, त्या काळीं छापण्याची कला अस्तित्वांत नव्हती तरी पुस्तकें कमींत कमी पांच दिनारांइतक्या स्वल्प किमतींत विकतां येत असत.