प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ५ वें.
रोमन संस्कृति.

रानटी टोळ्यांचा रोमन साम्राज्यावर हल्ला - इंडोजर्मानिक टोळ्यांनां यूरोपावर चालून येण्यास दोन मार्ग होते. एक काळ्या समुद्राच्या उत्तरेकडचा, व दुसरा त्या समुद्राच्या दक्षिणेकडचा. प्रथम हेलेनिक व इटालिक जातींच्या टोळ्या येऊन ग्रीस व इटाली देशांत वसाहत करून राहिल्या व तेथें एक हजार वर्षांच्या अवधींत या लोकांनीं एक उच्च दर्जाची विशिष्ट संस्कृति तयार केली. कलाकौशल्य व वाङ्‌मय, तसेंच राजकारणपटुत्व व लष्करी व्यवस्था या सर्व बाबतींत त्यांनीं इतकी प्रगति केली कीं, त्यांच्या प्राचीन सुधारणा आतांपर्यंत आधुनिक यूरोप खंडाला मार्गदर्शक होऊन राहिल्या आहेत. रोमन साम्राज्य वैभवाच्या शिखरास पोहोंचलें होतें त्या सुमारास सुसंस्कृत बनलेल्या ग्रीस व इटाली देशांवर पुन्हां जर्मन रानटी टोळ्यांची नजर जाऊन त्यांनीं रोमन सरहद्दींत घुसण्यास सुरुवात केली. प्रथम रोमन लोकांनीं या रानटी जर्मन टोळ्यांनां जिंकून आपल्या सुधारणाकक्षेखालीं घेतलें. परंतु पढें दोन शतकें रोमन सरकारनें सरहद्दीवर चांगला लष्करी बंदोबस्त ठेवून या रानटी टोळ्यांनां आंत घुसूं द्यावयाचें नाहीं असें धोरण चालविलें. तथापि रोमन सैन्यांत पुढें पुढें या रानटी पण धिप्पाड व धाडशी लोकांचा समावेश मोठ्या प्रमाणांत होऊं लागला.

जर्मानिक वंशांतील हे रानटी लोक सुधारणेचें अनुकरण करण्याच्या गुणांत विशेष तरबेज होते. यांच्यापैकीं रोमन साम्राज्यांत राहिलेले कित्येक लोक रोमन शहरांत शिक्षण मिळवून व लष्करांत नोकरी करून मोठे कर्तबगार पुढारी बनले, व त्यांनीं आपल्या जातींतील बांधवांचें लक्ष व सहानुभूति साहजिकच आपणांकडे ओढून घेतली. अशा रीतीनें रोमनें आपणच आपल्या शत्रूस आपल्या घरांत जागा देऊन बलाढ्य प्रतिस्पर्धी निर्माण करून घेतला; व या शत्रूनेंच अखेर रोमन साम्राज्याचा घात केला. या रानटी टोळ्यांच्या निरनिराळ्या पुढा-यांनीं ४ थ्या व ५ व्या शतकांत रोमन साम्राज्यांत अनेकदां घुसून रोमला त्रास दिला इतकेंच नव्हे तर खुद्द रोम शहर हस्तगत करून तेथें लुटालूट व जाळजोळ केली. इ. स. ४७६ च्या सुमारास यांचा ओडोआसर हा पुढारी रोम येथें बलिष्ठ बनला; व पूर्व रोमन साम्राज्याचा बादशहा झीनो यानें त्याला इटालीचा सत्ताधीश म्हणून मान्यहि केलें.

येणेंप्रमाणें सात शतकें पश्चिमेकडील अखिल ज्ञात जगावर सत्ता ज्या विख्यात रोम शहरानें गाजविली, त्याच रोम शहरांत परक्या रानटी जर्मानिक टोळ्यांचें राज्य सुरू झालें. ४७६ मध्यें पश्चिम रोमन साम्राज्याचा अंत होऊन रोमन मुलुखावर रानटी जर्मन टोळ्यांची वसाहत कायम होण्याचा मार्ग मोकळा झाला.

परिस्थितींतील या घडामोडीनें तत्कालीन रोमन समाजाला विशेषसा धक्का बसला नाहीं. कारण ख्रिस्तीसंप्रदायाच्या प्रसारामुळें रोमन समाजाचें पूर्वींचें विशिष्टत्व फारसें उरलें नव्हतें. विस्कळित झालेल्या व नैतिक व शारीरिक दृष्ट्या अधःपतन पावलेल्या रोमन समाजाचें हें भवितव्य कित्येक दूरदर्शी राजकारणी पुरुषांनां बरेंच अगोदर दिसूं लागलेलें होतें. फार काय, पण रॉम्युलसनें प्रथम रोम शहर वसविलें तेव्हांची बारा गिधाडांसंबंधाची जी दंतकथा प्रचलित होती तिच्यामुळें १२ शतकांनीं रोमन शहराचें वैभव नष्ट होणार हें ब्रह्मलिखित जणूं काय स्वतः रोमन समाज देखील जाणूनच होता असें प्रतिपादण्यांत येतें ! यामुळें तत्कालीन गद्यपद्यांत रोमन सत्तेच्या या अंताबद्दल सुखदुःखपर असें अवाक्षरहि काढलेलें आढळत नाहीं.

या एवढ्या बलाढ्य रोमन साम्राज्याचा अंत कशानें झाला, या प्रश्नाला आजकालच्या इतिहासकारांचें उत्तर असें आहे : ''हा अंत विशिष्ट प्रकारच्या राज्यघटनेमुळें झाला नाहीं, किंवा विशिष्ट प्रकारच्या समाजरचनेमुळें झाला नाहीं, किंवा विशिष्ट प्रकारच्या स्त्रीपुरुषसंबंधामुळें झाला नाहीं, किंवा ख्रिस्ती संप्रदायप्रसारामुळें झाला नाहीं, किंवा नव्या नव्या भौतिक शोधांच्या अभावामुळेंहि झाला नाहीं; तर रोमन राष्ट्रांतील एकंदर जोम कालमानाबरोबर कमी कमी होत गेल्यामुळें अखेर सदरहू प्रकारचा शेवट ओढवला. वरील गोष्टी ह्या अंतःस्थ सत्ताभावाची केवळ बाह्य चिन्हें होत. राष्ट्रांतील जोम हें भौगोलिक परिस्थितीचें फळ आहे. ग्रीस व इटाली या दोन्ही देशांचें हवापाणी बुद्धिमान् व जोमदार मनुष्यजात निर्माण करणारें आहे, पण हा जोम दीर्घकाळ टिकविण्याचें सामर्थ्य त्या हवेंत नाहीं. त्यामुळें दोन्हीं राष्ट्रें विशिष्ट कालावधीनंतर नष्ट झालीं. ग्रीसपेक्षां इटाली देशाचा विस्तार मोठा असल्यामुळें रोमन राष्ट्र कांहीं अधिक शतकें टिकलें इतकेंच कायतें.''तथापि हें निदान इतिहासकारांचें आहे, शास्त्रज्ञांचें नाहीं. शास्त्रज्ञांच्या दृष्टीनें हें हवापाण्याचें निदान कसें फोल ठरतें तें पुढें विज्ञानेतिहास या पांचव्या विभागांत योग्य स्थळीं दाखविण्यांत येईलच.