प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ५ वें.
रोमन संस्कृति.

अखेरच्या तीन शतकांतील परिस्थिति - रोमन साम्राज्याच्या अखेरच्या अवनतीच्या काळांतील अत्यंत महत्त्वाची कारकीर्द म्हटली म्हणजे कॉन्स्टंटाइन दी ग्रेट या बादशहाची होय. हा प्रथम स्वतः सहकुटुंब ख्रिस्ती संप्रदायानुयायी बनला; आणि ख्रिस्ती लोकांचा छळ त्यानें बंद केला. साम्राज्याचा कारभार सुव्यवस्थित चालविण्याकरितां त्यानें अनेक महत्त्वाचे कायदे केले. त्यांपैकीं दोन कायदे विशेष महत्त्वाचे आहेत. (१) गरीब, दरिद्री आईबाप लहान अर्भकांनां निर्वाहाच्या साधनांच्या अभावामुळें ठार मारीत असत. तो अनिष्ट प्रकार बंद पाडण्याकरितां कॉन्स्टंटाइनें दयाळूपणानें गरीब कुटुंबास सरकारी मदत देण्यासंबंधानें कायदा केला. (२) स्त्रियांवर होणा-या बलात्काराच्या गुन्ह्याबद्दल त्यानें फार कडक म्हणजे मरणाची शिक्षा ठेविली. बलात्कार करणा-या पुरुषास जिवंत जाळावें किंवा क्रूर श्वापदांच्या भक्ष्यस्थानीं द्यावें असा त्यानें कायदा केला. आईबापांच्या घरांतून तरुण मुलींनां पळवून नेणा-या इसमांनांहि हीच कडक शिक्षा असे, व अशा कृत्याला त्या तरुणीची संमति असल्यास दोघांनांहि मरणाची शिक्षा मिळत असे.

कॉन्स्टंटाइनच्या कारकीर्दीतील आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हटली म्हणजे कॉन्स्टांटिनोपल या राजधानीच्या शहराची स्थापना ही होय. ह्या शहराच्या सुधारणेकरितां त्यानें सुमारें पावणेचार कोट रुपये खर्च केले. या शहरांत त्यानें एक विद्यालय, दोन नाटकगृहें, आठ सार्वजनिक व १५३ खासगी स्नानगृहें, पांच धान्याचीं कोठारें, आठ जलनिधी, सेनेट व न्यायकचेरी यांच्या उपयोगांकरितां चार मोठाले दिवाणखाने, १४ प्रार्थनामंदिरें, १४ राजवाडे व उच्च वर्गांतील रोमन लोकांनां राहण्याकरितां ४,३८८ सुंदर इमारती बांधविल्या. रोम शहरांतील सीझर बादशहांच्या वेळची धान्य व पैसे वांटण्याची चाल आतां त्यानें या नव्या राजधानींत सुरू केली. अनेक धंद्यांतील कारागिरांनीं, व्यापा-यांनीं व गाड्याघोड्यांच्या गर्दीनें ही नवी राजधानी गजबजून गेली व तिचें वैभव रोमच्या बरोबरीनें दिसूं लागलें. परंतु हा सर्व देखावा विझणा-या दिव्याच्या शेवटीं मोठ्या होणा-या ज्योतीप्रमाणें होता.