प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ५ वें.
रोमन संस्कृति.
रोमन बादशाही अंमलाचीं पहिलीं दोन शतके (इ. स. १४-१८०) - ऑगस्टस बादशहानें रोमन राज्यकारभाराला जें बादशाही वळण लावून दिलें तद्नुसार पुढील २०० वर्षें रोमन साम्राज्याला बरीच सुखशांतीचीं व बाह्यतः भरभराटीचीं गेलीं. परंतु त्यामुळें राज्यकारभाराचें लोकनियंत्रित स्वरूप मात्र हळू हळू नाहीसें होत जाऊन त्यांत अनेक अनिष्ट फेरफार होत गेले. ऑगस्टस आणि तदुत्तर बादशहा यांनीं अनेक बाबतींत फेरफार केले. सीझरच्या वेळेपासून खड्या सैन्याची योजना अंमलांत आली होती; व या सैन्याच्या जोरावर पुढील बादशहांनीं राज्यकारभारपद्धतीला लष्करसत्ताक पद्धतीचें स्वरूप दिलें. या २०० वर्षांतील ऐतिहासिक महत्त्वाच्या गोष्टी येणेंप्रमाणें:-
टा य बी रि अ स ते नी रो (इ. स. १४-६८) - टायबीरिअसच्या कारकीर्दीत त्याचा पुतण्या जर्मानिकस यानें उत्तरेकडील जर्मन टोळ्यांचा दोन वेळां पराभव केला. पुढील बादशहा कालिग्युला इ. स. ३७ मध्यें गादीवर आला, पण त्याचा ४१ मध्यें खून झाला. नंतरचा बादशहा क्लॉडिअस यानें. इ. स. ४३-४७ मध्यें ब्रिटनवर स्वारी करून तो देश जिंकून घेतला. ४३ मध्यें लिशिआ प्रांत व ४४ मध्यें जुडीआ प्रांत रोमन साम्राज्यांस जोडण्यांत आला. ५४ मध्यें क्लॉडिअसची बायको अँग्रिपायना हिनें नव-याला विष घालून ठार मारिलें. त्यानंतर तिचा मुलगा नीरो (इ. स. ५४-६८) हा राज्यावर आला. त्यानें आपला सावत्रभाऊ ब्रिटॅनिकस व आई अँग्रिपायना यांनां ठार मारिलें. ६२ मध्यें त्यानें स्वतःची बायको ऑक्टेव्हिआ हिलाहि ठार केलें. या काळांत पार्थिया व आर्मीनिया या देशांशीं लढाया झाल्या, व अखेर त्यांनीं रोमचें सार्वभौमत्व कबूल केलें. ६४ सालीं रोम शहराचा बराचसा भाग आग लागून जळून गेला. नवीन उदयास आलेल्या ख्रिस्ती संप्रदायाच्या छळास सुरुवात झाली. ६६ मध्यें यहुदी लोकांबरोबर युद्ध झालें. ६८ मध्यें गॉल व स्पेन येथें बंडें झालीं व त्याच वर्षीं नीरोनें आत्महत्या केली. नीरो हा सीझरच्या घराण्यांतला शेवटचा बादशहा होय.
फ्ले व्हि अ न घ रा णें- नीरोनंतर व फ्लेव्हिअन घराण्याला सुरुवात होण्यापूर्वी इ. स. ६८-६९ या सालांत शाल्बा, ओथो व व्हिटेलिअस यांनीं एकामागून एक बादशाही सत्ता बळकावली होती; परंतु त्यांनां ती फार दिवस लाभली नाहीं. ६९ मध्यें व्हेस्पेशिअन हा फ्लेव्हिअन घराण्यांतला पहिला बादशहा सेनेटनें व सैन्यानें दोघांनींहि मान्य केला. यानें बरींच सार्वजनिक लोकोपयोगी कामें केलीं आणि सैन्यामध्यें, जमाखर्चामध्यें आणि राज्यकारभाराच्या इतर कित्येक अंगांत सुधारणा केल्या. याच्या कारकीर्दींत बाटेव्हिअन लोकांनीं बंड केलें. तें रोमन सेनापति सीरिएलिस यानें मोडलें. यालाच पुढें इ. स. ७१ मध्यें ब्रिटनचा गव्हर्नर नेमण्यांत आलें. ७८ मध्यें आग्रिकोला यानें ब्रिटनवर पुन्हां स्वा-या केल्या. फ्लेव्हिअन घराण्यांतला दुसरा बादशहा टायटस हा ७९ मध्यें राज्यावर आला. त्याच वर्षीं व्हेसुव्हिअस ज्वालामुखीचा स्फोट होऊन पाँपेयि व हर्क्युलेनिअम या शहरांचा नाश झाला. यानंतर लवकरच सदरहू घराण्यांतील तिसरा बादशहा डोमिशिअन (इ. स. ८१-९६) हा गादीवर आला. याच्या कारकर्दींत ८३ मध्यें जर्मनींतील चॅट्टिलोकांबरोबर युद्ध झालें. ८४ मध्यें आग्रिकोला या रोमन सेनापतीनें कॅलिडोनिअन लोकांचा पराभव करून सर्व ब्रिटन देश जिंकून घेतला. ८६ मध्यें डेशिअन लोकांनीं मीशिआवर स्वारी केली; आणि रोमन सैन्याचा पराभव केला. ९० मध्यें डेशिअन लोकांबरोबर तह झाला. ९३ मध्यें उत्तर जर्मनीचा गव्हर्नर ऑटॉनिअस साटर्निअस यानें बंड केलें, पण बादशहानें तें मोडलें. व या बंडांत सामील असलेल्या अनेकांनां क्रूरपणानें फांशीं दिलें. तसेंच या बादशहानें अनेक तत्त्ववेत्त्यांनां रोममधून हांकून लावलें, व यहुदी व ख्रिस्ती लोकांचा छळ केला. अशा अनेक कारणांनीं हा बादशहा अप्रिय झाल्यामुळें याचा खून झाला.