प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ५ वें.
रोमन संस्कृति.

राजसत्ताक काळांतील लोकस्थिति - या आद्य काळांत रोमच्या नागरिकांचे तीन विभाग पाडलेले होते. त्यांनां 'ट्राइब' म्हणत. प्रत्येक ट्राइबचे दहा पोटवर्ग असत त्यांनां 'क्यूरी' म्हणत. अनेक रोमन कुटुंबे मिळून एक क्यूरी होत असे. याप्रमाणें रोमन समाजाचा रोमन कुटुंब हा आद्यघटक असे. प्रत्येक कुटुंबांत पालक आणि पाल्य अशीं दोन दर्जांचीं माणसें असत. याशिवाय रोमन लोकांनीं आसपासचा प्रदेश जिंकल्यावर तेथील लोकांचा रोमन राष्ट्रांत समावेश होऊं लागला. तथापि त्यांनां रोमन लोकांचे नागरिकत्वाचे सर्व हक्क देण्यांत आलेले नव्हते. हे लोक प्लीबियन्स (कॉमन्स) या नांवानें रोमच्या इतिहासांत प्रसिद्ध आहेत. हे लोक निराळ्याच मानववंशांतील असून त्यांमध्यें मातृकन्यापरंपरा असे असें कित्येकांचें मत आहे.

राज्यकारभार- या आद्य काळांत रोम येथें राजांचा अंमल होता. तथापि राजांच्या हातीं अनियंत्रित सत्ता नव्हती. प्रथमपासूनच रोम येथें सेनेट अस्तित्वांत येऊन तिच्या सल्ल्यानें राजाला आपला राज्यकारभार चालवावा लागत असे. शिवाय खुद्द रोमन नागरिकांची म्हणजे तीस क्यूरीची एक लोकसभा असे. पुढें प्लीबियन लोकांचा रोमच्या राज्यांत अंतर्भाव झाल्यावर या लोकांची स्वतंत्र लोकसभा स्थापन झाली. येणेंप्रमाणें इंग्लंडामधील पार्लमेंटांतील लार्डांची (बड्या लोकांची) सभा आणि कॉमन्स (सामान्य) लोकांची सभा यांच्याप्रमाणें प्राचीन रोमन राज्यांतहि दोन लोकसभा होत्या; आणि पॅट्रिशियन आणि प्लीबियन असे रोमन लोकांचे दोन वर्ग होते. नागरिकत्वाचे हक्क या दोन वर्गांनां कमजास्त प्रमाणांत होते. परंतु युद्धाच्या वेळीं मात्र सर्व रोमन लोक समानतेनें व एकजुटीनें रणांगणावर वागत असत.

पा र मा र्थि क सं प्र दा य - रोम शहर स्थापन झाल्यानंतर कांहीं वर्षें रोममध्यें सार्वजनिक देवळें व मूर्तिपूजा अस्तित्वांत नव्हती. पुढें एट्रुस्कन लोकांशीं संबंध आल्यावर ज्युपिटर, ज्यूनो आणि मिनर्व्हा या तीन देवतांचीं देवळें ठिकठिकाणी बांधण्यांत येऊं लागलीं. मूर्तीपूजेची कल्पना ही मूळ एट्रुस्कन लोकांची नसून ती त्यांनीं ग्रीक लोकांपासून घेतली असा कित्येकांचा समज आहे. पुढें मात्र रोमच्या राज्यांतील प्रत्येक शहरांत वर सांगितलेलीं तीन मुख्य देवालयें आणि तीन देवतांच्या नांवाचे तीन दरवाजे प्रत्येक शहराला बांधण्योत येऊं लागले. रोमन लोकांनीं आपले दुसरे अनेक धार्मिक विधीहि एट्रुस्कन लोकांपासूनच घेतले. इतकेच नव्हे, तर हे धर्मविधी चांगले समजावे म्हणून एट्रुस्कन भाषा आणि त्यांचे धार्मिक विधी उच्च रोमन घराण्यांतील तरुणांनां शिकविण्यांत यावे असा सेनेटनें कायदा केला.

रो म न लो कां चे शि क्ष ण- रोमन कुटुंबांतील माणसांनीं वैयक्तिक स्वातंत्र्य व स्वार्थ विसरून जाऊन सर्वस्वीं रोमन राष्ट्राच्या हिताकरितां झटावें, सर्व रोमन प्रजाजनांनीं पराक्रमी योद्धे आणि कर्तव्यनिष्ठ नागरिक बनावें अशा त-हेचें ध्येय पुढें ठेवून त्यांस शिक्षण देण्यांत येत असे. या विशिष्ट वळणाच्या शिक्षणाचा फायदा रोमन राष्ट्राला किती झाला हें पुढें सॅमनाइट युद्धामध्यें व त्या सुमाराच्या रोमच्या भरभराटीच्या स्थितींत दिसून आलें. त्या काळच्या रोमन नागरिकांमध्यें आज्ञाधारकपणा, सदाचरण, प्रामाणिकपणा आणि काटकसर हे गुण प्रामुख्यानें दिसून येत असत. आणि या सर्वांहून अत्यंत महत्त्वाचा गुण म्हटला म्हणजे राष्ट्राच्या हिताकरितां आपल्या सर्वस्वाची किंबहुना प्रत्यक्ष प्राणाची आहुति देण्याची त्यांची तयारी असे. हे राष्ट्रीय सदगुण बाजूस ठेवून रोमन लोकांच्या खासगी वर्तनाकडे पाहिल्यास रोमन लोक मोठे कठोर व कडक स्वभावाचे दिसतात. दया व औदार्य हे गुण त्यांच्यामध्यें नव्हते असें म्हटलें तरी चालेल. श्रीमंत रोमन लोक ॠणकोला कर्जफेडीसाठीं गुलाम करून राबवीत असत, किंवा विकीत असत. कुटुंबांतील माणसांनां व प्रत्यक्ष मुलाबाळांनां गुलामांप्रमाणेंच कडक रीतीनें वागविण्यांत येत असे. रोमन लोक व्यापारधंद्यामध्यें मोठे धूर्त आणि आपमतलबी असत. इतर देश जिंकतांनां सुद्धां त्यांची नजर द्रव्यावर असे. रोमन लोकांनीं आपलें साम्राज्य वाढविलें तें कीर्तीकरितां नव्हे किंवा जित लोकांचें कल्याण करण्याच्या बुद्धीनेंहि नव्हे, तर अनेक देश जिंकल्यानें आपल्याला मुबलक जमीन मिळून आपलें ऐश्वर्य वाढेल या बुद्धीनेंच होय. साम्राज्याचें वैभव प्राप्त होण्यापूर्वीं रोमन लोकांची राहणी गरीबीची आणि कडक शिस्तीची असे; व त्यांची खासगी नीतिमत्ताहि चांगली होती.

नी ति म त्ता- आद्य राजसत्ताक काळांत रोमन लोकांची वागणूक कशी असेल याची माहिती मिळत नाहीं. प्रजासत्ताकपद्धति अस्तित्वांत आल्यानंतर आरंभाच्या काळांत रोमन लोकांचा जो स्वाभाव ज्या चालीरीती दिसतात, त्यांवरून राजसत्ताक काळांतील स्थितीची कल्पना करणे बिनचूक होणार नाही. तथापि खासगी कौटुंबिक व्यवस्थेंत कुटुंबांतील मुख्याचा बायकामुलांवर जो पूर्ण अधिकार चालत असे ती वहिवाट रोमन लोकांत अगदीं आरंभापासूनच होती असें वाटतें. रोमन लोकांमध्यें कॉन्युबियम नांवाचा विवाहविधि असे. त्या विधीप्रमाणें झालेला विवाहसंबंध फार पवित्र मानीत असत. त्यांच्यांत एकपत्‍नीत्वाची चाल असून घटस्फोटाची वहिवाट फारशी नव्हती. रोमन लोक उपस्त्रिया ठेवीत असत, परंतु हा प्रकार कायद्यानें हलक्या दर्जाचा ठरविलेला होता. रोमन लोकांतले अत्यंत महत्त्वाचे गुण म्हटले म्हणजे कायदा आणि शिस्त यांची आवड आणि राष्ट्राकरितां कोणताहि स्वार्थत्याग करण्याची तयारी हे होत.

क ला कौ श ल्य- प्राचीन रोमन राजांच्या कारकीर्दीत ज्या मोठमोठ्या इमारती व मूर्ती किंवा पुतळे तयार झाले त्यांच्या कारागिरीचें ज्ञान रोमन लोकांनां एट्रुस्कन लोकांपासून मिळालें होतें. व या एट्रुस्कन लोकांनीं या कलेचे ज्ञान ग्रीक लोकांपासून मिळविलें असावें असें दिसतें. रोम येथील जुपिटरची व इतर देवांच्या मूर्ती, व देवळाच्या शिखरावरचा चार घोड्यांचा रथ हीं सर्व चिकणमातीची केलेली होतीं. ब्राँझ धातूचा उपयोग मूर्ति करण्याकडे ब-याच काळानंतर सुरू झाला. या राजसत्ताक काळांत रोम येथें रंगित चित्रें काढल्याचा पुरावा कोठें आढळत नाहीं. उपर्युक्त राजांच्या वेळचे लांकडाच्या किंवा धातूच्या पत्र्यावर लिहून ठेविलेले कांहीं कायदे आहेत, व हेंच आद्य काळांतील रोमन लोकांचें महत्त्वाचें स्मारक आहे. रोमन राजांच्या वेळीं कांहीं काव्यवाङ्‌मय व कांहीं पराक्रमवर्णनात्मक गद्य कथा प्रचलित असाव्या; परंतु हें लेखनिविष्ट केलेलें नव्हतें. तें सर्व वाङ्‌मय दंतकथाच्या रूपानें तोंडी प्रचलित राहिल्यामुळें त्यांत पिढ्यानुपिढ्या फरक होत गेला. तात्पर्य या आद्यराजसत्ताक काळांतील लेखी पुरावा उपलब्ध नसल्यामुळें या काळांतील रोमन लोकांची बुद्धिमत्ता व आचारविचार याविषयीं गाढ अज्ञान आहे, व पुढेंहि तें तसेंच राहाणार असें वाटतें.