प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ५ वें.
रोमन संस्कृति.
ऑगस्टाइन काळांतील लोकस्थिति - ऑगस्टस आणि तदुत्तर बादशहा यांनीं रोमन साम्राज्याला जी शांतता मिळवून दिली तिजबद्दल रोमन प्रजेला बरीच मोठी किंमत द्यावी लागली. ती किंमत म्हणजे बादशहांनीं हातीं घेतलेले सर्वाधिकारित्व ही होय. बादशाही काळांत कांहीं युद्धें झालीं. परंतु ती साम्राज्यवृद्धीकरितां नसून साम्राज्यांतील दूरदूरचे प्रांत संरक्षण करण्यापुरतीं होतीं. रोमन लोकसत्ताकाच्या काळांतील देश जिंकण्याकरितां केलेलीं अनेक युद्धें व पुढें झालेलीं रोमन पुढा-यांतील आपसांतील युद्धें यांनीं रोमन लोक लढायांनीं अगदीं कंटाळून गेले होते. त्यामुळें मुख आणि शांतता यांच्या लाभाकरितां रोमन बादशहाच्या हातीं अनियंत्रित सत्ता देण्यास ते सहजच तयार झाले. शांततेचे चिन्ह म्हणून या काळांतील ग्रीक व लॅटिन नाण्यांवर शांततेच्या देवतेची मूर्ति पहावयास मिळते.
ऑ ग स्ट स व फ्रा न्स चा ति स रा ने पो लि य न यां ची तु ल ना - रोमचा बादशहा ऑगस्टस आणि फ्रान्सचा तिसरा नेपोलियन यांच्यामध्यें अनेक बाबतींत साम्य आहे. हे दोघेहि अधिकारारूढ झाले तेव्हां त्यांच्या प्रतिपक्षीयांनीं त्यांची अल्पवयी म्हणून थट्टा केली. सिसिरोनें ऑगस्टसला 'कालचा पोर' म्हटलें व व्हिक्टर ह्यूगोनें नेपोलियना 'बटू' म्हटले. दोघेहि आपसांतील युद्धांच्या व राज्यक्रांतीच्या धामधुमीनंतर अधिकाररूढ झाले होते. दोघांच्याहि वेळीं जमिनीच्या मालकी हक्कदारांमध्यें पुष्कळ फेरबदल झाले होते. त्यामुळे तत्कालीन जमीनदारांच्या हक्कसंरक्षणाची हमी देणाराचा पाठीराखेपणा करण्यास जमीनदारवर्ग तयार होता. या दोघांहि बादशहांनीं राज्यकारभाराची बहुतेक सूत्रें आपल्या हातीं घेतली; पण त्याचा उपयोग उदारपणानें शास्त्रें व कला यांनां उत्तेजन देण्याच्या आणि लोककल्याणाच्या कामी केला. अलौकिक बुद्धिमत्ता दोघांमध्येंहि नव्हती, परंतु त्यांच्यांत व्यवहारचातुर्य व धूर्तपणा ब-याच प्रमाणांत होता. दोघेहि लोकमताचा कल पाहून आपलें धोरण ठरवीत असत. दोघांनींहि पुराणमताभिमानी पक्षाचा व जुन्या परंपरेच्या घराण्यांचा मान राखला. हें इतकें साम्य असलें तरी तें परिस्थितींतील समतेमुळें उत्पन्न झालेलें आहे, व्यक्तीच्या स्वभावांतील ऐक्यतेमुळें नाहीं. उदाहरणार्थ, नेपोलियन मोठालीं मनोराज्यें करणारा व गुप्त कारस्थानें लढवणारा होता तसा ऑगस्टस नव्हता. ऑगस्टसच्या हातीं सत्ता पूर्ववयांतच आल्यामुळें प्रत्यक्ष अनुभवानें तो फार शहाणा व मुत्सद्दी बनत गेला, व त्यानें ज्या बादशाही सत्तेचा पाया घातला ती पुढें चारपांचशें वर्षे टिकली. उलट पक्षीं नेपोलियनचें बरेंचसें वय अचाट धाडसी कारस्थानें रचण्यामध्यें जाऊन उतार वयांत राजसत्ता हातीं आल्यामुळें त्याच्या स्वभावांत पुढें सुधारणा झाली नाहीं; व त्यायोगें नेपोलियनच्या हयातींतच फ्रेंच बादशाही सत्ता डळमळूं लागली. ऑगस्टसला बादशहा झाल्यावर अनेक प्रकारच्या सुधारणा करण्यास वेळ भरपूर मिळाला, आणि त्यानें केलेल्या अनेकविध सुधारणांमुळें त्याची कारकीर्द रोमन इतिहासांमध्यें सुवर्णयुग म्हणून दुमदुमत राहिली आहे.
या का ळां ती ल रो म न सा म्रा ज्या चें ब्रि टि श सा म्रा ज्या शीं सा म्य- रोमन साम्राज्याची आधुनिक ब्रिटिश साम्राज्याशीं अनेक बाबतींत तुलना करतां येण्यासारखी आहे. उ. रोम येथें साम्राज्यसत्ता इंग्लंडमधील राजा आणि पार्लमेंट यांच्याप्रमाणें रोमन बादशहा आणि सेनेट यांच्या हाती होती. तथापि इंग्लिश पार्लमेंटनें इंग्लंडच्या राजसत्तेला पूर्ण नियंत्रित बनवून राज्यकारभाराचा पाया अधिक मजबूत केला तसे सेनेटनें केलें नव्हतें. रोम येथें सेनेटची सत्ता दिवसानुदिवस कमी कमी होत जाऊन शेवटी बादशहा पूर्णपणें अनियंत्रित सत्ताधारी बनले, व त्यामुळें अखेर रोमन बादशाही सत्ता डळमळीत होऊन लयास गेली.
सर्व राजकीय हक्क असलेले रोमन नागरिक आणि मुळींच राजकीय हक्क नसलेले गुलाम या रोमन राज्यांतल्या स्थितीप्रमाणेंच जवळ जवळ युनायटेड किंगडममध्यें शंभर वर्षांपूर्वीं स्थिति होती. त्या वेळीं युनायटेड किंगडममध्यें प्रॉटेस्टंट लोकांनां सर्व राजकीय हक्क होते तर कॅथॉलिक लोकांनां मुळींच राजकीय हक्क नव्हते. विशेषतः आयर्लंडमध्यें कॅथॉलिक लोकांच्या राजकीय हक्कांचें प्रकरण फारच चिडीस गेलें होतें. परंतु इंग्लंडनें शहाणपणानें स्कॉटिश व आयरिश लोकांनां अधिकाधिक राजकीय हक्क देऊन खुष केलें आहे, तर उलट पक्षीं रोमन साम्राज्यांत अशी मुत्सद्दीगिरी न लढवली गेल्यामुळें अंतःस्थ अस्वस्थता वाढत जाऊन ती रोमन साम्राज्याच्या लयास अंशतः कारणीभूत झाली.
इंग्लंडच्या साम्राज्यांतील हिंदुस्थान देशाप्रमाणें रोमन साम्राज्यांतहि भिन्न भिन्न जातींच्या व धर्मांच्या लोकांनीं भरलेले देश होते. अशा देशांत मांडलिक राज्यें व संस्थानें राहूं देऊन इंग्लंडप्रमाणें रोमनेंहि स्वतःवरील राज्यकारभाराचें ओझें कांहीं अंशीं हलकें केलें होतें. तथापि हिंदुस्थानांतील संस्थानांच्या राज्यकारभारावर ब्रिटिश रेसिडेंटांचे किंवा पोलिटिकल एजंटांचे पूर्ण लक्ष व बरेंच नियंत्रण असतें. शिवाय प्रांतांवरचे गव्हर्नर व हिंदुस्थानचा व्हाइसरॉय या अधिका-यांची मुदत मर्यादित व त्यांच्यावर पार्लमेंटचें नियंत्रण कडक असल्यामुळें हिंदुस्थानांतील अधिकारी बंडखोर बनण्याची बिलकुल शक्यता नाहीं. उलट पक्षीं हिंदुस्थानच्या व्हाइसरॉयासारखे जे रोमन प्रो. कॉन्सल असत त्यांच्या हातीं बरीच अनियंत्रित सत्ता असे, आणि प्राचीन काळीं दूरदूरच्या प्रांतांतील अधिका-यांवर योग्य नियंत्रण ठेवण्याची साधनें उपलब्ध नसल्यानें रोमन साम्राज्यांत अस्वस्थता लवकर माजत असे. येणेंप्रमाणें रोमन व ब्रिटिश साम्राज्यांत अनेक बाबतींत साम्य पण परिस्थितीच्या बाबतींत कांहीं महत्त्वाचे फरक आहेत.
या सं क्र म ण का लां ती ल शा स न प द्ध ती चें स्व रू प- ब्रिटिश साम्राज्य आणि रोमन साम्राज्य यांच्या राज्यकारभारांत एक अत्यंत महत्त्वाचा फरक असा आहे कीं, रोमच्या साम्राज्यांतील केंद्रवर्ती राजकीय सत्ता अधिकाधिक अनियंत्रित होत गेली. तथापि रिपब्लिक उर्फ लोकसत्ताक पद्धतीचे दिवस पाहिलेल्या रोमन पिढीच्या मनाला धक्का बसूं नये म्हणून ऑक्टेव्हिअननें लोकसत्ताक काळांतील राज्यकारभाराची पद्धति बाह्यतः कायम ठेवली होती. तो सेनेटकडून मुदती मुदतीचा अधिकार मिळवीत असे; व मुदतीच्या अखेर बिनबोभाट अधिकारन्यास करीत असे. यामुळें सेनेट सभा कुरकुर न करतां त्यालाच पुन्हां मुख्य अधिकारी नेमीत असे. ह्या वेळीं सेनेटच्या सभासदांची संख्या ६०० ठरली होती. निरनिराळ्या अधिका-यांची निवड करण्याचें काम लोकसभा करीत असे, परंतु या अधिका-यांनां सर्व बादशहाचे हुकूम अंमलांत आणावे लागत. ऑगस्टसनें पूर्वींचे धार्मिक सार्वजनिक उत्सव चालू ठेवून पूर्वपरंपरेच्या अभिमानी जुन्या रोमन घराण्यांनां संतुष्ट राखलें. सर्व सैन्याचा मुख्य सेनापति सेनेटनें ऑगस्टसलाच नेमलें होतें. प्लीबियन लोकांच्या तक्रारींची दाद लावण्याचें काम पूर्वी ट्रिब्यून नामक अधिक-याकडे होतें. पण या लोकांच्या सर्व तक्रारींची दाद ऑगस्टसनें स्वतःच घेण्याचें ठरविलें; आणि त्याच्या अंगच्या न्यायी व दयाळु स्वभावामुळें त्यानें बरीच लोकप्रिति मिळविली. अशा अनेक युक्त्यांनीं प्रत्यक्ष राज्यकारभाराची सत्ता आणि लोकांची प्रीति ऑगस्टसनें संपादन केली.
लो क प्री ति सं पा द ण्या च्या आ ण खी यु क्त्या:- प्लीबियन लोकांनां मत देण्याचा हक्क मिळाल्यापासून त्यांनां अनुकूल करून घेण्याकरितां प्रसंगानुसार गरीब लोकांनां धान्य वांटण्याचे ठराव पास करून घेण्याचा प्रघात लोकसत्ताकाच्या काळांतील पुढा-यांनींच पाडला होता. ख्रि. पू. पहिल्या शतकांत तर असें धान्य वांटण्याचा सामान्य नियमच होऊन बसला होता. जूलिअस सीझरच्या वेळीं रोम येथें असें धान्य घेणारे भिक्षेकरी तीन लक्ष होते. या पद्धतींतील अनिष्टपणा ऑगस्टस जाणून होता. परंतु लोकप्रीति संपादण्याचें हें महत्त्वाचें साधन गमावण्यास तो तयार नव्हता. त्यानें दरमहा धान्य वांटण्याची पद्धत चालू ठेवली इतकेंच नव्हे, तर प्रसंग विशेषीं जादा धान्य व पैसेहि तो वांटीत असे. भिक्षेक-यांची संख्या दोन तीन लाख असे असें त्यानें लिहून ठेविलेल्या माहितीवरूनच सिद्ध होतें.
रोमन जनतेला खुष ठेवण्याचा दुसरा मार्ग सार्वजनिक सामने व खेळ करविणें हा होता. असले खेळ लोकसत्ताकाच्या काळांतील पुढारीहि लोकांनां अनुकूल करण्याकरितां लहानमोठ्या प्रमाणावर करवीत असत. पण बादशाही काळांत, लोकांनीं राजकारणांत फारसें लक्ष घालूं नये म्हणून, असल्या खेळांमध्यें लोकांचें मन गुंतवण्याची युक्ति ऑगस्टस व त्याच्या नंतरचे बादशहा यांनीं मोठ्या प्रमाणांत अंमलांत आणली.
रोम येथें दर चार वर्षांनीं 'अँक्टियन गेम्स' नांवाचे सामने होत असत. यांत प्रथम घोड्यावरच्या शर्यती, नंतर शारीरिक सामर्थ्याचे सामने आणि शेवटीं लढायांतील कैद्यांकडून करविलेलीं ग्लॅडिएटर्सचीं म्हणजे असिक्रीडकांचीं प्राणघातक द्वंद्वयुद्धें होत असत. या सर्व सामन्यांत असिक्रीडकांच्या खेळांनां फार महत्त्व असे, या द्वंद्वयुद्धांत सर्व पराजित सामनेवाल्यांनां येथल्या तेथेंच ठार मारण्याची चाल होती.
ऑगस्टसनें ही चाल बंद केली. परंतु या सामन्यांत हत्यारांनीं एकमेकांनां जखमा होऊन प्राणहानीहि होत असल्यामुळें ते निर्दय व क्रूरपणाचे होते असेंच म्हणावें लागतें. रोममध्यें या असिक्रीडकांच्या युद्धांची लोकांनां फारच चटक लागली होती. असिक्रीडक म्हणून दहा दहा हजार लोक नेहमीं तयार ठेवलेलें असत. याशिवाय बॉक्सिंगचे म्हणजे मुष्टियुद्धाचेहि सामने होत असत. मुष्टियुद्धाची कला ग्रीक लोकांत बरीच पूर्णत्वास पोहोंचली होती. हे मुष्टियुद्धाचे सामने निरनिराळ्या राष्ट्रांतील प्रसिद्ध खेळाडूंमध्येंहि केले जात असत. याशिवाय फोरममध्यें, अँफिथिएटरमध्यें किंवा रस्त्यांत तात्पुरतीं नाटकगृहें उभारून सर्कशीचे व नाटकांचे प्रयोग होत असत. या सर्व प्रकारच्या खेळांनां व करमणुकींनां स्वतः ऑगस्टस बादशहाकडून बरेंच उत्तेजन मिळत असे.
याप्रमाणें युद्धें बंद झाल्यामुळें लाभलेली शांतता, गरीबांनां वांटलें जाणारें धान्य, पैशाची खैरात व करमणुकीकरितां हरएक प्रकारचीं खेळ वगैरे साधनें या कारणांस्तव ऑगस्टस बादशहाची कारकीर्द म्हणजे नवीन सुखशांतीच्या युगाचा आरंभ असें सर्व लोकांस वाटूं लागलें.
ऑ ग स्टा इ न उ र्फ सु व र्ण यु गां ती ल वा ङ्म य- या सुवर्णयुगाच्या काळांत गद्य, पद्य वाङ्मयाला बरेंच उत्तेजन मिळून त्यांत भर पडली. ग्रीक वाङ्मयांतील ग्रंथांचे आदर्श लॅटिन लेखकांपुढें होतेच. तथापि स्वतंत्र विचार, जोरदार लेखनशैली व विषय सुलभपणें प्रतिपादन करण्याची हातोटी हे ग्रीक ग्रंथकारांतले गुण लॅटिन ग्रंथकारांत दिसत नाहींत. ऑगस्टसच्या काळांत लोकप्रिय झालेलीं नाटकें आज उपलब्ध नाहींत. त्यामुळें त्यांच्या गुणदोघांचें विवेचन येथें करतां येत नाहीं. सेनिकाच्या नांवावर चालत असलेलीं कांहीं दुःखपर्यवसायी नाटकें उपलब्ध आहेत. या नाटकांत शब्दालंकारादि गुण आहेत; पण नियमबद्ध कथानकाची रचना व पात्रांचा स्वभावपरिपोष या गोष्टी मुळींच साधलेल्या नाहींत. उत्तान शृंगार, वीरादि रसांनीं युक्त असे प्रवेश व भाषणें मात्र पुष्कळ आहेत.
याच काळांत सुप्रसिद्ध व्हर्जिल (ख्रि. पू. ७० - इ. स. १९) कवीनें आपलें इनीइड हें राष्ट्रीय महाकाव्य रचिलें. व्हर्जिल हा अलेक्झांड्रियन पंडितांपाशीं अध्ययन करून उच्च प्रकारचा विद्वान् बनला होता. त्यामुळें त्याच्या काव्यांतील पद्यरचना उत्तम साधलेली असून पुढें अनेक शतकें ती आदर्शभूत होऊन राहिली होती. तथापि व्हर्जिलमध्यें उच्च प्रतीची काव्यप्रतिभा नसल्यामुळें आणि काव्याच्या विषयाची निवडहि चांगली झाली नसल्यामुळें इलिअड किंवा पॅरॅडाइज लॉस्ट यांच्या तोडीचें हें महाकाव्य झालेलें नाहीं. व्हर्जिलनें कित्येक उपदेशात्मक काव्येंहि लिहिलीं आहेत; पण या नमुन्याचीं काव्यें लिहिणारे कवी, पुढें कोणी झाले नाहींत. शोकगीतें मात्र अनेक कवींनीं ब-याच उच्च दर्जाचीं लिहिलेलीं आहेत. त्यांत टिबलसचीं शोकगीतें बरींच नांवाजण्यासारखीं आहेत.
याच काळांत ओव्हिड (ख्रि. पू. ४३- इ. स. १७) हा बराच बुद्धिमान् कवि होऊन गेला. त्याची कविता शृंगारहास्यरसपरच विशेष आहे. होरेस (होरेशिअस ख्रि. पू. ६५-इ.स. ६) हा या काळांतला आणखी एक सुप्रसिद्ध कवि होय. त्यानें औपरोधिक व उपहासपर काव्यांत बरेंच नांव मिळविलें आहे.
रोमन लोकांत मोठाले इतिहासकार मुळींच कोणी झालेले नव्हते. या ऑगस्टाइन युगांतला लिव्हि (ख्रि. पू. ५९ - इ. स. १७) हा प्रसिद्ध इतिहासकार होय. याचा रोमच्या राज्याचा संपूर्ण इतिहास लिहिण्याचा संकल्प होता. तथापि लिव्हि याला उत्तम इतिहासकार म्हणतां येत नाहीं. त्यानें वार्षिक अहवाल एकत्र करून व त्यांतील विशेष विसंगत दिसणा-या गोष्टींनां फांटां देऊन आपला इतिहास लिहिला; परंतु त्यांत त्यानें सत्यासत्याच्या निवडीबद्दल विशेष चिकित्साबुद्धि वापरली नाहीं; किंवा चांगल्या टीकाकाराचेंहि काम केलें नाहीं. त्याचा इतिहास ब-याच वत्तृफ्त्वपूर्ण भाषेंत मात्र लिहिलेला आहे.
या काळांत झालेले शास्त्रीय ग्रंथ केवळ भाषांतरवजा आहेत. तत्त्वज्ञान, पदार्थविज्ञान, वैद्यक, कृषि, नीतिशास्त्र वगैरे शास्त्रांत रोमन लोकांनीं घातलेली भर फारच अल्प आहे. रोमन लोकांनीं परिणत केलेलें असें कायदेशास्त्र हेंच कायतें एक शासत्र आहे.