प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ८ वें.
बुद्धाचें चरित्र.

हिंदुस्थानांतील बौद्ध संप्रदाय.- बौद्ध संप्रदायाचा उगम हिंदुस्थानांत झाल्यामुळें, त्या पंथाचीं आद्यतत्त्वें काय होतीं तें हिंदुस्थानच्या इतिहासावरून समजतें. बौद्धांचें सर्व संप्रदायग्रंथ याच देशांत तयार झाले असल्यानें येथील बौद्ध संप्रदायाचें स्वरूप समजून घेतल्याशिवाय इतर देशांतील बौद्ध संप्रदायाचें स्वरूप नीट लक्षांत येणार नाहीं. या दृष्टीनें येथील बौद्ध संप्रदायाचा अभ्यास फार महत्त्वाचा आहे. या पंथाचा हिंदुस्थानांत लोप होऊन जरी अनेक शतकें लोटलीं आहेत, तरी त्याचा हिंदुस्थानच्या संस्कृतीवर बराच परिणाम झालेला आहे. या देशांतील आध्यात्मिक जीवनावर बौद्ध प्रयत्‍नाचा परिणाम बराच झालेला असून वाङ्‌मयेतिहासामध्यें तर बौद्धपंथी वाङ्‌मयास महत्त्वाचें स्थान आहे.

कोसल (हल्लींचा अयोध्या प्रांत) व मगध (बहार) या देशांत बौद्ध संप्रदायाचा उगम झाला. ब्राह्मणसंस्कृतीच्या केंद्रस्थानापासून हे प्रदेश फार दूर असल्यामुळें येथें बौद्ध संप्रदायाच्या प्रसाराचें काम सुगम झालें.