प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ८ वें.
बुद्धाचें चरित्र.

शातवाहन व पल्लव राजांची एतद्विषयक कामगिरी - दक्षिण हिंदुस्थानांत निरनिराळ्या जागीं बौद्ध संप्रदायाचा प्रसार झाला होता हें ह्युएनत्संगानें निरनिराळ्या ठिकाणीं पाहिलेल्या बौद्ध मठांचे जें वर्णन दिले आहे त्यावरून लक्षांत येतें. ह्युएनत्संगाच्या पूर्वीं तीन शतकें फाहिआन नांवाचा एक यात्रेकरू येथे आला होता. त्यानेहि एका डोंगरांत कोरलेल्या मठाचें वर्णन दिले आहे. शातवाहन घराण्यांतील राजे बौद्धांवरहि समदृष्टीनें कृपा करीत. त्यांच्या ताब्यांत दक्षिणेंतील बराच मुलूख असल्यामुळें इसवी सनाच्या पहिल्या शतकांत तेथेंहि बौद्धसंप्रदायाचा पुष्कळ प्रसार झाला. पल्लव आणि गुप्त हे उत्तरेकडून दक्षिणेकडे आले. पल्लवांचा अशोकवर्मा हा पूर्वज होता. म्हणून हे बौद्ध संप्रदायाचे असावे आणि त्यांनीं तो संप्रदाय आपल्याबरोबर दक्षिणेंत आणला असावा, अशीहि कल्पना फार थोड्या आधारावर मांडण्यांत आली आहे.