प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ८ वें.
बुद्धाचें चरित्र.

व्ही गोपाल अय्यर यांचा एतद्विषयक लेख -  गोपाल अय्यर यांनीं इं. अँ. पु. ३७, पृ. ३४१ वर या प्रश्नाचा जो खल केला आहे, त्याचा सारांश येणें प्रमाणें:- उत्तरेकडील बौद्ध लोक ख्रि. पू. २४२२ पासून ५४६ पर्यंत निरनिराळ्या सालांत बुद्ध झाला असें सांगतात, आणि सिलोन, ब्रह्मदेश व सयाम येथील बौद्ध लोक बुद्धाचा निर्वाणकाल ख्रि. पू. ५४३ हा धरतात.

बुद्धविषयक दंतकथांवरून त्याचा निर्वाणकाल निश्चित करण्यास चंद्रगुप्ताचा व अशोकाचा राज्यारोहणकाल निश्चित करणें जरून आहे. कारण सिलोनांतील ऐतिहासिक पुराव्यावरून असें दिसतें कीं, चंद्रगुप्ताचें राज्यारोहण निर्वाणानंतर १६२ वर्षांनीं व अशोकाचें २१८ वर्षांनीं झालें. हें विधान बरोबर आहे असें प्रो. मॅक्समुल्लर यांनीं कबूल केलें असून अशोकाच्या शिलालेखांनींहि त्याला पुष्टि येते.

पाश्चात्य अधिकारयु ग्रीकमधील व इतर पुराव्यांवरून त्याचप्रमाणें अशोकासंबंधीच्या माहितीवरून चंद्रगुप्ताचें राज्यारोहण ख्रि. पू. ३२५ सालीं झालें असावें असें म्हणावें लागतें. त्याचप्रमाणें अशोकाचें राज्यारोहण ख्रि. पू. २६९ सालीं झालें असावें. म्हणजे यावरून असें दिसतें कीं, बुद्धाचें निर्वाण ख्रि. पू. ४८७ सालीं झालें असावें.

सदरहू पुराव्याशिवाय हिंदुस्थानांत सांपडणा-या शिलालेखांवरूनहि बुद्धाचा निर्वाणकाल निश्चित करतां येतो. मध्यप्रांतांतील रूपनाथ येथील शिलालेखांतील आदेशांत असें लिहिलें आहे कीं, तो २५६ सालीं एका स्वर्गवासीयानें प्रसिद्ध केला. या लेखावरून असें अनुमान निघतें कीं, अशोक याच सालीं स्वर्गवासी झाला, व त्यांतील २५६ साल म्हणजे बुद्धनिर्वाणानंतरचें २५६ वें साल होय. अशोकाचा मृत्युकाल ख्रि. पू. २३१ आहे, म्हणजे निर्वाण काल ख्रि. पू. ४८७ हा असावा. निर्वाणाच्या वेळीं बुद्ध ८० वर्षांचा होता असें दंतकथांवरून दिसत असल्यामुळें बुद्धाचा जन्म ख्रि. पू. ५६७ सालीं झाला असावा.

चीनमध्यें विनयपिटकाला जोडलेलें एक ठिपक्याठिपक्यांचें पान आहे. पूर्वीं प्रत्येक वर्षीं 'वस्सोत्सवा' च्या वेळीं मुख्य उपाध्याय त्या ठिपक्यांत एक ठिपका मिळवीत असे. व ही पद्धत इ. स. ४८९ पर्यंत चालू होती. बुद्धनिर्वाणानंतर, दर वर्षास एक ठिपका याप्रमाणें त्यांत ९७५ ठिपके आहेत असें म्हणतात; यावरून निर्वाण काल ख्रि. पू. ४८७ ठरतो.

सिलोनांतील बखरींत निर्वाणकाल ख्रि. पू. ५४३ दिला आहे. परंतु कालगणनेंत सिलोनच्या लोकांची चूक झाल्यामुलें हा ५६ वर्षांचा फरक पडला आहे. त्यांनीं मौर्यकाल अशोकापासून सुरू होतो असें गृहीत धरल्यामुळें चंद्रगुप्त व अशोक यांच्यांतील ५६ वर्षांच्या अंतराएवढी चूक बुद्धाचा निर्वाणकाल निश्चित करतांना पडली असावी.