प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ८ वें.
बुद्धाचें चरित्र.
वरील सालाची महावंशांतील उल्लेखाशीं संगति - बुद्धाच्या निर्वाणानंतर २१८ वर्षांनीं अशोकास राज्याभिषेक झाला असें महावंशांत सांगितलें आहे. अशोकाच्या राज्याभिषेकाचा काळ ख्रि. पू. २७२-२७० असा आपण शिलालेखाच्या विश्वसनीय पुराव्यावरून ठरविला असल्यामुळें त्यावरून हिशोब करून पाहतां बुद्धाचा निर्वाणकाल वाजवीपेक्षां ११-१२ वर्षे पुढें येतो. यावर उपसालाचे प्रो. शार्पेटियर यांचे असें म्हणणें आहे कीं, - ''अशोकाच्या राज्याभिषेकापेक्षां त्यानें बौद्ध धर्माचा स्वीकार करणें हीच गोष्ट बौद्धांच्या दृष्टीनें महत्त्वाची असल्यामुळें जेव्हां राज्याभिषेकानंतर ११ वर्षांनीं अशोक बौद्ध संप्रदायाचा कट्टा अभिमानी झाला तेव्हांच त्याचा राज्याभिषेक झाला असें त्यांनीं मानलें असावें.''
देवानां पिय तिस्साच्या राज्याभिषेकदिननिर्देशावरून वरील सालास पुष्टि.- सिलोनच्या देवानां पिय तिस्सास बुद्धनिर्वाणानंतर २३६ वर्षांनीं मार्गशीर्षांत आदिचंद्रोदयदिन व पूर्वाषाढा नक्षत्र असतांना राज्याभिषेक झाला या माहितीवरून देवानां पिय तिस्स याला ख्रि. पू. २४२ किंवा २४७ या वर्षीं राज्याभिषेक झाला असावा, व म्हणून बुद्धाच्या निर्वाणास ख्रि. पू. ४७८ किंवा ४८३ यांपैकीं एखादें वर्ष देतां येईल, असें डॉ. फ्लीट यांनीं गणित करून ठरविलें आहे. आतां यांपैकीं कोणतें वर्ष घेणें अधिक सयुक्तिक होईल तें आपण पाहूं. ख्रि. पू. २४२ सालच्या १४ नोव्हेंबर रोजी (लंकेंतील कालमानाप्रमाणें) मध्यम सूर्योदयानंतर ५१॥ घटकांनीं द्वितीया संपली, म्हणजे तो 'आदिचंद्रौदय दिन' होता; आणि पूर्वाषाढानक्षत्र तर त्या दिवशी दिवसभर होतें. परंतु ख्रि. पू. २४७ सालच्या ६ नोव्हेंबर रोजीं ९ घटकांनीं प्रतिपदा संपली, व ५०॥ घटकांनीं, म्हणजे मध्यरात्रीनंतर दोन घटकांनीं, पूर्वाषाढा नक्षत्र लागलें. यावरून असें दिसून येईल कीं, हा जरी आदिचंद्रोदय दिन होता तरी त्या दिवशीं पूर्वाषाढा नक्षत्र होतें असें बहुधा कोणी म्हणणार नाहीं. म्हणून ख्रि. पू. २४२ हें देवानां पिय तिस्साचें राज्याभिषेकाचें वर्ष, व ख्रि. पू. (२४२+२३६) ४७८ हें बुद्धाच्या निर्वाणाचें वर्ष असलें पाहिजे.