प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ८ वें.
बुद्धाचें चरित्र.

यवद्वीप, बलि व सुमात्रा येथील बौद्ध संप्रदाय. - सुमात्रांत व त्याच्या जवळच्या बेटांमध्यें बौद्ध संप्रदायाचा शिरकाव इ-त्सिंगच्या पूर्वींच झालेला असून तेथें त्याचा प्रसार हीनयान पंथाकडूनच झाला होता. तथापि मलयु देशांत महायानी पंथाचे लोक होते. आठव्या शतकांत यवद्वीपामध्यें महायानी पंथ चांगला प्रस्थापित झाला होता यांत संशय नाहीं. बोधिसत्त्व अवलोकितेश्वराची शक्ति, आर्या तारा देवी हिचा पुतळा, व महायानी भिक्षूंसाठीं बांधलेलीं वसतिस्थाने यांचा उल्लेख कलसन व प्रंबनन येथें सांपडलेल्या एका संस्कृत लेखांत आढळतो. हा लेख ७७८ सालांतील असून, हीं कामें शैलेंद्र घराण्यांतील एका राजाची आहेत. सदरहू लेख उत्तर हिंदुस्थानांतील लिपींत लिहिलेला आहे; पण यवद्वीपामधील इतर संस्कृत लेख यवद्वीपी लिपींत आहेत. यावरून राजाश्रयाखालीं असलेले महायानी बौद्ध बंगालच्या पश्चिमभागाकडून या ठिकाणीं आले असावेत, असें अनुमान निघतें. आठव्या शतकानंतर यवद्वीपामध्यें झालेलीं सर्व स्मारकें महायानी पंथाच्या लोकांची आहेत. मध्ययुगापर्यंत यवद्वीपामध्यें शैव व महायान असे दोन निरनिराळे पंथ होते. या दोन पंथांमध्यें इतकें सख्य होतें कीं, पुढें त्या दोहोंचें मिश्रण होऊन एक नवीनच पंथ उत्पन्न झाला. उशना येथें एक देवालय आहे, त्याचा खालचा भाग शैवांचा व वरचा भाग बौद्धांचा आहे. खालच्या भागांत शिवाची व वरच्या भागांत ध्यानिबुद्ध अक्षोभ याची, अशा मूर्ती आहेत. ही इमारत कृतनगर राजानें बांधिलेली असून तो मोठा धर्मपरायण बौद्ध होता. परंतु मरणानंतर त्याला शिव-बुद्ध असें नांव मिळालें. एकंदरींत, यवद्वीपामधील महायानी लोक दुराग्रही नसून सर्व उपासनासंप्रदायांशीं सलोख्यानें वागत असत असें दिसतें. शिव आणि बुद्ध हे भिन्न नसून एकच आहेत असे सुतसोम नांवाच्या काव्यांत म्हटलें आहे. ब्राह्मणी धर्मांतील विषयांवर बौद्ध लोकांनीं काव्यें करून यवद्वीपाच्या वाङ्‌मयांत बरीच भर टाकलेली आहे. पांच ध्यानिबुद्धांची व त्यांच्या शक्तींची पूजा यवद्वीपामध्यें फार प्रचलित असावी; कारण देवालयांमध्यें त्यांच्याच मूर्ती आढळून येतात. बलि बेटांत १४ व्या शतकांत विनयानुयायी व वज्रधर असे दोन बौद्ध पंथ होते. यवद्वीपामध्येंहि या वज्रधर पंथाचे अनुयायी म्हणजे तन्त्री लोक होते. परंतु हल्ली बलि बेटांत बौद्धसंप्रदायी लोक फारसे नाहींत असे म्हटलें तरी चालेल. या प्रदेशांतील भारतीय संस्कृतिविषयक विवेचन पहिल्या विभागांत आलेंच आहे.

इ-त्सिंगच्या वेळेपासून १४ व्या शतकापर्यंत सुमात्रा बेटामध्यें बौद्ध संप्रदायाची काय स्थिति होती हें समजण्यास मार्ग नाहीं. तेथील राजा अदित्यवर्मा (१३४२-५६) हा महायानी पंथाचा कट्टा अभिमानी असून त्यानेंच यवद्वीप येथील एका देवालयांत बोधिसत्त्व मंजुश्रीची मूर्ति स्थापन केली असें म्हणतात. कारण यवद्वीप येथील राणी त्याची नातलग होती.

आदित्यवर्माच्या वेळीं सुमात्राच्या उत्तर भागांत महंमदी पंथाचा प्रसार झालेला असून लवकरच मध्यसुमात्रांतहि तो पंथ प्रस्थापित झाला असावा. आदित्यवर्म्याचे लेख, अमोघपाशाचा पुतळा व बोधिसत्त्व लोकेश्वर याची मूर्ति यांशिवाय त्या ठिकाणीं बौद्ध संप्रदायाचें आतां कांहीं एक राहिलेलें नाहीं.