प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ८ वें.
बुद्धाचें चरित्र.
मिलिंद व कनिष्क यांच्या काळांतील पक्षभेद - अशोकाच्या मृत्यूनंतरहि उत्तर हिंदुस्थानांत बौद्धमताचा बराच प्रसार झाला. ख्रि. पू. १०० च्या सुमारास मिलिंद (मिनँडर) राजानें बौद्धपंथाचा स्वीकार केला. याच सुमारास बॅक्ट्रिया व चीन या देशांतहि बौद्ध संस्कृतीचा प्रसार झाला. परंतु हिंदुस्थानांतील बौद्ध लोकांत या वेळीं फाटाफूट होऊन इतकी दुही माजली होती कीं, एका बौद्ध संप्रदायाचे अठरा निरनराळे पंथ प्रचारांत आले असें म्हणतात. अशोकाप्रमाणेंच कनिष्क राजाचीहि कारकीर्द बौद्ध संस्कृतीच्या इतिहासांत महत्त्वाची आहे. हाहि राजा प्रथम बौद्धसंप्रदायी नव्हता; परंतु राज्यारूढ झाल्यावर तो या संप्रदायात शिरला अशी दंतकथा आहे. इ. स. १०० च्या सुमारास कनिष्कानेंहि एक धर्मसभा भरविली होती. या सभेंत बौद्ध संप्रदायाच्या अठरा निरनिराळ्या पंथांचे लोक हजर होते. गौतमबुद्धाच्या वेळचा बौद्ध संप्रदाय व कनिष्काच्या वेळचा बौद्ध संप्रदाय यांत महदंतर होतें. बौद्ध संप्रदायाचें मूळचें शुद्ध स्वरूप या वेळीं राहिलें नव्हतें. कनिष्काच्या धर्मसभेंत हनियान पंथाचे लोक बरेच हजर असून महायान पंथाचे लोक बहुतेक हजर नव्हतेच असें म्हटलें तरी चालेल. उत्तरेकडच्या बौद्ध संस्कृतीला महायान व दक्षिणेकडील बौद्ध संस्कृतीला हीनयान अशीं नांवें होतीं. या दोन पंथातील अंतर दिवसानुदिवस वाढत जाऊन कनिष्काच्या वेळीं ते पंथ अगदीं भिन्न झाले. कनिष्काच्या सभेच्या योगानें हीनयान पंथांत एकी झाली, परंतु या दोन पंथांचें एकमत झालें नाहीं. या धर्मसभेत संप्रदायग्रंथांतहि सुधारणा झाली.