प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ८ वें.
बुद्धाचें चरित्र.
भिक्षुणीसंघ. - स्त्रियांचा गौतमास अत्यंत तिरस्कार असे. त्यांस संधि मिळण्याचा अवकाश, कीं व्यभिचार करण्यास त्या लागलीच प्रवृत्त होतात अशी त्याची स्त्रियांविषयीं दृढ समजूत व्यक्त होते. गौतमास स्त्रियांचा असा तिरस्कार येण्यास स्वतःच्या अंतःपुरांतील त्याचा अनुभव कारण झाला असें एका ग्रंथकारानें म्हटलें आहे व हेंच वर दिलेल्या दोन ग्रंथांवरूनहि सिद्ध होतें.
आनंदाच्या आग्रहावरून जेव्हां कोसलाधिपाच्या स्त्रिया व गौतमाची सावत्र आई यांस 'भिक्षुणी' करून त्यांचा एक स्वतंत्र संघ निर्माण केला, तेव्हां गौतमानें असे उद्गार काढले कीं माझा धर्म जो कित्येक वर्षे टिकणार होता तो आतां ५०० वर्षें आधीं नामशेष होईल.