प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ८ वें.
बुद्धाचें चरित्र.
बौद्ध संप्रदायाची ऐतिहासिक किंमत.- बौद्ध संप्रदायाचें कार्य मोठें आहे व त्यामुळें, बुद्धाचें ऐतिहासिक महत्त्व आणि त्याच्या चरित्राविषयीं त्याच्या प्राचीनतेच्या मानानें उपलब्ध माहिती या दृष्टीनीं या पुरुषासारखा दुसरा कोणीच झाला नाहीं. ख्रिस्त व पैगंबर या दोन्ही व्यक्तींचें कार्यस्वरूप बुद्धाच्या कार्यस्वरूपाहून भिन्न आहे.
बौद्ध संप्रदायाचा प्रसार चांगल्या रीतीनें समजण्यासाठीं त्याचें वास्तविक स्वरूप कळणें अवश्य आहे. बुद्धानें आपलें मत केवळ मतस्वरूपी ठेविलें नाहीं, तर तें संप्रदाय स्थापन करून रक्षण्याचा आणि प्रसृत करण्याचा प्रयत्न केला. बुद्धाचा संप्रदाय आणि परंपरागत वैचारिक इतिहास यांचा परस्परसंबंध संप्रदायेतिहासाच्या दृष्टीनें अगोदर लक्षांत घेतला पाहिजे. याविषयीं थोडक्यांत असें सांगतां येईल कीं, त्यानें ईश्वरस्वरूप किंवा वैदिक वाङ्मय यांविषयीं फारसें विवेचन केलेलें नाहीं. बुद्धाच्या ईश्वरविषयक कल्पना निश्चयानें सांगणें कठिण आहे. कधीं कधीं तो पिशाचादिकांचें अस्तित्व मान्य करतांना आढळतो. इंद्रादि देवतांच्या अस्तित्वाविषयीं त्याची अस्तिक्यबुद्धि असावी असेंहि एखाद्या वेळेस वाटतें. स्वर्ग, पाताळ, नरक इत्यादि बाबतींत त्याचें मत फारसें भिन्न नव्हतें. पुनर्जन्माची कल्पना भिन्न स्वरूपांत त्यास मान्य होतीच. आयुष्य दुःखमय आहे, कर्म फार बलवान् आहे, या त्याच्या अधिष्ठात्री कल्पना होत्या.
बुद्धाचें अद्वितीयत्व जरी कोणासहि अमान्य करतां यावयाचें नाहीं तरी त्याच्या ज्ञानाच्या, स्वभावाच्या आणि वर्तनाच्या वर्णनांत श्रद्धावान् आणि चिकित्सक यांत तीव्र मतभेद झाल्याशिवाय राहणार नाहीं.