प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २५ वें.
बुद्धोत्तर चीन व जपान.

हान घराणें (ख्रि. पू. २०६) ह्या नव्या घराण्याच्या बादशहानें काओ ति ही पदवी घेऊन होनान प्रांतांमधील लोयांग येथें आपली राजधानी नेली. व नंतर शेनसी प्रांतांतील चंग अन येथे नेली. त्यानें त्सिन घराण्यांतील शि-व्हांग-ति या बादशहाचे सर्व कायदे रद्द ठरवले. पण ग्रंथ नष्ट करण्याचा हुकूम मात्र कायम ठेवला. पण त्याच्या नंतरचा बादशहा व्हेति (ख्रि. पू. १९४-१७९) यानें ग्रंथ लेखनाला उत्तेजन दिलें. इतकेंच नव्हे तर पूर्वीं नष्ट केलेले ग्रंथ पुन्हां तयार करण्याकरितां एक मंडळ नेमलें. या मंडळाचें काम बरेंच यशस्वी झालें. कारण पुष्कळ लोकांनीं तो पूर्वींचा अनिष्ट हुकूम न जुमानतां ग्रंथ लपवून ठेवले होते ते मंडळाला मिळाले. शिवाय कित्येक विद्वानांनीं स्वतःच्या स्मरणशक्तीनें ग्रंथ पुन्हां लिहून दिले. या बादशहाच्या कारकीर्दींत साम्राज्यांत व सरहद्दीवरहि चांगली शांतता लोकांस लाभली. फक्त सरहद्दीवर हूण लोकांनीं स्वा-या केल्या; पण त्यांत त्या रानटी लोकांचेच पराभव झाले. इकडे पराभव झाल्यावर या रानटी हूण लोकांनीं युएचींच्या राज्यावर हल्ला केला. व त्यांनां तुर्कस्थान व कास्पियन समुद्र यांच्यामधील प्रदेशांत हांकून लावलें या हूण लोकांच्या त्रासामुळे चीनच्या बादशहानें युएचीच्या राज्याबरोबर मैत्रीचा तह करण्याचें ठरविलें, व त्याकरितां आपला सेनापती चंग-  किएन याला वकील म्हणून पाठविले. या वकीलाला हूण लोकांनीं दोनदां कैद केले पण त्यांतून सुटून तो अखेर युएचींच्या म्हणजे इंडो सिथिअन लोकांच्या दरबारीं पोहोंचला, व तह करून परत आला. शिवाय चंगकीएन ह्या चिनी वकीलानें बॅक्ट्रिआ देश पाहून व हिंदुस्थानाबद्दलची माहिती घेऊन आपल्याबरोबर अनेक झाडांचे व जनावरांचे नमुने चीनमध्यें आणले. पुढें वू ती (ख्रि. पू. १४० - ८६) याच्या कारकीर्दींत हूण लोकांचा पूर्ण मोड करण्यांत आला आणि पूर्व तुर्कस्थान चीनची वसाहत बनविण्यांत आला. तेव्हां या मार्गानें कारवान लोक दूरवर इराण व रोम येथें व्यापाराकरितां सुरक्षित जाऊं येऊं लागले. ह्या हान घराण्याच्या वेळीं पूर्वींची सरंजामी पद्धत मर्यादित स्वरूपांत पुन्हां सुरू करण्यांत आली. राज्याची १०३ लहान लहान संस्थानें करून साम्राज्यांतील मुख्य तेरा प्रांतांवरील गव्हर्नरांच्या देखरेखीखालीं ताब्यांत देण्यांत आलीं.

ख्रिस्ती शकाला आरंभी होण्याचे सुमारास पिंग-ति या बाल बादशहाच्या विरूद्ध वांग मांग नांवाच्या इसमानें बंड केलें व इ. स. ९ मध्यें स्वतःला बादशहा म्हणून जाहीर केले. यास कांहीं काळ लोकांचा पाठींबा मिळाला पण इ. स. २३ मध्यें हान घराण्यांतील लिउ सिउ नांवाच्या पुरूषानें त्याचा पराभव करून त्याला ठार मारलें.